|| स्वप्निल घंगाळे
‘चल म्हणजे तुला रंगाबद्दल काही कळतच नाही असं म्हणता येईल,’ रमेश रागातच बोलला.
‘अरे, पण मी रंगपंचमी खेळत नाही म्हणजे मला रंगांचं ज्ञान नाही किंवा मी अरसिक आहे असा त्याचा अर्थ होत नाही ना मित्रा,’ समीरने आपला मुद्दा अगदी शांतपणे मांडला.
‘नो हार्ड फिलिंग्ज, पण रंगपंचमी न आवडणारे नॉर्मली अरसिकच असतात असं मलाही वाटतं,’ मधूनेही रमेशची बाजू घेतली.
‘काहीही बोलता तुम्ही राव. आता एखाद्याला नसेल आवडत रंगपंचमी. त्याच्या सेलिब्रेशनच्या व्याख्या वेगळ्या असतील तर त्यासाठी त्याच्यावर टीका करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने साजरा करा, तो त्याच्या पद्धतीने करेल. मुद्दा सणाचा आनंद घेण्याबद्दलचा आहे. ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या परीने तो घ्यावा, असं नाही का वाटतं तुम्हाला?’, नेहमी शांत असणाऱ्या राणीने मध्येच उडी घेत भडाभडा आपलं मत मांडल्यानंतर ग्रुपमध्ये थोडी शांतता झाली. मग हळूच कोणी तरी म्हणालं, ‘बासं झालं रे रंगपंचमीपुराण, ज्याला जशी हवी तशी खेळा, सध्या तरी विषय बदला.’ अन् अशा पद्धतीने रंगपंचमी विषयावर कॉलेज कट्टय़ावर ‘रंगलेली’ चर्चा तासाभरानंतर संपली.
खरोखरच सध्या नाक्यावर, कट्टय़ावर किंवा अगदी व्हॉट्सअॅपवर थोडय़ा फार फरकाने रंगपंचमी खेळणारे विरुद्ध रंगपंचमी न खेळणारे असे ‘शीतयुद्ध’ सुरू असल्याचं दिसतं आहे. सामान्यपणे रंगांचा उत्सव असणाऱ्या रंगपंचमीबद्दल परदेशातील अनेकांनाही आकर्षण आहे. अनेक परदेशी नागरिक रंगपंचमी खेळण्यासाठी भारतात येतात, पण दुसरीकडे हल्ली रंगपंचमी न खेळणाऱ्या तरुणांचं प्रमाणही वाढताना दिसतं आहे. अनेकांना लहानपणी आवडणारा हा रंगांचा खेळ आता वेगवेगळ्या कारणांनी नकोसा वाटतो. ‘मला मुळात अंगभर रंग लावून नंतर तो काढण्यासाठी कष्ट घेणं चुकीचं वाटतं. त्यामुळे मी रंगांची रंगपंचमी खेळतच नाही. खरं तर रंगपंचमीच खेळत नाही. त्याऐवजी मी दुपापर्यंत घरी निवांत झोपा काढते आणि नंतर संध्याकाळी मित्रमैत्रिणींना भेटायला बाहेर पडते,’ असं मृणालिनी साळुंखे सांगते. मृणालिनीसारखे अनेक जण आहेत, जे केवळ रंगापासून वाचण्याच्या उद्देशाने कोणत्याच प्रकारची रंगपंचमी खेळत नाहीत, तर दुसरीकडे कोरडी रंगपंचमी म्हणजेच ड्राय रंगपंचमी खेळणाऱ्यांचं प्रमाणही वाढताना दिसते आहे. पक्के रंग लावण्याऐवजी केवळ कोरडय़ा रंगांनी रंगपंचमी खेळल्याने रंगपंचमी खेळल्याचाही आनंद मिळतो आणि अंगावरून रंगही पटकन निघतो. ड्राय रंगपंचमीबरोबरच अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने रंगांचा कमी वापर करावा लागेल अशा पद्धतीची रंगपंचमी खेळताना दिसतात. यामध्ये अगदी टिळा रंगपंचमी (गंध लावल्याप्रमाणे एक टिक्का कपाळी लावून खेळली जाणारी रंगपंचमी), नैसर्गिक रंगांनी खेळलेली रंगपंचमी, रंगांऐवजी केवळ पाण्याने खेळलेली रंगपंचमी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होतात. मुळात रंगांबद्दल किती आपुलकी आहे यावरून हल्ली कोणत्या प्रकारच्या रंगपंचमीत सहभागी होता येईल हे ठरवले जाते.
अनेक मुली तर रस्त्यावर येता-जाता अनोळखी मुलांकडून (लहान-मोठय़ा सगळ्याच वयाच्या) होणाऱ्या पिशव्यांच्या माऱ्यामुळे रंगपंचमी खेळायला जाणं टाळतात. ‘बुरा ना मानो होली हैच्या नावाखाली मुलींना टार्गेट करण्याचं प्रमाण आजही बरंच आहे. त्यामुळे साहजिकपणे मुली आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने रंगपंचमीच्या दिवशी बाहेरच पडत नाहीत,’ असं मत सायलीने नोंदवलं. अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने रंगपंचमी खेळली जाते त्या पद्धतीकडे बघता मुली दुपापर्यंत घरातच थांबणं पसंत करतात. आपल्या सोसायटीमध्ये किंवा ओळखीच्यांबरोबर रंगपंचमी खेळणाऱ्या महिलांचं प्रमाण बरंच असलं तरी बाहेर जाऊन, बाइक्सवरून शहरभर हिंडत रंगपंचमी खेळणाऱ्यांमध्ये मुलांचंच प्रमाण अधिक आहे.
