माझं वय २० र्वष आहे आणि वजन ४५ किलो. मी नेहमी पंजाबी ड्रेस, कुर्ता-पजामा आणि लेगिंग्ज-टॉप घालते. केसाला साधासा चाप लावते. मी कधीच जीन्स घातलेली नाही. मला फॅशनबद्दल काहीच माहिती नाही. फॅशनेबल बनायचे असेल तर काय कपडे घालायचे, कसे राहायचे याबद्दल काही सुचवा.
– संध्या
तुझ्या वयाच्या मुलीला लेटेस्ट ट्रेंड्स खरं तर मी सांगायची गरज असता कामा नये. तू २० वर्षांची आहेस म्हणजे कॉलेजला जाणारी असशील आणि कॉलेजमध्ये तर लेटेस्ट फॅशनचे कपडे शंभर टक्के दिसतातच. आजूबाजूच्या मुलींकडे पाहिलं की, कुठली फॅशन चलतीत आहे, हे समजतंच. कदाचित तुलाच कधी आपण फॅशनेबल राहावं आणि त्यासाठी प्रयत्न करावेत असं वाटलं नसेल म्हणून तुझं त्याकडे लक्ष नसणार. आणि म्हणूनच तू म्हणते आहेस की, फॅशनबद्दल माहिती नाही. पण एक चांगली गोष्ट म्हणजे आता तुला फॅशनबद्दल जाणून घ्यायचंय.
आता बेसिकपासून सुरुवात करू या. तू ज्यामध्ये कंफर्टेबल असशील आणि तुला वावरायला जे कपडे सोयीचे वाटतील, जे कपडे तू व्यवस्थित कॅरी करू शकशील, असेच कपडे घातले पाहिजेस. तू सांगतेस त्याप्रमाणे तू कधीच वेस्टर्न स्टाईलचे कपडे घातलेले नसशील तर एकदम तसे कपडे फॅशन म्हणून घालण्याची घाई करू नकोस. कारण तसं केलंस तर अशा कपडय़ात तू अवघडून जाशील आणि ते तुझ्या चेहऱ्यावर दिसेल. एक कायम लक्षात ठेव, फॅशनेबल असणं म्हणजे वेस्टर्न वेअर किंवा अंगप्रदर्शन करणारे कपडे घालणं असा अर्थ अजिबात होत नाही. भारतीय फॅशन ही जगभरात नावाजलेली आहे. ती बेस्ट स्टाईल मानली गेली आहे. थोडक्यात काय.. तुला ड्रेस, कुर्ता वापरायला आवडत असेल तर तसेच वापर. पण कुर्त्यांमध्ये लेटेस्ट ट्रेंडचे कुर्ते आणि ड्रेसेस वापरशील असं बघ. लेटेस्ट ट्रेंड कुठला ते कळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुझ्या आसपासच्या कॉलेजच्या मुलींकडे बघ. कुठल्या प्रकारचे कुडते त्या वापरत आहेत, त्यांचे नेक पॅटर्न कसे आहेत, कुठलं कापड वापरलेलं आहे, त्यावरचं डिझाईन, त्यांचे कट्स कसे आहेत, हे डोळसपणे बघ. वर्तमानपत्रात, मासिकांमधून येणारी फॅशनविषयक सदरं आणि लेख वाच किंवा सरळ गुगलवर सर्च कर. बाजारात फिरून फॅशनचा अंदाज घे. तरुण मुली जिथून खरेदी करतात अशा ठिकाणी फीर. तिथे काय काय विकलं जातंय ते बघ. या सगळ्या उद्योगातून तुला लेटेस्ट फॅशनचा अंदाज येईल. एक महत्त्वाची गोष्ट – फॅशन म्हणजे काही फक्त कपडे नव्हे. त्याबरोबर दागिने, अॅक्सेसरीज याकडेदेखील लक्ष हवं.
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे हल्ली मुली लाइट फॅब्रिक्सला प्रेफरन्स देताहेत. जॉर्जेट टॉप्स, शर्ट आणि कुर्ती वापरण्याला त्यांचं प्राधान्य दिसतंय. त्यामुळे जॉर्जेटचे ड्रेसदेखील डिमांडमध्ये आहेत. त्यावर बीड्स, मोती, धातूचं अँटिक काम याला मुली महत्त्व देताहेत. तू लेगिंग्जमध्ये कंफर्टेबल असशील तर प्रिंटेड लेगिंग्ज किंवा टेक्चर्ड लेिगग्ज ट्राय कर. त्या प्लेन ट्युनिक्सवर स्मार्ट दिसतात. शर्ट आणि टय़ुनिक्सवर बारिक पट्टा छान दिसतो. योग्य अॅक्सेसरीज वापरल्यानेसुद्धा ड्रेसिंग स्टाईलमध्ये मोठा फरक पडतो. ड्रेसिंगबरोबरच कशी दिसते आहेस, यानेही फरक पडतो. त्यामुळे त्वचा आणि केसांची योग्य काळजी घे. तुला मेक-अप करायला आवडत असेल तर लेटेस्ट लिप, आय आणि नेल कलर कोणता आहे तेदेखील बघ. मेक-अप करत नसशील तर बेसिक क्लिन्सिंग करून त्वचेची काळजी घे. तुझ्या चेहऱ्यावरची कोणती फीचर्स छान आहेत, ते लक्षात घे. म्हणजे काही लोकांचे डोळे छान असतात, त्यांनी काजळ लावून किंवा लायनर लावून ते हायलाइट केले तर छान दिसतात. लेटेस्ट हेअरस्टाईल काय आहे, ती बघून तीसुद्धा ट्राय कर. तू सुयोग्य कपडे घातलेस तर आपोआप आत्मविश्वास येईल. एकदा हा कॉन्फिडन्स आला की, सगळंच तुझ्यावर शोभून दिसेल. सो.. ऑल द बेस्ट!
तुमचे प्रश्न पाठवा
तुमच्या फॅशनविषयीच्या शंका आमच्याकडे पाठवा. फॅशन स्टायलिस्ट मृण्मयी मंगेशकर त्यांना या सदरातून उत्तर देतील. सब्जेक्टलाईनमध्ये फॅशन पॅशन लिहायला विसरू नका. आमचा आयडी- viva.loksatta@gmail.com