तेजश्री गायकवाड
गुलाबी थंडी ही कायम तरुणाईला घराबाहेर पडून भटकंतीची ओढ लावणारी.. सरत्या वर्षांला सलाम करत नव्या वर्षांची पहाट नेहमीपेक्षा वेगळय़ा ठिकाणी अनुभवावी या उद्देशाने अनेकजण या काळात कधी कुटुंबाबरोबर, कधी मित्रमैत्रिणींबरोबर, कधी आपल्याचसारख्या भटक्यांबरोबर फिरायचे बेत आखतात. सध्या नुसतंच निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यापेक्षा ऐतिहासिक वळणवाटा धुंडाळण्याकडे तरुणाईचा कल आहे.
गोवा, लोणावळा, माथेरान अशा नेहमीच्या छोटय़ा-मोठय़ा ठिकाणी भटकंतीला न जाता वेगळय़ा वाटा शोधण्याच्या प्रत्यत्नात असलेली तरुणाई ऐतिहासिक स्थळांच्या प्रेमात पडली आहे. नुकताच हम्पीला जाऊन आलेला प्रज्ञेश तारी सांगतो, ‘‘कर्नाटकातील हम्पीबद्दल खरं तर मराठी सिनेमा ‘हम्पी’मुळे समजलं. त्या सिनेमानंतर अनेकांनी तिकडे भेट दिली. त्यामुळे साहजिकच सोशल मीडियावर त्याचे फोटो फिरू लागले. थोडं अजून सर्च केल्यावर लक्षात आलं की त्या सिनेमापलीकडे हम्पीमध्ये बघण्यासारखं खूप काही आहे. म्हणून तिकडे जायचं ठरवलं. हनुमानाचा जन्म जिथे झाला तो अंजनेय डोंगर तिथे पहायला मिळाला. इतिहासात वाचलेल्या रामायण कथांमधून वानरांनी पाण्यावर दगडांचा सेतू बांधला होता हे माहिती होतं, पण प्रत्यक्षात तो दगड तिथे पाहता आला. एकंदरीत फिरण्यासोबत आपण जे इतिहासात वाचलं आहे ते प्रत्यक्षात कसं दिसतं?, हे बघण्याची इच्छा मला ऐतिहासिक जागांकडे घेऊन जाते’’. असंच काहीसं मत ऋषभ सावंतनेही व्यक्त केलं. ‘‘सोशल मीडियावरचे फोटो बघून नेहमीच्या ठिकाणी जाण्यापेक्षा कुठे तरी वेगळय़ा जागी जावं असं सतत वाटतं म्हणून आम्ही मित्र-मैत्रिणी मिळून वेगवेगळय़ा जागा एक्सप्लोर करायचं ठरवलं. एकदा केदारनाथची ट्रीप केली आणि फक्त मज्जेपुरते गेलेलो आम्ही माहितीचा खजिना घेऊनच परत आलो. त्यानंतर आम्ही फिरण्यासोबत काहीतरी वेगळं जाणून घेता येईल, अशाच ठिकाणी भ्रमंती करू लागलो’’, असं तो सांगतो. ऋषभने नुकतीच हिमाचल प्रदेशमधील माणिकरण या छोटय़ाशा ठिकाणी भेट दिली. या जागेबद्दल खूप वाचलं होतं आणि व्हिडीओही बघितले होते. तिथली गरम पाण्याची कुंडं आम्हाला पहायची होती, मात्र त्याचे धागे इतिहासाशी जोडले गेलेले आहेत हे तिकडे गेल्यावर समजलं, असं तो सांगतो.
