‘प्रेम अमर असतं असं म्हणतात. प्रेमाची नाटय़संहिता होते, तेव्हा ती खरंच अजरामर होते.. ’ सांगतोय  एक नवोदित नाटय़लेखक.
कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात प्रेमाची चाहूल लागते तेव्हा ते ‘प्रेम’ पहिल्यांदा मित्रांसमोर व्यक्त होत असतं. मित्रांसमोर व्यक्त होणं हे सहज सोप्प असतं. काहीही झालं तरी ते आपल्यासोबतच असतील हा विश्वाससुद्धा आपल्याला असतो. पण मी अशा अनेक स्टोरीज पहिल्यात की, व्यक्त होणं किंवा सोबत असणं ग्रँटेड धरलं जाऊ  लागतं आणि मग सगळं बिनसायला लागतं. मित्र आपल्याला मदत करतील या आशेवर जगणारे अनेक जण निराश होतात आणि प्रेम त्या व्यक्तीसमोर व्यक्त करायचं राहूनच जातं!
हे व्यक्त होणं बऱ्याच जणांना अवघड वाटतं आणि त्यामुळे कित्येक जणांचं प्रेम अव्यक्तच राहतं! पण तरीही आयुष्यात वेळोवेळी व्यक्त होणं किती गरजेचं आहे हे शिकावंच लागतं. या गोष्टी हा एका विशिष्ट चक्रात घडत असतात आणि कोणीही या चक्रातून स्वत:ला सोडवून घेऊन ‘मोक्ष’ मिळवू शकत नाही. अशा अर्थाचं माझ्या नाटकाचं कथानक आहे.
मोक्ष म्हणजे माझ्या दृष्टीने स्वत:ला मोकळं किंवा स्वतंत्र करून घेणं. पण प्रेमात किंवा प्रेमकथेत अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपण सोडून देऊ  शकत नाही. लव्ह स्टोरी पूर्ण असो की अपूर्ण तिचं आपल्यासोबत असणं हे आयुष्यभरासाठीच असतं. त्यामुळे ते प्रेम, विचारांचं काहूर, भावनांचं थैमान या सगळ्या भावना सोबत घेऊनच आपल्याला पुढे जावं लागतं. सगळ्याच गोष्टी कायम सुखी किंवा दु:खी या मोजपट्टीत मोजता येत नाहीत. ही अपूर्णता अनेकांना इतरांपासून वेगळं करते व कदाचित पूर्णही!
त्यामुळेच मला असं वाटतं मोक्ष हा एक प्रवास आहे, दोन समांतर रेषांचा, भावनिक आणि व्यावहारिक जगातल्या कल्लोळाचा, अपूर्णतेचा! अर्थात हा अट्टहास आहे कोणाच्या तरी प्रेमकथेला अमरकथेकडे नेण्याचा! हे कदाचित स्वार्थी वाटू शकतं, पण म्हणतात ना प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं. या कथेला अमरत्व बहाल केल्यामुळे आणि ती नाटकाच्या माध्यमातून समोर आणल्यामुळे एखाद्याला वेळीच व्यक्त व्हावंसं वाटलं किंवा अव्यक्त राहिलेल्या एखाद्याने जर अपूर्णता स्वीकारली तर तेच माझ्यासाठी नाटकाचं खरं यश असेल!
मोक्ष या नाटकाचा पहिला प्रयोग आज (दि.१३ फेब्रुवारी) संध्याकाळी पुण्यात सुदर्शन रंगमंच इथे होत आहे. (प्रवेशमूल्य आहे.)
अक्षय लटपटे -viva.loksatta@gmail.com
(शब्दांकन – भक्ती तांबे)

Story img Loader