१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाले, परंतु फक्त तेवढेच पुरेसे नव्हते. देश म्हणून जगासमोर वाटचाल करताना राज्यघटना, कायद्यांची तरतूद, शासन, अर्थव्यवस्था या सगळ्यांची आवश्यकता असते. भारत देश लोकांचे राज्य होण्याची गरज होती म्हणूनच भारताचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले गेले आणि २६ जानेवारी १९५० रोजी ते अमलात आणले गेले. १९५० च्या राज्यघटनेसह, देश अधिकृतपणे भारतीय प्रजासत्ताक म्हणून ओळखला गेला. एक ‘सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक देश’ जो त्याच्या सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व या तत्त्वांनी सुरक्षित करतो आणि बांधून ठेवतो. आपल्या देशाची ओळख संपूर्ण जगाला समजावून सांगणारा ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणूनच महत्त्वाचा ठरतो.

काळ बदलला तरी ‘प्रजासत्ताक दिना’चे महत्त्व कधीही कमी होणार नाही आणि येणाऱ्या प्रत्येक नव्या पिढीला या दिनाचे महत्त्व समजणे गरजेचे आहे. आजच्या सोशल मीडियाच्या युगात प्रजासत्ताक दिन कशा पद्धतीने साजरा केला जातो हे बऱ्याच वेगवगेळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असते, परंतु या गोंधळामुळेच नवीन पिढीला केवळ साजरे करण्यापलीकडे याचा गाभा समजत नाही. सध्या आपल्याकडे शालेय शिक्षणही विविध बोर्डांच्या शाळा, शिक्षणपद्धती यात विभागले गेले आहे. शालेय शिक्षणातून देशाची मूळ तत्त्वे, इतिहास याचे यथोचित ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतेच असे नाही. विविध ठिकाणी होणारे ध्वजारोहण, देशभक्तीपर कार्यक्रम, कर्तव्य पथावर होणारे सांस्कृतिक कार्यक्रम यापलीकडे तरुणांपर्यंत ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणजे नेमके काय हे पोहोचते का? याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता हक्कांची पुरेशी जाणीव असलेल्या तरुण पिढीला त्यांची देशाप्रती असलेली कर्तव्ये, जबाबदाऱ्या याविषयीच पुरेशी माहिती नसल्याचे मत युवा अभ्यासकांनी व्यक्त केले.

हेही वाचा :संशोधनातील वाघ

ठाण्याचा अॅडव्होकेट विराट पवार सांगतो, ‘स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्याला आपल्या कर्तव्यांची, जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणारा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन. या दिवसाचे महत्त्व असे की आपल्याला आपले विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असले तरी, इतरांच्या हक्कांचा आदर करणे आणि राष्ट्राच्या विकासास मदत करणे यांसारखी अनेक कर्तव्ये देखील आहेत. भारताला फक्त आर्थिकदृष्ट्या नाही तर सामाजिक, भावनिकदृष्ट्यासुद्धा चांगला देश बनवणे गरजेचे आहे आणि ही जबाबदारी युवा पिढीचीही आहे’.

आजच्या काळात हीच भावनिकता आणि समाजभान कदाचित कमी पडते आहे. हक्कांची वेळ येते तेव्हा सगळे धावून येतात, परंतु त्यांचीच दुसरी कर्तव्यांची बाजू मात्र लक्षात घेत नाहीत. भारत हा एकमेव तरुण देश मानला जातो, कारण आपल्या देशात तरुणांची संख्या जगात सगळ्यात जास्त आहे, असे विराट सांगतो. ‘सोशल मीडियाचा वापर करून भारताला महान राष्ट्र बनवण्याची सुवर्ण संधी आमच्या पिढीकडे आहे. कायदा-सुव्यवस्था, समानता, स्वतंत्र्य, न्याय-अन्याय या सगळ्याचे अर्थ नव्याने समजून घेण्याची गरज आहे. देशभक्तीची भावना कुठे आणि किती दाखवायला हवी याचेही भान आज असणे गरजेचे आहे. इथे हेही लक्षात घेतले पाहिजे की लिबर्टी ही लक्झरी नसून एक जबाबदारी आहे’ असेही त्याने स्पष्ट केले.

हेही वाचा :तिरंगी फॅशन

आपल्या प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व यासाठी की जेव्हा ब्रिटिशांच्या ताब्यात अनेक देश होते ते स्वतंत्र होताना अनेक देशांची राज्यघटना ही ब्रिटिशांनीच लिहिली. परंतु आपल्याकडे भारतीयांनीच भारताची राज्यघटना लिहावी असा आग्रह तेव्हाच्या अनेक स्वातंत्र्य लढ्यातल्या वीरांचा होता आणि त्यांनी ते अमलात आणून दाखवले. संविधान तयार करताना भाषेच्या आधारावर प्रांत रचना करण्यात आली. त्यानंतर विधानसभेची रचना आणि संविधानातील विविध तरतुदी हे करण्यासाठी एक मोठा कालावधी गेला. हे संविधान तयार करून ते २६ जानेवारीला अमलात आणले गेले म्हणूनच या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. प्रजासत्ताक दिन हा म्हणूनच भारताच्या ताकदीचे आणि लोकशाहीचे प्रतीक आहे. आपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार आहोत, ही शिकवण या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मिळते.

दिल्लीतील कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाचे अतिशय देखणे सादरीकरण आपण दरवर्षी बघतो. संपूर्ण जगात भारतातच हा दिवस अशा पद्धतीने साजरा केला जातो. यावर्षी जवळपास ५००० सांस्कृतिक सादरीकरणे होणार असून विविध देशातून येणाऱ्या पाहुण्यांची संख्या दहा हजारांच्या आसपास आहे. या समारंभातले एक वैशिष्ट्य म्हणजे बिटिंग रिट्रीट समारंभ. या सोहळ्यात संपूर्ण देशाचा सांस्कृतिक वारसा आणि भारताच्या तिन्ही दलांना सलामी देण्यासाठीचे अनेक सुंदर कार्यक्रम सादर होतात. भारतातील सगळ्या राज्यांचे भव्य-दिव्य चित्ररथ सादर केले जातात. हा दिवस एकूणच भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि विविधतेचे प्रतीक आहे. जेव्हा आपण जागतिक स्तरावर स्वत:कडे पाहतो, तेव्हा आपल्याला आत्मविश्वास वाटतो कारण आपल्या लोकशाही मूल्यांसाठी आपला देश आणि पर्यायाने आपण ओळखले जातो. या दिवसाने आपल्या स्वातंत्र्याला खरा अर्थ दिला, ‘प्रजासत्ताक दिन’ हा या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.

viva@expressindia.com

Story img Loader