महाराष्ट्रातीलही अनेक ऐतिहासिक-लोकप्रिय ठिकाणं सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. यामध्ये कास पठारापासून अनेक गड-किल्ल्यांचा समावेश होतो ‘‘नेहमीच्या गोंगाटाच्या ठिकाणी जाण्यापेक्षा गड किल्ले मला खूप आकर्षित करतात, तिथला इतिहास खुणावत असतोच. गेल्या काही वर्षांपासून मी गडांवर फिरायला जाते. शाळेत इतिहास शिकत असतानाच किल्ल्यांविषयी कुतूहल निर्माण झालं होतं. आता मोठं झाल्यावर पुस्तकात वाचलेल्या गोष्टी प्रत्यक्षात बघायला मिळत आहेत याचा खूप आनंद वाटतो’’, असं ट्रेकिंगमध्ये रमणारी पूनम भोसले सांगते. तिचा ग्रुप गड – किल्ल्यांवर फक्त फिरायला न जाता तिकडची साफ सफाई आणि ती ऐतिहासिक वास्तू जपण्यासाठी लागेल ती मदतही करतो. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे अनके पर्यटक तिकडे येतात, पण आपल्या ऐतिहासिक वारशाची जपवणूक करत नाहीत असंही ती सांगते. आपल्याला जसा वाचलेला इतिहास, त्याच्या खुणा अनुभवता आल्या तसंच आपल्या पुढच्या पिढीलाही त्या पाहायला मिळतील, यासाठी प्रयत्न करायला हवेत, असं ती आग्रहाने सांगते.
खरंच ऐतिहासिक स्थळांवरची भ्रमंती वाढली आहे का?, याबद्दल बोलताना ‘क्लीअर ट्रीप डॉट कॉम’चे व्यवस्थापक अर्जुन चौगुले म्हणतात, करोनानंतर पर्यटन उद्योग बऱ्यापैकी सावरला आहे. लोक हमखास फिरायला जायचा बेत आखतात. ऐतिहासिक ठिकाणी जाण्याचा कल तर वाढलाच आहे, पण त्यासोबतच निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा कलही दिसून येतो आहे. लोकांना मानसिक शांती हवी आहे, त्याचबरोबर नवीन काही जाणून घेण्याचं कुतूहलही आहे. सोशल मीडियामुळे लोक अगदी कधीच न ऐकलेल्या गावांनाही भेट देतात आणि तिथून येताना आठवणींसह तिकडच्या जागेची माहितीही सोबत घेऊन येतात. पर्यटकांचा कल बघून आता टूर्स आणि ट्रॅव्हल कंपन्या त्यांच्या पॅकेजेसमध्ये बदल करत असल्याचं टूर मॅनेजर विवेकानंद देसाई सांगतो. ‘‘तरुणाईमध्ये नेहमीच अनेक गोष्टींचं कुतूहल असतं, हेच कुतूहल त्यांना ऐतिहासिक ठिकाणी घेऊन येतं. या गोष्टीमागे अर्थातच सोशल मीडियाही कारणीभूत आहेच. ऐतिहासिक ठिकाणी काढलेले फोटो पोस्ट करताना त्या जागेचा इतिहासही लिहिला जातो आणि काही तरी वेगळी जागा आहे म्हटल्यावर त्या पोस्ट सोशल मीडियावर जास्त बघितल्या जातात. या कारणामुळेही तरुणाई ऐतिहासिक ठिकाणी जास्त भेट देते. तर काहींना आवर्जून तिकडचा इतिहास जाणून घ्यायचा असतो. हेच सगळं लक्षात घेत आता टूर्स आणि ट्रॅव्हल कंपन्या अशा ट्रिप खास तरुणाईसाठी बजेटमध्ये देत आहेत’’, असं विवेकानंद सांगतो.
सोशल मीडियाचा प्रभाव
गेल्या काही वर्षांत इन्स्टाग्रामने तरुणाईवर चांगलाच प्रभाव टाकला आहे. इन्स्टाग्रामवर केदारनाथ, हम्पी, म्हैसूर, राजस्थान अशा अनेक ऐतिहासिक वारसा असलेल्या, ऐतिहासिक गोष्टी असलेल्या जागांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. रीलवर तुम्हाला असे कित्येक व्हिडीओ दिसतील. अवघ्या काही सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये दिसणारी त्या ठिकाणची विहंग दृश्यं, छायाचित्रं आणि त्याच्या पार्श्वभूमीवर वाजणारं गाणं याने आपल्याला भुरळ नाही पडली तरच नवल. अनेक युटय़ुबर्सही अशा वेगवेगळय़ा ठिकाणी भेट देतात, तिकडच्या अनेक मनोरंजक गोष्टी त्यात सांगतात. इतकंच नाही तर त्या ठिकाणी जायचं कसं, कुठे राहायचं, काय खायचं याचीही इत्यंभूत माहिती दिली जाते. यामुळे अशा ठिकाणी भटकंती करायला जाणं सोप्पं होतं.
viva@expressindia.com