कॉलेजची परीक्षा जवळ आल्येय नि ती कशी पार पडेल, याची काळजी वाटत्येय ना? नुसती काळजी वाटणं ठीक; पण तिचं रूपांतर स्ट्रेसमध्ये झाल्यास पोटात दुखणं, झोप न लागणं, भूक कमी होणं किंवा अति खाणं अशी लक्षणं दिसतात. यामुळं आपली चिंता वाढते. तब्येत खालावते. मन अस्थिर होतं. हे टाळण्यासाठी थोडी काळजी घेतलीत, तर हा ताण निवळेल. कसा ते पाहू या.
स्ट्रेस नको, स्टडी करा
* आपला अभ्यास झाला नसेल तर टेन्शन येतं. म्हणून सातत्यानं अभ्यास करायची सवय लावा.
* किमान परीक्षेची तारीख कळल्यावर तरी अभ्यासाला लागा. लेक्चरनंतर लगेच आपल्या नोटस् वाचल्यात तर तो टॉपिक चांगला लक्षात राहतो. या नोटस् रेफरन्स वर्क करून आपल्या शब्दांत काढणं चांगलं.
* अपेक्षित प्रश्नांचा अभ्यास सगळेच करतात. काही अनपेक्षित प्रश्नांचा अभ्यासही करावा.
* वेळ लावून प्रश्नोत्तरांचा सराव करावा.
* परीक्षेच्या ताणापोटी रात्रभर जागण्यात काहीच पॉइंट नाहीये. त्यापेक्षा अभ्यासाचं टाइमटेबल तयार करून ते फॉलो करा.
* सलग अभ्यास करण्यापेक्षा मध्येच दहा मिनिटांचा छोटा ब्रेक घ्या. या ब्रेकमध्ये एखादी फेरी मारणं, टीव्ही बघणं, खाणं इत्यादी करा.
* मन:पूर्वक समजून-उमजून अभ्यास करा. पाठांतर नको.
* कमीत कमी लक्ष विचलित होणाऱ्या ठिकाणी बसून अभ्यास करा.
* केवळ अभ्यास एके अभ्यास न करता पोषक आहार घ्या नि थोडासा व्यायामही करा.
* परीक्षेच्या काळात पुरेशी झोप घ्या.
* आधीच्या परीक्षेतील मार्काचा परिणाम अभ्यासावर होऊ शकतो. तो होऊ न देता आताच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.
* प्रॅक्टिस टेस्टना दांडय़ा मारण्यात अर्थ नाही. त्या द्यायला हव्यात.
* अभ्यासाच्या वेळी करिअरविषयी विचार करू नका.
* स्ट्रेसफुल विचारांना मनाच्या कोपऱ्यात न ढकलता ते लिहून काढा. या नकारात्मक वाक्यांपुढं सकारात्मक वाक्यं लिहून त्या दिशेनं विचार करा. दीर्घश्वसन करून रिलॅक्स व्हायचा प्रयत्न करा.
* यशाचं दिवास्वप्न पाहणं चूकच आहे. पण आपल्याला पेपर चांगले गेल्येत आणि चांगले मार्कस् मिळाल्येत, असा विचार करून बघा. अर्थात त्यासाठी अभ्यासाचा फक्त विचार न करता तो प्रत्यक्षातच करायला हवा.
* अभ्यास करूनही स्ट्रेस वाटत असेल तर पालकांशी, मित्रांशी, शिक्षकांशी प्रसंगी काऊन्सेलरशी बोलून मन मोकळं करा.
* प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी उत्तरं लिहिण्याआधी सगळे प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या. म्हणजे पेपरचं स्वरूप लक्षात येऊन तसं वेळेचं नियोजन करता येईल.
* प्रश्नांबाबतच्या सूचना लक्ष देऊन वाचा. ज्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित येताहेत, ते प्रश्न आधी सोडवा. मन शांत ठेवा.
* वेळेआधी पेपर लिहून झाला तरीही तो घाईनं न देता सगळी उत्तरं पुन्हा वाचून काढा.
* अभ्यास कसा होणार याची चिंता करण्यापेक्षा तो कसा करावा, याचं टेक्निक आत्मसात करा. प्रत्येकाच्या कपॅसिटीनुसार त्यात बदल होणार, हे लक्षात ठेवा.
