रिलेशनशिप स्टेटस : व्हच्र्युअल जगातलं किंवा  प्रत्यक्षातलं आणि त्यावरच्या चर्चा.. कुठल्याही कॉलेज कट्टय़ाचा कानोसा घेतला तर मुलींच्या घोळक्यात यासंबंधीच्या गप्पाच ऐकू येतील. चेतन भगतची ‘हाफ गर्लफ्रेंड’ नावाची नवी कादंबरी येऊ घातली आहे. कादंबरी येणार आहे ऑक्टोबरमध्ये पण ‘हाफ गर्लफ्रेंड’ या संकल्पनेवरच सध्या भरपूर चर्चा रंगल्या आहेत. मुलाला ‘रिलेशनशिप’ हवीय. पण त्याच्या मैत्रीणीला मात्र नातं मैत्रीपुरतंच मर्यादित ठेवायचंय.
 यावरचं कॉम्प्रमाईज म्हणजे – ‘हाफ गर्लफ्रेंड’. नातं स्वीकारताना नवी पिढी नेमका काय विचार करतेय? ‘इन अ रिलेशनशिप’ म्हणजे नक्की काय काय असू शकतं त्यात? ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ किंवा ‘इट्स कॉम्प्लिकेटेड’ असं म्हणण्याची वेळ प्रेमाच्या नात्यात का येतेय? याचा शोध घेताना सापडलेले रिलेशनशिपचे काही पैलू आणि काही कंगोरे..
अगदी गेल्या आठ-दहा वर्षांपूर्वीपर्यंत ‘गर्लफ्रेण्ड-बॉयफ्रेण्ड’ म्हटल्यावर जशा अनेकांच्या भुवया उंचावल्या जायच्या तसं आता अजिबात होत नाही. कारण आजच्या टीनएजर्ससाठी ‘रिलेशनशिपमध्ये राहणं’ ही गोष्टच अगदी कॉमन झाली आहे. उलट एखादी मुलगी किंवा मुलगा रिलेशनशिपमध्ये नसेल तर त्यांना ‘आऊटडेटेड’ म्हणून हिणवलं जाण्याची प्रथाही हल्ली सुरू होण्याच्या मार्गावर आहे. ‘इन अ रिलेशनशिप’ या स्टेटसला आजची पिढी एवढय़ा कमी वयात एवढी का आसुसलेली आहे? यामागे आकर्षण आहे, खरं प्रेम आहे, ट्रेण्ड आहे की निव्वळ पिअर प्रेशर? सध्याची टीनएजर्सची रिलेशनशिप या सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे. खरं तर या गोष्टींकडे काही जण सीरिअसली पाहतात, तर काही जण लाइटली घेतात. तो ज्याचा त्याचा प्रश्न. पण नक्की कोणत्या कारणांमुळे त्यांना या सगळ्याची गरज वाटते त्याचाच घेतलेला हा आढावा.
आभाची बेस्ट फ्रेण्ड अदिती रिलेशनशिपमध्ये पडली आणि तेव्हापासून या दोघींचं भेटणं, बोलणं कमी झालं. काही काळानंतर न राहवून आभाने अदितीला या सगळ्याचं कारण विचारल्यावर अदिती म्हणाली, ‘अगं, ऑब्व्हिअस आहे.. मी आता माझ्या बॉयफ्रेण्डलाच वेळ देणार नं..आणि खरं सांगू का.. तूही शोध कुणी तरी.. म्हणजे आपल्याला अजूनच बरं..’ त्यानंतर काही दिवसांतच आभाचं तिच्याच कॉलेजच्या कुठल्या तरी मुलाबरोबर जुळलं. आता ते चौघं एकाच ‘लेव्हल’वर आल्यानं मस्त ‘एन्जॉय’ (?) करताहेत.
