नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना आला की दिवाळी आणि लग्नाची धामधूम सुरू होते आणि बाजारात खरेदीला झुंबड उडते. स्त्रियांना सगळयात जास्त आवड असते ती म्हणजे दागिन्यांची. आजकालच्या स्त्रिया प्रत्येक पोशाखावरती साजेसे दागिने परिधान करतात. सोन्या-चांदीबरोबरच बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या खडय़ांच्या रंगाचे दागिने सध्या उपलब्ध आहेत. सणासुदीच्या निमित्ताने हमखास दागिन्यांची खरेदी केली जाते. पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांना मागणी असतेच, ती यंदाही आहे. पण तरुण, मेट्रोपॉलिटन मुली सध्या व्हाईट गोल्ड आणि प्लॅटिनमला पसंती देत आहेत. याशिवाय वेगवेगळ्या रंगाचे खडे वापरून केलेले दागिनेसुद्धा सध्या चलतीत आहेत. सेमीप्रेशियस स्टोन्स ही सध्याची इन थिंग असल्याचे जाणवले.
सध्या कुठल्या प्रकारच्या दागिन्यांचा ट्रेंड आहे?  या विषयी अॅडरनॉलॉजिस्ट वरुणा डी जानी यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, ‘आजची तरुणी आधुनिक आहे. साधा दागिना घ्यायचा निर्णयसुद्धा ती विचारपूर्वक करते. केवळ घ्यायचा म्हणून सोन्याचा दागिना घेऊन तो वर्षांनुवर्ष लॉकरमध्ये ठेवून देणं तिला मान्य नाही. त्याऐवजी वापरायला सोयीचा, कुठल्याही कपडय़ांवर सूट होईल असा दागिना घेण्याकडे तिचा कल दिसतो.’
योग्य दागिन्यांची निवड कशी करावी, या संदर्भात बोलताना वरुणा म्हणाल्या, ‘स्त्रियांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे दागिने घातले पाहिजेत. समारंभाचं महत्त्व लक्षात घेऊन दागिन्याची निवड करावी. दागिना खरेदी करताना आपल्या चेहऱ्याची ठेवण, व्यक्तिमत्त्व लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. चेहऱ्याला सूट होईल, असाच दागिना निवडावा. व्यक्तीपेक्षा दागिना लक्षवेधी, मोठा ठरता कामा नये हा नियम कायम लक्षात ठेवला पाहिजे.

दागिन्यांबाबत टीप्स
* दागिन्यांची निवड करताना त्वचेचा रंग, व्यक्तिमत्त्व आणि चेहऱ्याची ठेवण या गोष्टींची काळजी घ्यावी.
* दागिना विकत घेताना त्याचे कलर कॉम्बिनेशन पोशाखाला साजेसं आहे की नाही याची पडताळणी करावी.
* ज्यांच्या चेहऱ्याची ठेवण गोल आहे किंवा ज्या स्त्रियांना डबल चिन आहे त्यांनी लोंबते कानातले परिधान करावे, जेणेकरून लोकांचं लक्ष डबल चिनकडे न जाता लोंबत्या कानातल्यांकडे आधी जाईल.
*  जॉ-लाइन सुंदर असणाऱ्या मुलींनी लांबवर जॉलाइनला जवळ जाणारी झुंबरं घालायला हरकत नाही.

Story img Loader