मितेश रतिश जोशी
हनिमून म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात. ही सुरुवात पर्यटनाच्या माध्यमातून करण्याची परंपरा फार जुनी आहे.
लोणावळा, खंडाळा,
कोल्हापूरचा पन्हाळा,
बेंगलोर गोवा नि काश्मीरला,
कुटं कुटं जायाचं हनिमूनला?…
ऐंशीच्या दशकात धम्माल लोकप्रिय झालेले हे गीत. हनिमूनची संकल्पना आपल्याकडे बऱ्यापैकी रुळू लागली तो काळ. त्या काळानुसार फेमस असणाऱ्या या पर्यटन स्थळांचा उल्लेख आणि तिकडे जाण्याची इच्छा या गाण्यात व्यक्त करण्यात आली आहे. कालांतराने बेंगलोर, गोवा आणि काश्मीर ही महाराष्ट्राबाहेरची ठिकाणे चांगलीच विकसित झाली. त्याच जोडीने अनेक नवीन ठिकाणेदेखील आली.
हनिमूनमध्ये एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. जोडीदारासोबतचे नाते चांगले आणि अधिक घट्ट करण्यासाठी हनिमूनचे प्लॅनिंग करताना हटके ठिकाणी हे क्षण साजरे करावेत, अविस्मरणीय आठवणी जमा कराव्यात हा विचार अधिक असतो. त्यामुळे हनिमूनसाठी इतर राज्यांनाच नव्हे तर थेट विदेशातील हनिमून डेस्टिनेशन्सनाही पसंती दिली जाते. हनिमून हा मुळातच एक प्रकारची चैन या सदरात मोडणारा प्रकार असल्यामुळे अर्थातच इथे दोन पैसे जास्त खर्च करायची तयारी येथे असते. मात्र त्या जोडीला योग्य त्या सर्व सोयीसुविधा, सुरक्षितपणा, पॅकेजेस आणि त्याचबरोबर पर्यटनस्थळाची वैशिष्टय़पूर्णता असेल तरच त्या ठिकाणाला पसंती मिळते. या सर्व गोष्टींची पूर्तता हाच घटक सध्याच्या लोकप्रिय ठिकाणांमध्ये प्रकर्षांने जाणवतो. केरळ असो की उत्तरेतले कोणतेही हिलस्टेशन किंवा परदेशातील ठिकाणं. या सर्वच ठिकाणी खर्चाचा पुरेपूर मोबदला मिळतो हे दुर्लक्षून चालणार नाही.
हल्लीच्या हनिमून पर्यटनात दिखावा देखील खूप वाढला आहे. पर्यटन स्थळाबरोबरच हॉटेलची नावीन्यपूर्ण रचना, तेथील वातावरण, प्रत्येक खिडकीतून दिसणारा व्ह्य़ू, कॅण्डल लाइट डिनर वगैरे गोष्टींचं महत्त्व कमालीचं वाढलं आहे. इतरांना अशा गोष्टींबाबत सांगण्याची जी एक सहजप्रवृत्ती सध्या वाढलेली आहे वा सोशल मीडियावर टाकण्याचा वाढता सोस त्याचेच हे द्योतक म्हणावे लागेल. पर्यटन स्थळातील नावीन्यताही नवविवाहित जोडप्यांसाठी महत्त्वाची असते. त्यामुळेच एखाद्या नेहमीच्या ठिकाणाला जोडून वेगळी दोन ठिकाणं पाहण्याकडे जोडप्यांचा कल असतो. वन्यजीव, अभयारण्ये, साहसी पर्यटन, ग्रामीण पर्यटन अशा प्रकारांना त्यातून चांगलाच वाव मिळू लागला आहे.