आता रिलेशनशिपचा दुसरा कंगोरा – हल्लीच्या रिलेशनशिपमध्ये आणखी एक गोष्ट कॉमन दिसतेय. सध्याची रिलेशनशिप हे त्यांचं पहिलंच अफेअर असतं असं अजिबात नाही. खरं तर एका रिलेशनशिपमध्ये ‘ब्रेक-अप’ झाल्यानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून दुसऱ्या रिलेशनशिपचा मार्ग स्वीकारला जातो. नाहीतर अगदीच पहिल्या रिलेशनशिपची ‘सवय’ झालेली असते.
 त्याच ‘सवयीची’ गरज भागवण्यासाठी दुसऱ्या रिलेशनशिपचा भावनिक आधार घेतला जातो. प्रत्येक वेळी हाच तो आपल्या आयुष्यभराचा साथी असं मात्र अगदी मनापासून वाटतं, हा भाग वेगळा.
या सगळ्या गोतावळ्यामध्ये अजून एक ग्रुप असतो तो म्हणजे कुतूहलापोटी रिलेशनशिप्समध्ये पडणाऱ्यांचा. त्या कुतूहलाचं रूपांतर नंतर इतक्या लवकर गरजेत होतं ते कळतच नाही. आता हक्काचं असं कुणी तरी सोबत हवंच असं त्यांना वाटायला लागतं. त्यातूनच मग समोर येणाऱ्या प्रत्येक मुला / मुलीमध्ये स्वत:चं भविष्य मॅच करण्याचा अट्टहास सुरू होतो आणि त्यातूनच एका नवीन (गरजेच्या) रिलेशनशिपची वाट खुली होते. तिथे आकर्षण वगरेचा मुद्दा तसा तुलनेनं कमी असतो.
आकर्षणाचा मुद्दा मात्र रिलेशनशिपमध्ये असतोच. त्यामागे बरीच सायंटिफिक कारणं असतात, असं अनेकांचं म्हणणं आहे. पण या आकर्षणाचेही प्रकार आहेतच की. एक मित्र- वेदांत.. एकूण तीन रिलेशनशिप्सचा त्याचा अनुभव. त्यातली दोन एकदम ‘सीरिअस’. पण त्यामध्ये ब्रेक-अप झाल्यानंतर त्याला रिलेशनशिपची इतकी गरज वाटायला लागली, की त्या गरजेतूनच त्याला एका मुलीबद्दल आकर्षण वाटायला लागलं आणि मग पुढचा-मागचा काहीही विचार न करता त्याने तिला रिलेशनशिपसाठी विचारलं. खूप विचार करून, त्याचं प्रपोजल एकदम सीरिअसली घेऊन तीही त्याला ‘हो’ म्हणाली, आणि त्याच्यात गुंतली. आता एकाएकी त्याला स्वत:चा निर्णय चुकीचा वाटायला लागलाय. कारण तिच्यातल्या उणिवा त्याला जाणवायला लागल्यात. परिणाम – पुन्हा ब्रेक-अप!
रिलेशनशिपचा आणखी एक वेगळा कंगोराही आहे. थोडं कनफ्यूजन आहे त्यात..कारण आहे- मैत्री. रिया आणि अíपत कॉलेजच्या शेवटच्या वर्षांला आहेत. अगदी अकरावीपासूनच दोघं बेस्ट फ्रेण्ड्स. रियाच्या म्हणण्यानुसार त्यांचं नातं हे बॉर्डरलाइनवरचं.. ना धड मत्री, ना धड रिलेशनशिप. ‘हाफ गर्लफ्रेण्ड’टाइप्स.. पण काही दिवसांनंतर ‘लेट्स ट्राय’ म्हणून त्यांच्या रिलेशनशिपची सुरुवात झाली.. आणि पुन्हा काही महिन्यांतच ते ‘रिलेशनशिप’चे बदल पचवायला अवघड जात असल्यानं ब्रेक-अप.