* वेळेचं नियोजन करा.
* अभ्यासाचा प्राधान्यक्रम ठरवून घ्या. पण ‘हा टॉपिक नंतर करेनठ, असा दृष्टिकोन ठेवू नका.
* ठरवलेल्या टाइमटेबलप्रमाणं अभ्यास होतोय ना, ते चेक करा.
* पुस्तक-नोट्सची पानं नुसती न चाळता त्यातील सार समजून घ्या.
* जे वाचाल त्याचं शब्दचित्र डोक्यात पक्कं बसवल्यास ते लक्षात राहील.
* वाचणं, आठवण्याचा प्रयत्न करणं आणि पुन्हा वाचणं ही पद्धत वापरा.
* मोबाइल, सोशल साइटस्, टीव्ही या अडथळ्यांना पार करायला शिका. परीक्षेच्या काळात त्यांच्यापासून लांबच राहा.
* पेपरला ट्रॅफिकचा विचार करूनच वेळेवर पोहचा.
* पेपर लिहिताना एकाच पोझिशनमध्ये न बसता मधूनमधून ती बदलत राहा.
* मध्येच ब्लँक झालात तर तिथंच न थांबता पुढचा प्रश्न लिहायला घ्या. ते उत्तर नंतर आठवेल.
* पेपरला गेल्यावर पॅनिक व्हायला झाल्यास मनाची समजूत घाला. ते स्थिर ठेवून सकारात्मक विचार करा. डोळे मिटून दीर्घ श्वास घ्या आणि श्वास हळूहळू सोडून रिलॅक्स व्हा. आपल्याला सगळं नीट आठवतंय नि सगळी उत्तरं येणारेत, असा निश्चय करा.
* सगळे प्रश्न अर्धवट सोडवण्यापेक्षा नीट येणारे प्रश्न पूर्ण सोडवा.
* परीक्षेच्या वेळी थोडी भीती वाटणं हे स्वाभाविक आहे, हे लक्षात घेऊन न घाबरता पेपर सोडवा.
* पेपर सोडवून झाल्यावर त्याचा विचार करण्यापेक्षा पुढच्या पेपरच्या तयारीला लागा.
संतुलित आहार, स्ट्रेसला बायबाय
* संतुलित आहार गरजेचा असून दिवसातून पाच-सहा वेळा थोडं थोडं खा.
* खाकरा, पोहे, उपमा, इडली इत्यादी स्नॅक्स खा.
* टीव्हीसमोर बसून खाणं आणि फास्ट फूड खाणं टाळा.
* उन्हाळ्याचे दिवस असल्यानं जास्तीत जास्त पाणी, रसदार फळं, आवळा-िलबू सरबत प्या.
* सूप्स, सलाड असा हलका आहार घ्या.
* रात्री झोपायच्या आधी ग्लासभर दूध प्या.
* आहारात मोड आलेली कडधान्यं, संत्रं, पालेभाज्या, रताळं, सोयाचा समावेश करा.
* अतितेलकट, गोड, प्रिझव्र्हेटिव्ह असणारे पदार्थ आणि चहा, कॉफी, कोल्डिड्रक्स टाळा.
एक्झाम अॅण्ड ड्रेस सेन्स
* आपण सकाळी घरातून कसे बाहेर पडतो, यावर आपला दिवसभराचा मूड अवलंबून असतो. म्हणूनच परीक्षेच्या दिवसांत आपल्याला प्रसन्न वाटेल, असा ड्रेस घालावा.
* उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता हलके-सुती कपडे घालावेत.
* पेपर लिहिताना ड्रेस सांभाळण्याकडं लक्ष द्यावं लागणार नाही, याची काळजी घ्यावी.
* एरवीचे फंकी कपडे घालणं टाळावं.
* आठवडाभरचे कपडे आधीच इस्त्री करून ठेवल्यास ऐन वेळची धावपळ वाचेल.
* उन्हाची तलाखी टाळ्यासाठी टोपी, स्कार्फचा वापर करावा.
* आरामदायी शूज वापरावेत.
* हे सगळे फॅक्टर्स लक्षात ठेवा. झोकून देऊन अभ्यास करा. तुमचं यश तुमच्याच हातात आहे.
संकलन : राधिका कुंटे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा