विनय नारकर – viva@expressindia.com

स्त्रिया पदराचा उपयोग अनेक प्रकारे करतात. निरनिराळी कामे करताना स्त्रिया पदर निरनिराळ्या पद्धतीने घेतात. देवपूजेच्या वेळेस, ज्येष्ठांना नमस्कार करतेवेळेस डोईवर असणारा पदर, चारचौघांत मिसळताना खांद्यावर येतो. पन्नास—साठच्या दशकांत महाराष्ट्रातील विदुषींची, खांद्यावरून पदर घेणे ही ढब ठरून गेली होती. पण स्त्रिया जेव्हा रांधायला सुरुवात करतात किंवा कुठलंही अंगमेहनतीचं काम करतात तेव्हा पदर कमरेला विळखा घालून पुढे खोचतात. असा पदर उरक आणि बळ देतो.

Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
last show of Vastra Haran in new set was held today in Thane
नव्या संचातील ‘वस्त्रहरण’चा शेवटचा प्रयोग आज ठाण्यात, नेत्यांनाही भुरळ
Eknath Shinde bag checking
CM Eknath Shinde : “बॅगेत फक्त कपडे, युरिन पॉट…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याही सामानांची तपासणी!
shivani rangole shares beautiful birthday wish post for kavita medhekar
“ताई तुझ्याकडून कायम…”, ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची खास पोस्ट! कविता मेढेकर कमेंट करत म्हणाल्या…

‘पदर’ हे साडीच्या रचनेतील एक महत्त्वाचे अंग. पदर वस्त्राचा फक्त एक भाग राहिला नाही, तो समाजमनाच्या जिव्हाळ्याचा विषय बनला. पदर मराठी काव्यामध्ये बऱ्याचदा प्रतिमा म्हणून वापरला गेला, तसेच म्हणी, वाक्प्रचार यांमध्ये सर्रास वापरला गेला. एखाद्या भाषेतील म्हणी व वाक्प्रचार हे त्या समाजातील लोकविचारांचे वाहक असतात. समाजमनाचे प्रतिबिंब त्यांत उमटलेले असते. लोकसाहित्य आणि वाक्प्रचार हे त्या समाजाशी एकरूप झालेले असतात. पदरामुळे आपल्या भाषेचे वैभव व लज्जत नक्कीच वाढली आहे. समाजमनाला ज्या बाबी अतिशय जिव्हाळ्याच्या वाटतात त्यांच्याच बाबतीत हे शक्य आहे. स्त्रियांच्या आयुष्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या टप्प्यांना पदराच्या प्रतीकाने मराठी भाषेत मांडले गेले. ते आपण मागच्या लेखात पाहिले. इतकेच नव्हे तर अनेक प्रकारच्या लोकसाहित्यातही पदरामुळे सुंदर प्रतिमांची भर घातली गेली.

स्त्रिया पदराचा उपयोग अनेक प्रकारे करतात. निरनिराळी कामे करताना स्त्रिया पदर निरनिराळ्या पद्धतीने घेतात. देवपूजेच्या वेळेस, ज्येष्ठांना नमस्कार करतेवेळेस डोईवर असणारा पदर, चारचौघांत मिसळताना खांद्यावर येतो. पन्नास—साठच्या दशकांत महाराष्ट्रातील विदुषींची, खांद्यावरून पदर घेणे ही ढब ठरून गेली होती. पण स्त्रिया जेव्हा रांधायला सुरुवात करतात किंवा कुठलेही अंगमेहनतीचे काम करतात तेव्हा पदर कमरेला विळखा घालून पुढे खोचतात. असा पदर उरक आणि बळ देतो. आणि भांडण करताना आवेशही हाच खोचलेला पदर देतो. याबाबत एका कवितेत अशी ओळ आली आहे, ‘गिर्कीस विस्तरे पदर, हाती ना बाकी। स्त्रियांच्या या लकबीवरूनच ‘पदर खोचून कामाला लागणे’ हा वाक्प्रचार रूढ झाला. हे पदर खोचणं एखाद्या रसिक शाहिराला कसे वाटले ते पाहा..

होनाजी बाळा आपल्या ‘सखे गुलअनार गुलचमन..’  या लावणीमध्ये  नायिकेने मागून पुढे गुंडाळून घेतलेल्या पदराला, चंदन वृक्षाला लपेटलेल्या नागिणीची उपमा देतो.

बांधिव बुचडय़ाची  लबक पदर सुबक खोविला तीपदरी वेणिचा।

चंदनढाळीस जसा लपेटा काळे नागिणिचा।

कवी विठ्ठलनाथाच्या एका गौळणीत राधिका शृंगारिक हावभाव कसे करते व त्यासाठी पदराचा वापर कसा करते याचे वर्णन येते. राधिकेचा रंग पाहुनि कृष्ण दंग जाहला वेणीफणी करून भांग काजळकुंकु  ल्याली चांग गोरे अंग चोळी तंग  दाखवी श्रीहरीला राधिकेचा झकाझोंक कृष्ण पाहूनि लावि नोक

जरापातळाचा झोंक  पदर सांवरीला एकनाथांनी आपल्या एका गौळणीमध्ये, कृष्ण गवळणींची छेड काढताना त्यांच्या पदराशी कशी झटापट करतो त्याचे अतिशय

लालित्यपूर्ण वर्णन केले आहे.