तुम्ही रंगपंचमी का खेळता, असा प्रश्न विचारल्यास अनेक जणांची उत्तरं पुढीलप्रमाणे असतात : रंग खेळायला आवडतात म्हणून, रंगपंचमीच्या निमित्ताने अनेकांची भेट होते म्हणून, वर्षांतून एकदाच येणारा सण मित्रमैत्रिणींबरोबर साजरा करता येतो म्हणून. आता असाच प्रश्न रंगपंचमी न खेळणाऱ्यांना विचारला तर त्यांची उत्तरं अगदीच धम्माल आणि खासगी कारणं असणारी आहेत. म्हणजे रंगपंचमी का खेळत नाही याला, ‘कितीही अंग घासलं तरी कानात आणि नखांमधला रंग निघत नाही आणि चार-पाच दिवस तो रंग अंगावर घेऊन फिरावं लागतं. ते मला आवडत नाही म्हणून मी रंगपंचमी खेळत नाही’, असं दीपश्री आपटे सांगते. दीपश्रीसारखे अनेक जण आहेत जे रंग निघत नाहीत आणि नंतर तो अंगावर चार दिवस घेऊ न फिरायला आवडत नसल्याने रंगपंचमी खेळत नाहीत. याव्यतिरिक्त पाण्याची नासाडी करायला आवडत नाही, रंग लावून परत तासभर अंघोळ करत अंग घासत बसणं इल्लॉजिकल वाटतं, रंगपंचमी खेळण्याची पद्धत नियमांना धरून राहिलेली नाही, रंगपंचमीच्या दिवसांत अनोळखी लोकांकडून होणाऱ्या त्रासामुळे हा सण आवडत नाही अशी अनेक वास्तव कारणंही रंगपंचमी न खेळणाऱ्यांकडे आहेत. दोन्ही बाजू त्यांच्या त्यांच्या जागी योग्य वाटतात इतक्या प्रभावीपणे अनेक जण रंगपंचमी खेळण्याचं आणि न खेळण्याचं समर्थन करतात.
रंगपंचमी खेळणाऱ्यांचा दिनक्रमही साधारणपणे ठरलेला असतो. सकाळी उठून रंगपंचमी खेळण्यासाठी घराखाली जायचं, पुढील काही तास मनसोक्त रंगपंचमी खेळायची, दुपारी बारापर्यंत घरी यायचं, अंघोळ वगैरे करून एकच्या सुमारास जेवून दुपारची वामकुक्षी या दिवशी हक्काची झोप असते ती घ्यायची, संध्याकाळी निवांत घरी पडून राहायचं किंवा भटकायला जायचं. तर रंगपंचमी न खेळणाऱ्यांचंही थोडं फार ठरलेलंच असतं. सकाळी निवांत नऊ -दहापर्यंत उठायचं, खिडकीत उभं राहून बाकी लोक कसे एकमेकांना रंगवतात हे लांबून पाहायचं, मग अंघोळ वगैरे करून ११च्या आसपास नाष्टा वगैरे करायचा, त्यानंतर रंगपंचमीचा उत्साह शांत होईपर्यंत टाइमपास. मग तो शांत झाल्यानंतर दुपारचं जेवण करून बाहेर पडायचं. समविचारी रंगपंचमी न खेळणाऱ्या ग्रुपला भेटायला एकदा दुपारी बाहेर पडलं की थेट संध्याकाळी किंवा रात्री घरी दर्शन द्यायचं. रंगपंचमी न खेळणाऱ्यांपैकी काही ग्रुप थेट सकाळीच ब्रेकफास्ट लाँग ड्राइव्हच्या नावाखाली अगदी लोणावळा, तळेगाव, इगतपुरीसारख्या ठिकाणी जातात. दुपारी रंगपंचमीचा उत्साह थोडा कमी झाला की मग घराकडे परतात.
एकंदरीतच काय, रंगपंचमी हा ज्याप्रमाणे रंगांत रंगून साजरा करण्याचा सण आहे तसाच तो साजरा न करणाऱ्यांचाही सण आहे. ‘बुरा ना मानो होली है’प्रमाणेच ‘बुरा ना मानो रंग नही खेलने है’ म्हणत वेगळ्या पद्धतीने रंगपंचमीचा दिवस एक उनाड दिवस म्हणून साजरा करणाऱ्यांनाही त्यांच्या मनाप्रमाणे जगू द्यायला हवं. आणि अर्थातच, काळानुसार पाणी वाचवणं, मुला-मुलींची सुरक्षितता, रंगांची अॅलर्जीसारख्या अनेक गोष्टी उद्भवत असल्याने सण साजरा करताना त्याचं स्वरूप बदलणाऱ्यांचंही स्वागत करायलाच हवं! मनापासून रंगपंचमी खेळणाऱ्या आणि न खेळणाऱ्या सर्वाना रंगपंचमीच्या शुभेच्छा!