एखादा पदार्थ जगभरात पसरला की, तो कोणा एकाचा राहत नाही. त्यावर सगळ्यांचाच हक्क निर्माण होतो. तरीही आपण त्या पदार्थाचे कूळ व मूळ शोधण्याचा प्रयत्न करतोच. प्रवासात एखाद्या अनोळखी व्यक्तीशी थोडासा परिचय झाला की, त्या व्यक्तीच्या आडनावावरून गाव, प्रांत, याचा अंदाज बांधणारी मंडळी असतात. त्यांच्यासारखंच पदार्थाचा प्रांत, गाव शोधण्याचा प्रयत्न आपल्याकडूनही नकळतपणे होतो. आपलाच गाववाला आहे हे कळल्यावर होणारा आनंद आणि पदार्थ मूळचा आपल्याच प्रांतातला आहे हे कळल्यावर वाटणारा आनंद यात भेद नसावा.
पावभाजीचा चाहता वर्ग मोठा आहे. भारतभरात पावभाजी आवडीने खाल्ली जाते. अगदी नेपाळमध्येसुद्धा आपल्याइतकीच छान पावभाजी सर्वत्र मिळते. जगभरात जिथे जिथे भारतीय पदार्थ पोहोचले आहे तिथे पावभाजीनेही आपले पाय रोवले आहेत. पण ही पावभाजी मूळची महाराष्ट्रीय आहे हे कळल्यावर ती आता सर्वाचीच होऊनही आपली असल्याचा अतिशय आनंद होतो.
मुळात भारतात पावाचं आगमन पोर्तुगीजांच्या येण्यानंतर झालं. त्यातही ब्रिटिश राज्यकर्त्यांमुळे पाव आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाला. त्याविषयी विस्ताराने नंतर कधी तरी जाणून घेऊ. पण पाव आपल्या न्याहारीचा भाग बनल्यावरच पावभाजीचा जन्म झाला. त्यातसुद्धा विशिष्ट कालखंडच दाखवायचा झाल्यास साधारण १८५० च्या दरम्यान, ब्रिटिश राजवटीत मुंबईत गिरण्यांचा सुकाळ होता. मिलमध्ये काम मिळणं ही चैन समजली जायची. मात्र या मिलच्या नोकरीने कामाच्या वेळांचे गणित पार बदलून टाकले. सामान्यपणे ९ ते ५ अशा वेळेत काम करणारा मुंबईकर गिरणी कामगार झाल्यावर मात्र सकाळ, दुपार वा रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करू लागला. दुपारची शिफ्ट रात्री १२ ला संपल्यावर वा रात्री १२ ची शिफ्ट सुरू होताना कामावर जाणारी वा सुटणारी मिल कामगार मंडळी काही वेळा रात्रीच्या वेळेत उभ्या राहणाऱ्या गाडीवर खाण्याचा कार्यक्रम उरकत. त्यातही ज्यांना पुन्हा कामावर जायचे असे त्यांना भरपेट जेवून चालणार नव्हते. पोटभर तरीही सुस्ती न आणणारा पदार्थ त्यांच्यासाठी गरजेचा होता. कारण मिलमध्ये काम कष्टाचे, थकवणारे होते.
अशा गरजेतून एखाद्या व्यवसायी खाऊ गाडीवाल्याकडून पावभाजीची निर्मिती झाली असावी. त्यातही मी अमुक पदार्थ निर्माण करतो असा अभिनिवेश नव्हता. उलट उरलेल्या काही भाज्यांतूनच गोळाबेरीज काही तरी बनवून द्यावे हा चटपटीतपणा होता. मात्र या मिल कामगारांच्या गरजेतून व कोणा गाडीवाल्या आचाऱ्याच्या कल्पकतेतून जे काही निर्माण झाले ते अचाट होते. पुऱ्या, रोटी, चपाती बनवायला वेळ जातो. त्यामुळे सोवळं गुंडाळून तिथे पाव आला आणि तयार झाली पावभाजी.
जगभरात ज्याला स्ट्रीट फूड म्हटलं जातं, त्यातच पावभाजीचा समावेश होतो. पण रस्त्यावर शिकून मोठा साहेब होणाऱ्या मुलाप्रमाणे पावभाजीनेही रस्त्यावरच्या खाऊगाडीवरून थेट पंचतारांकित हॉटेलपर्यंत मजल गाठली. आजही देशभरातल्या विविध शहरांमध्ये रात्रीच्या वेळी गाडीवर पावभाजी मिळतेच. किंबहुना विशिष्ट गाडीवर पावभाजी झक्कास मिळते म्हणून अगदी हायफाय पब्लिकही रात्रीच्या वेळी त्या गाडीवाल्याला गाठते. त्यामुळे स्ट्रीटफूडची ओळख पावभाजी विसरलेली नाही. तर दुसरीकडे साखरपुडा, वाढदिवस, किटी पार्टी, निरोप समारंभ या व अशा अनेक समारंभातही पावभाजी हवीच असते. महागडय़ा हॉटेलमध्ये ती तशीच खास सजावट घेऊन आपल्यासमोर येते.
कोणताही पदार्थ तेव्हाच लोकप्रियतेचा टिळा भाळी लावतो जेव्हा तळागाळातला वर्ग, मध्यमवर्ग व उच्चवर्गीय सर्वच जण त्याला आपलं मानतात. पावभाजीने या दृष्टीने नक्कीच वरचा क्रमांक पटकावला आहे. तरुणवर्गापासून दात नसल्याने पाव चावायला बरा म्हणणाऱ्या आजी-आजोबांपर्यंत पावभाजी सर्वाना आपलंसं करते. काही ठिकाणी पावभाजीचं भाजीपाव असंही नामकरण होतं. पण चव मात्र तीच फक्कड. यात आणखी एक गोम अशी की, काही पदार्थ फक्त हॉटेलातच बनतात वा घरी खूप तयारी करून बनवावे लागतात. पावभाजीचं तसं नाही. अगदी कालपरवापासून कुकिंग सुरू केलेल्या कन्यकेपासून काकूंपर्यंत कुणालाही ती बनवणं कठीण वाटत नाही.
पावभाजीवरची कोथिंबीर वा बटर म्हणजे वरवरची सजावट झाली. पण बारीक चिरलेल्या कांद्याच्या व लिंबाच्या स्वादासह थकल्याभागल्या जिवांना समाधान देऊ करणारी पावभाजी त्या सगळ्या भाज्यांच्या मिश्रणातून जो परिपूर्णतेचा अनुभव देते तेच तिचे मूळ व अस्सल रूप आहे. पावभाजी जगभरात पसरली तरी तिचा स्वभावधर्म मुंबईकरासारखा आहे. पटकन तयार होणारी, मिळून मिसळून जाणारी, खमंग झणझणीत, फास्ट व सर्वाना तृप्तीचा ढेकर देणारी !!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा