स्वयंपाक ही कला आहे की शास्त्र? दोन्हींचे थोडे थोडे गुण यात एकवटले आहेत. वास्तविक माणसाची सारी धडपड ही दोन वेळेच्या अन्नासाठीच असते. तरीही केवळ दोन वेळेचे उदरभरण या क्रियेपुरते मर्यादित न राहता प्राचीन काळापासून या अन्नावर कलात्मक प्रयोग करून पाहण्याची जी स्वाभाविक व मूलभूत हौस मानवाने दाखवली आहे, त्यातूनच पाकशास्त्र व पाककला यांचा उचित संयोग झालेला दिसतो.
एक काळ असा होता की, राजेमहाराजे यांच्या जिव्हांना सुखावणारे पदार्थ निर्माण करून राजकर्तव्य पार पाडणारे शाही बल्लवाचार्य पाककलेचे मुख्य आधार होते. राजेमहाराजांच्या आवडीचा विचार करून त्यांनी जी पाककला जोपासली. तिने खूपच वैविध्यपूर्ण आणि रोचक पदार्थाना जन्म दिला. यातले काही पदार्थ शाहीच राहिले तर काही पदार्थ आमजनतेसाठी खुले झाले. या दुसऱ्या वर्गातला खास पदार्थ म्हणजे मैसूर पाक.
या पदार्थाच्या नावातच त्याचा प्रांत दडला असला तरी ही मिठाई भारतभरात सगळ्या मिठाईच्या दुकानात हटकून मिळते. प्रांताच्या सीमारेषा या पदार्थाने केव्हाच ओलांडल्या आहेत. मात्र अस्सल आणि कमअस्सल हा भेद मात्र मिठाईच्या दुकानाच्या योग्यतेनुसार जाणवतोच. काही ठिकाणी अगदी मऊसूत वडीसारखा मिळणारा मैसूर पाक काही ठिकाणी मात्र बऱ्यापैकी खडबडीत रूप धारण करतो.
या पदार्थाची कुळकथा अशी की, विसाव्या शतकाच्या सुरुवातीस मैसूरमध्ये कृष्णराज वडियार याचे राज्य होते. राजाला नावीन्यपूर्ण पदार्थ खाण्याची आवडही होती. राजाच्या मूदपाकखान्यात काकासूर मदाप्पा हा निष्णात आचारी होता. एकेदिवशी राजा कृष्णारायासाठी जेवण बनवत असताना मदाप्पाला गोड पदार्थ म्हणून नवे काही बनवून पाहण्याची इच्छा झाली. त्याने आपल्या डोक्यानेच बेसन, तूप आणि साखरपाक यांचे मिश्रण बनवले आणि गोड पदार्थ म्हणून ताटात वाढले. याच कथेला काही ठिकाणी अशीही जोड आहे की, मदाप्पाच्या डोक्यात एखादा पातळसर पदार्थ होता पण ताटात वाढून राजाने प्रत्यक्ष खाईपर्यंत हे मिश्रण वडीसारखे घट्ट झाले. ही जोड पटत नाही. कारण भले एखादा नवा पदार्थ प्रयोग म्हणून करून पाहताना आपल्या डोक्यात वेगळंच काही तरी असतं आणि भलतंच काही घडतं हे मान्य केलं तरी मदाप्पा हा एक उत्तम आचारी होता. बेसन आणि साखरपाक वापराने हा पदार्थ पातळसर होईल ही कल्पना एखाद्या अनुभवी आचाऱ्याकडून बाळगली जाईल हे खरे वाटत नाही. तरी ही जोड बाजूला ठेवून मदाप्पाने वाढलेला हा गोड पदार्थ राजाला खूपच आवडला हे निर्विवाद सत्य आहे. राजाने मदाप्पाला पदार्थाचे नाव विचारले. मदाप्पाने फारसा विचार न करता मैसूर पॅलेसमध्ये जन्माला आलेल्या, त्या गोड पदार्थाला ‘मैसूर पाक’ असे नाव दिले आणि ही जगप्रसिद्ध मिठाई जन्माला आली.
वास्तविक राजवाडय़ात जन्माला आलेल्या पाककृती ‘आम’ न होऊ देण्याकडे शाही लोकांचा कल असतो. मात्र राजा कृष्णराज वडियार याबाबतीत उदारमनाचा असावा. त्याने स्वत:हून मदाप्पाला मैसूर पॅलेसबाहेर या पदार्थाची विक्री करण्यास अनुमती दिली. आपल्या प्रजेनेही हा गोड पदार्थ चाखून पाहावा ही राजाची इच्छा होती. त्याप्रमाणे मदाप्पाने आपले दुकान थाटले आणि काहीच दिवसात मैसूर पाक दाक्षिणात्य मिठाईचा आकर्षण बिंदू ठरला. दसऱ्यानिमित्त होणाऱ्या दहा दिवसांच्या उत्सवात दक्षिणेमध्ये वैविध्यपूर्ण पदार्थाची अक्षरश: रेलचेल असते. एकावन्न विविध प्रकारची पक्वान्ने नैवेद्य म्हणून दाखवली जातात. परंतु या सर्व पदार्थामध्ये मैसूरपाकाचे स्थान अग्रणी आहे. या पदार्थाशिवाय या नैवेद्याचा विचारच होऊ शकत नाही.
ही झाली मैसूरपाकाची कुळकथा. आपण आज या मिठाईचा उल्लेख पूर्णपणे क्वचितच करतो. साधारणपणे मैसूर या एका शब्दातच सगळं काम आटपतं. इतकी र्वष ही मिठाई खाताना मैसूर हे नाव असूनही त्यामागे कृष्णराज वडियार, मदाप्पा, मैसूर पॅलेस यांचा संदर्भ असावा, अशी शंकाही मनात आली नव्हती. बऱ्याच वेळा बाहेरगावी जाताना मिठाई घेऊन जायची असेल वा काही दिवस टिकणारा मिठाईचा पर्याय हवा असेल तर मैसूरचं नाव पहिलं घेतलं जातं. कोकणात गणपतीला जाणारी मंडळी अनेक र्वष मैसूरपाक सोबत न्यायची. याचे कारण खवा, मावा आणि पाण्याचा अंश नसल्याने ही मिठाई चांगली टिकते. उपयुक्ततेच्या दृष्टीने आणि टिकण्याच्या बाबतीत मैसूरपाक अगदी नंबर एक. मैसूरपाकाचा पिवळसर तपकिरी रंग, घनचौकोनी आकार पाहताना त्याची ती जाळीदार नक्षी आपल्या मनावर उमटतेच पण तुपाचा स्निग्धभावही नकळत जिभेवर रेंगाळतो. शाही घराण्याचा वारसदार असूनही सामान्य जीवनात इतका छान मिसळून गेलेला हा मैसूरपाक त्याच्या ‘आम’ असण्यानेच भावून जातो.