यशोदेसी गौळणी सांगती गाऱ्हाणे।

नट नाटक कपटी सांभाळ आपुलें तान्हे॥

किती खोडी याच्या सांगू तुजकारणें।

सहस्त्रमुख लाजला॥

एके दिवशी मी गेलें यमुनातट जीवना।

गाई गोपसांगते घेऊनि आला कान्हा॥

करीं धरी पदरा न सोडी तो जाणा।

एकांत घातली मिठी।

न सुटें गांठी। पहिला दृष्टी। नित्य आनंदु॥

तसेच नदीवर पाणी भरायला निघालेल्या गोपिकेचे वर्णन एका कवितेत असे येते,

पाण्या निघाली सुंदरी, वर ठेवी दो घागरी।

चाले मोकळ्या पदरी, परी लक्ष तेथे॥

आधीच्या काळी डोक्यावरचा पदर हे मर्यादेचे प्रतीक होते. पदराशिवायचे उघडे डोके हे सभ्यपणाचे मानले जात नव्हते. चौदाव्या शतकात संत जनाबाई म्हणतात,

डोईचा पदर आला खांद्यावरी।

भरल्या बाजारी जाईन मी॥

हातीं घेऊन टाळ खांद्यावरी वीणा।

आतां मज मना कोण करी॥

विठ्ठलभक्तीमध्ये लीन झालेल्या जनाबाईला मर्यादांचे भान राहिले नाही हे त्यांनी पदराची उपमा देऊन किती प्रत्ययकारी पद्धतीने सांगितले आहे. स्त्रियांसाठी साडी हे फक्त एक वस्त्र नसते. ते तिचे व्यक्त होण्याचे एक साधनही असते. साडीच्या पदराचा वापर स्त्रिया न बोलता बोलण्यासाठी ही करतात. ही बाब नेमकी हेरून

शाहीर प्रभाकर ‘मोहिनी जसी सुरसभेमधीं.’ या लावणीमध्ये दाखवतो..

दुधि कांचन झाऱ्या भरून।

घ्या घ्या म्हणणे आदरें करून।

हावभाव दावि पदरावरून॥

आपल्या समाजात ‘ओटी भरणे’ अशी एक रूढी आहे. यामध्ये सुवासिनीचा मान म्हणून तिने नेसलेल्या लुगडय़ाच्या ओच्यात किंवा पदरात नारळ, तांदूळ इत्यादी गोष्टी घातल्या जातात. लोकसाहित्यात अशा रूढी खूप सुंदरपणे उलगडतात. सुवासिनी माहेरहून निरोप घेऊन निघाल्यावरची ही ओवी पाहा,

लेक निघाली सासरी।

तिच्या ओटीत घाला गहू॥

ज्यांची त्यांनी नेली सई।

चला माघारी जाऊ॥

पण खरं पहाता, लुगडय़ाच्या, पदराच्या खोलगट भागाला ‘ओटी’ म्हटले जाते. लुगडय़ाच्या घोळाला पण ओटी म्हटले जाते. ओचा, सोगा, पदर यांच्या मोकळ्या भागाला ‘घोळ’ म्हटले जाते. सामराजाच्या ‘रुक्मिणीहरणा’मध्ये ‘पीतांबराचा बहू घोळ लोळे’ आणि अन्य एका कवितेमध्ये ‘घोळ चारू चरणावरी लोळे’असे वर्णन येते.  एका गोंधळी लोकगीतामध्येही अशी ओळ येते, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ शंकराशी सारी पाट अंबा मला खेळव

स्त्री गर्भार असताना तिचा ‘ओटीभरण’ विधी केला जातो. यामध्ये सुवासिनी त्या गर्भार स्त्रीच्या ओटीत खण, तांदूळ, फळे, नारळ या गोष्टी घालतात. तिची प्रसूती उत्तम प्रकारे व्हावी म्हणून हा विधी केला जातो. यावरून, सुखरूप प्रसूत होऊन बाळासह परत येणे याला ‘भरल्या ओटीने’ असे म्हटले जाऊ लागले. या ‘ओटी’वरून ‘ओटीत घालणे’, ‘ओटीत घेणे’, ‘ओटीत देणे’ असे वाक्प्रचार बनले. हे वाक्प्रचार सहसा ‘दत्तक’ घेण्या-देण्या संबंधी वापरले जातात. जसे, ‘ती बरं आपला मुलगा तुझ्या ओटीत घालील?’  याशिवाय याचा अर्थ स्वाधीन करणे किंवा आपलासा करणे, असाही होतो. हे वाक्य आपण बऱ्याचदा ऐकलेले असते, ‘पोरीला मी तुमच्या ओटींत घालीत आहे, तिचा पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करा.’

पदरावरून आणखी बरेच व्यावहारिक वाक्प्रचार मराठी भाषेत प्रचलित आहेत. ते आपण पुढील भागात पाहू.