या रिलेशनशिपच्या वर्तुळात काही बालिश मुलींचा ग्रुपदेखील असतो. त्यांचं रिलेशनशिपमध्ये ‘अंतिम लक्ष्य’ फक्त एकच असतं – ‘प्युअर एन्जॉयमेंट’. मग त्यासाठी काहीही! बॉयफ्रेण्डकडून फ्री शॉिपग, फ्री मूव्ही, बाइकवरून राइड्स, ओव्हरनाइट स्टे, गिफ्ट्स, पार्टीज, टूर्स.. आणि मग ही लिस्ट वाढतच जाते. या सगळ्यांसाठी रिलेशनशिपचा ‘अर्थ’ हा मौजमस्ती, टाइमपास हाच असतो. अजून एक ग्रुप – ‘दिखाऊ’ लोकांचा. काही मुला-मुलींमध्ये एक कॉन्ट्रॅक्ट झालेलं असतं. बाहेरच्या जगाला दाखवण्यासाठी म्हणून आपण गर्लफ्रेण्ड-बॉयफ्रेण्ड. पण प्रत्यक्षात मात्र तसं काहीच नाही. या ‘बाहेरच्या जगात’ येणारे कोण असतात? तर त्यांचे एक्स बॉयफ्रेण्ड / गर्लफ्रेण्ड, क्लोज फ्रेण्ड्स जे रिलेशनशिपमध्ये असल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष करताहेत किंवा अशी मुलं-मुली ज्यांनी त्यांना रिजेक्ट केलंय आणि असे लोक जे सतत बोलत असतात की तुला कुणी मिळूच शकत नाही.
रिलेशनशिपच्या या अनेक कंगोऱ्यांमध्ये एक ट्रेण्ड फार अगोदरपासून आहे. पण त्यावर बोलायला फारसं कुणीही धजत नाही आणि तो एक ठरावीक चौकट ओलांडून बाहेरही येत नाही. तो मुद्दा म्हणजे वासना (लस्ट). फक्तसेक्सचा अनुभव घेण्यासाठीही काही मुलं-मुली रिलेशनशिपमध्ये पडतात, असतात. पण त्यावर उघडपणे बोलायला कुणीही तयार नसतं. एका सर्वेक्षणानुसार, ८० टक्के टीनएजर मुला-मुलींना हे करून बघावं, असं वाटत असतं. त्यासाठी रिलेशनशिप हवी असते.
या सगळ्यावर काहीसा वरचढ होणारा ग्रुप असतो तो म्हणजे रिलेशनशिपमध्ये ‘सीरिअसली इन्व्हॉल्व्हड’ होणाऱ्या मुला-मुलींचा. (हा मुद्दाही काही मुला-मुलींसाठी वादग्रस्त ठरू शकतो. कारण रिलेशनशिपच्या पहिल्या महिन्यात प्रत्येक मुला-मुलीला असंच वाटतं असतं की, आपण सीरिअस आहोत). अशा मुला-मुलींकडून सारासार विचार करून, व्यवस्थित वेळ घेऊन समोरच्या मुलाला / मुलीला विचारलं जातं. आणि समोरच्या मुला-मुलीकडूनही तितकाच सारासार विचार करून आणि वेळ घेऊन होकार / नकार कळवला जातो. त्या सारासार विचारात मग सगळंच येतं – करिअर, कुटुंब, दोघांच्या जुळणाऱ्या वेव्हलेंथ, दोघांचं कल्चर, दोघांच्या क्षमता, उणिवा, विचार करण्याची पद्धत आदी. अनुष्काला आर्यन आवडायला लागल्यापासून जवळ-जवळ वर्षभराने तिने रिलेशनशिपसाठी त्याला विचारलं. त्यानंही विचार करून ‘हो’ म्हटलं. पाच- सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये राहून आता ते दोघं स्वत:च्या उत्तम करिअरसकट लग्नाच्या बंधनात आहेत आणि सुखाने संसार करताहेत.
रिलेशनशिपचे असे अनेक पैलू, अनेक कंगोरे आहेत. आसपास दिसणारे त्यातले काही पैलू मांडण्याचा हा प्रयत्न.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा