सुंदर दिसण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे फक्त मेक-अप नाही. तो केवळ बाह्य़रूप खुलवतो. मन शांत असेल, प्रफुल्लित असेल तर ते सौंदर्य चेहऱ्यावर झळकतं. ताण-तणावांवर मात करत रिलॅक्स होण्यासाठी आणि त्यातून सौंदर्योपासना करण्यासाठी स्पा आणि मसाज ट्रीटमेंट लोकप्रिय व्हायला लागल्या आहेत, ते याच सौंदर्यसाधनेसाठी.
पूर्वी सौंदर्य म्हणजे गोरा रंग, मोठे डोळे, सरळ नाक, लांब केस..  मात्र या आधुनिक युगात सौंदर्याची व्याख्याच बदललेली आहे.  गोऱ्या रंगाइतकेच काळ्या रंगालासुद्धा महत्त्व दिले आहे. मिस युनिव्हर्स, मिस इंडिया अशा सौंदर्यस्पर्धामध्ये आपल्याला हे आढळून येईल. आधुनिक युगात सर्वच काही बदलले आहे. आजच्या राहणीमानात उच्च कोटीचा बदल झालेला आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे सुखसुविधांची साधने हाताशी आली आणि  राहणीमानात आमूलाग्र  बदल झाला. कष्टाचे काम जरी कमी झाले असले तरी मानसिक तणाव सतत वाढत आहे. संयुक्त कुटुंब पद्धती विभक्त झाली आहे. आई-आजी यांच्या प्रेमाचा हात त्यांनी घातलेली आंघोळ, डोक्याला चोपून लावलेले तेल व प्रेमाचा मसाज या सर्व गोष्टी आता दुर्लभ झाल्या आहेत आणि त्याची जागा घेतली आहे ती ब्यूटीपार्लर, हेल्थसेंटर, स्पा वगैरेसारख्या तंत्रांनी. पण आता प्रत्येकाने या काळानुसार बदलणे गरजेचेसुद्धा झाले आहे. आज ब्यूटी इंडस्ट्रीचा करोडोंचा टर्नओव्हर आहे. रोज नवीन नवीन ब्यूटी पार्लर्स व स्पा यांची भर पडत चालली आहे. कितीतरी व्यक्ती करिअर म्हणून या व्यवसायाकडे बघत आहेत.
खरेतर स्पा म्हणजे पाणी आणि त्यातून घेतलेले उपचार.  पूर्वीच्या काळी राण्या, महाराण्या मोठय़ा हौदात फुले व अत्तरे टाकून तासनतास दासीच्या हातून मसाज करत आंघोळ करायच्या. त्या काळात त्यांचा तो छंद सौंदर्यवर्धन आणि मनोरंजनाचा भाग होता. तसेच सुगंधित अत्तरं लावून लेप, उटणे लावूनसुद्धा त्या सौंदर्य वाढवायच्या. ही पद्धत पूर्वीपासूनच उपलब्ध आहे. मात्र कालांतराने या उपचाराला वेगळे आधुनिक स्वरूप आले. आता तेच उपचार ‘स्पा’च्या रूपात आणि ब्यूटीपार्लरच्या रूपात प्रचलित झालेले आहेत.
स्पा म्हणजे काय?
स्पा ही एक पाण्याची चिकित्सा असली तरी त्याचे प्रकार बदलले आहे. स्पा ही एक अतिसुगंधित अतिमंद प्रक्रियाअसलेली शांतता आणि फक्त शांतता असलेली एक खोली. त्यात एक मोठा बेड असतो आणि ती खोली अ‍ॅरोमा ऑइल टाकून सुगंधित केलेली ताजी फुलं व फुलांच्या पाकळ्या पसरून खोली सुसज्ज केलेली असते. आंघोळीसाठी जॅकोझी, वीशी शॉवर आणि टॅबलेट असे प्रकार देणारा स्पा जागोजागी प्रसिद्ध झाला आहे. त्यात ए, बी व सी ग्रेड असे टप्पे असतात. ए ग्रेड स्पा हे पंचतारांकित, सप्ततारांकित हॉटेल्स आणि क्लब हाउसमधून उपलब्ध असतात. अनेक मोठमोठय़ा मॉलमधूनही अशा सुविधा हल्ली दिसतात. परंतु यासारख्या स्पा ट्रीटमेंट महागडय़ा असतात. बी आणि सी ग्रेड स्पासुद्धा सुसज्जित असतात, परंतु ते शॉपिंग सेंटर, ब्यूटी पार्लर, ब्यूटी क्लिनिक या ठिकाणी चालविले जातात. मात्र स्पा देणारे आर्टिस्ट हे प्रशिक्षित असतातच असे नाही. यापासून आपण सावधान राहायला हवे. इंटरनॅशनल स्पा, थाई स्पा, नॅचरल स्पा आणि ब्यूटी स्पा हे स्पा प्रचलित आहेत.
स्पामध्ये असणाऱ्या ट्रीटमेंट
स्पामध्ये खरेतर मसाजव्यतिरिक्त अनेक उपचार असतात. अ‍ॅरोमा थेरपी, स्टोन थेरपी, स्वीडिश मसाज, डीप टिश्यू मसाज, कॉर्पोरेट मसाज, रिफ्लेक्सोलॉजी, लिम्फटिकमसाज, लोमी लोमी मसाज, बॉडी पॉलिशिंग, बॉडी स्क्रबिंग आणि बॉडी रॅपिंग यांसारखे उपचारदेखील दिले जातात. शारीरिक कष्ट कमी होत आहेत व मानसिक तणाव दिवसेंदिवस वाढत आहेत. प्रदूषण, भेसळयुक्त पदार्थ अनैसर्गिक भाज्या व फळे यामुळे शरीराला अनेक रोग भर करीत आहेत. अशा परिस्थितीत स्पामध्ये जाऊन शरीराला मसाज घेणे काळाची गरज आहे.
स्पा निवडताना कोणती काळजी घ्यावी?
खूपदा कुठल्याही स्पामध्ये जाताना अनेक प्रश्न  मनात येतात. कुठल्या स्पामध्ये जावे, कशी निवड करावी, कुठला स्पा चांगला असेल वगैरे वगैरे. जोपर्यंत स्पामध्ये जाऊन त्याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत आपण फक्त त्याबद्दल विचार करीत असतो. स्पा निवडताना इथले वातावरण चांगले हवे, वापरणाऱ्या वस्तू या डिस्पोजेबल असाव्यात. उदा. बेडशीट, हेअरबँड, टॉवेल, नॅपकिन इत्यादी. स्पा देणारी मसाजिस्ट ही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेली असावी. ती खोली शांत, हलके हलके संगीतमय असावी. मसाज घेताना क्रॉस मसाज शक्यतो टाळावा. मसाज घेताना तुम्ही रिलॅक्स असणे महत्त्वाचे. मसाज घेताना संपूर्ण अंग झाकलेले असावे. मसाज घेणारा भागच उघडा असावा. म्हणजे शरीराला ऊब मिळेल.

Story img Loader