हेही वाचा >>> सरत्या वर्षातले फॅशन ट्रेंड्स
हनिमूनसाठी गोव्याला सर्वाधिक पसंती दिली जाते. याची अनेक कारणं देता येतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या आर्थिक गणितात बसतील अशी राहण्याची-खाण्याची ठिकाणं इथे उपलब्ध आहेत. समुद्रकिनारी सुशेगात राहण्यासाठी खिसा हलका करण्याची तयारी आहे, अशांसाठी इथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसह अनेक मोठी हॉटेल्स उपलब्ध आहेत, बीच रिसॉर्ट्स आहेत. यामध्ये सर्व पंचतारांकित लक्झरी सुविधा देण्यात येतात. त्याच वेळी समुद्रकिनाऱ्याजवळ राहूनही परवडतील अशी हनिमून पॅकेज देणारी हॉटेल्स, बेड अँड ब्रेकफास्ट सुविधा देणारी गेस्ट हाऊस असे बजेट पर्यायही आहेत. सर्व स्तरांतील पर्यटकांना परवडतील अशी राहण्याची व्यवस्था गोव्यात आहे. भारतात खूप कमी ठिकाणी गोव्यासारखे मोकळे वातावरण अनुभवायला मिळते. इथे विदेशी पर्यटकांचा राबता असल्याने हे सर्वसमावेशक सांस्कृतिक मोकळेपण टिकून राहिले आहे, त्याचेही पर्यटकांना आकर्षण असते. गोव्यातले बीच प्रामुख्याने प्रसिद्ध आहेत ते स्वच्छतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी. गोव्याचं नाइट लाइफ हाही सगळ्यांसाठी मोठा आकर्षणाचा विषय आहे. एकदा तरी हे नाईट लाइफ अनुभवण्यासाठी म्हणून पर्यटक गोव्यात येतात. क्रूझ आणि कॅसिनोसाठी गोवा प्रसिद्ध आहे. पणजीला मांडवीच्या काठाजवळ काही भव्य कॅसिनो उभे आहेत. एक वेगळं जग बघण्यासाठी आणि भाग्य अजमावण्यासाठी कॅसिनोची चक्कर मारायला हरकत नाही. पणजीतच मांडवीच्या किनाऱ्यापासून मिरामार बीचपाशी असलेल्या संध्याकाळच्या क्त्रस्ूझचा अनुभव घ्यायला लहान-थोर सगळेच जातात. या क्त्रस्ूझवर गोवन संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या नृत्याचे-गाण्यांचे कार्यक्त्रस्म असतात तसा ‘डीजे’ही असतो. हनिमूनसाठी आलेल्या कपल्सना अशी ‘सार्वजनिक’ क्रूझ नको असेल तर खासगी आलिशान क्रूझ सेवा देणारी काही महाकाय जहाजंदेखील गोव्यात आहेत. आतल्या सुविधांनुसार यांचे दर असतात. ऑल नाइट क्रूझ हा प्रकारही इथे दिसतो. या आलिशान क्रूझवर हनिमून कपल्सना अपेक्षित प्रायव्हसी मिळू शकते.
हनिमूनच्या निमित्ताने पर्यटन करताना थोडी काळजी देखील घ्यायला हवी. लग्नानंतर लगेचच हनिमूनला निघण्याचे प्लॅनिंग शक्यतो असू नये, यामागचे कारण असे की लग्नानंतरही पुढचे काही दिवस विवाहविधी सुरू राहतात, त्यामुळे जोडपे आधीच खूप थकलेले असते आणि त्याच घाईत सर्व विधी आटपून हनिमूनला पर्यटनासाठी पोहोचल्यावर त्याचे परिणाम प्रकृतीवर आणि पर्यायाने सगळ्याच नियोजनावर होतात. त्यापेक्षा लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर दोन-तीन दिवस विश्रांती घेऊनच हनिमूनला जावे. हनिमून हाही जणू एक टास्क वाटेल अशापध्दतीने नियोजन करणे टाळावे. हनिमूनच्या निमित्ताने केलेला प्रवास ही एकमेव गोष्ट आहे जी अपेक्षांचे ओझे खांद्यावर देते, त्यामुळे या काळात जोडीदाराकडून फार अपेक्षा ठेवू नका. हनिमूनमध्ये तुम्ही दोघे भावनिकदृष्ट्या कसे जवळ येऊ शकता. एकमेकांना पती-पत्नी म्हणून स्वीकारून वैवाहिक जीवनात पुढे कसे जाऊ शकता ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्यादृष्टीने आनंददायी अनुभव घेता येईल अशा हनिमून डेस्टिनेशनची निवड करा. तरच मधुचंद्राचा हा गोडवा आयुष्यभराच्या तुमच्या प्रवासात साथ देत राहिल.
viva@expressindia.com