मितेश रतीश जोशी
जगात सर्वाधिक कुत्रे पाळणाऱ्या पहिल्या दहा देशांमध्ये भारताचा समावेश होतो. श्वानपालन सुखावह करण्यासाठी नवनव्या कल्पना समोर येत आहेत आणि श्वान पालकांनाही त्याची भुरळ पडते आहे. ‘डॉग कॅम्पिंग’ची संकल्पनाही अशीच भन्नाट आहे..
जर घरात पाळीव प्राणी नसेल तर तरुणपणात हमखास श्वान किंवा मार्जारपालनाची हौस मनात डोकावल्याशिवाय राहत नाही. आई आपण एखादी मांजर पाळूयात का गं? इथून सुरू झालेली प्रश्नांची भुणभुण, ‘‘तिची सु आणि शी तू काढणार असशील तरच पाळूयात !’’ हे धमकीवजा उत्तर मिळाल्यानंतरच थांबते. घरात करारनामे झाल्यानंतर प्राणीपालनाचा वसा घेतला जातो. आणि मग हौसेने घरी आणलेली मोती, कुरो, शेरू किंवा मनी, राघू, क्रँकी बनलेली ही श्वान – मार्जार मंडळी घरातल्यांना एवढा जीव लावतात की ती कुटुंबाचाच भाग होऊन जातात. प्राण्यांबद्दलचा हा लळा एवढा वाढला आहे की पूर्वी ते अमुक मुलाचे बाबा – ती तमुक मुलीची आई अशी बोलण्याची पद्धत होती, सध्या या पेट्सच्या नावाने त्यांचे आई – बाबा ओळखले जातात. हे शेरुचे बाबा किंवा ही चेतीची आई.. या नावाने ओळखले जाणारे पेट पेरेन्ट्स आपापला क्लब किंवा ग्रुप बनवू लागले आहेत. आठवडय़ातून काही दिवस खास वेळ काढून हे पेट पेरेन्ट्स आपापल्या पेट्सना घेऊन एकत्र येतात, गप्पा मारतात. हा ट्रेण्ड आता कुठे रुळू पाहतो आहे तर याचा विस्तार म्हणून ‘डॉग कॅम्पिंग’ ही आणखी एक नवी कल्पना पुढे आली आहे.
कोणताही पाळीव प्राणी हा त्याच्या मालकाच्या प्रेमाचा व सहवासाचा कायम भुकेला असतो. दोघांनाही एकमेकांचा सहवास रिलॅक्स करणारा असतो. पेट पेरेन्ट जेव्हा बाहेर ट्रिपला जातात तेव्हा त्यांना आपलं लाडकं पिल्लू सलग काही दिवस पाळणाघरात ठेवावं लागतं. साध मित्रांबरोबर वीकेंडला बाहेर जातानासुद्धा आधी त्यांची सोय करावी लागते. हल्ली अनेक पर्यटनस्थळी वा हॉटेल्समध्ये पेट्सची व्यवस्था केली जाते वा त्यांनाही त्यांच्या पालकांबरोबर राहण्याची मान्यता दिली जाते. मात्र अजूनही याचे प्रमाण कमी असल्याने मग आपल्या पेटबरोबर पिकनिक वा आऊटिंगचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे या दोघांनाही एकत्र आऊटिंगचा आनंद घेता यावा यासाठी शर्विल श्रंगारपुरे या तरुणाने ‘डॉग कॅम्पिंग’ सुरू केलं आहे. ही कल्पना त्याला कशी सुचली?, याबाबत तो सांगतो, ‘माझ्याकडे कुरो नावाचा जर्मन शेफर्ड कुत्रा आहे. जेव्हापासून कुरोचा मी बाबा झालोय तेव्हापासून मी माझ्या प्रत्येक ट्रीपमध्ये त्याला सोबत नेलं आहे. एक दिवस मी माझ्या शाळेतल्या मित्रांसोबत कर्जतला फार्म हाऊसला गेलो होतो. तेव्हादेखील कुरो माझ्यासोबत होता. मुंबईत घरी बंद बंद असणाऱ्या वातावरणातून कुरो मोकळय़ा वातावरणात आला तेव्हा आमच्याबरोबर तो मनसोक्त खेळला. त्या ट्रीपनंतर कुरोच्या वागण्यात एक मोकळेपणा जाणवला. हा मोकळेपणा इतर कुत्र्यांनादेखील अनुभवता यावा या उद्देशाने ‘डॉग कॅम्पिंग’चं आयोजन मी करू लागलो’.
निसर्गाच्या सान्निध्यात पाली, लोणावळा, कर्जत भागांत शर्विल कॅम्प आयोजित करतो. तिथे तुम्ही तुमच्या कुत्र्याला घेऊन यायचं. दोन दिवसांचं नियोजन ठरलेलं असतं. त्यात तुमच्याबरोबर कुत्र्यांनाही स्विमिंग, नाइट वॉक अशा विविध अॅक्टिव्हिटीजमध्ये गुंतवलं जातं. डॉग ट्रेनर्सप्रमाणेच डॉग बिहेविअरिस्ट तिथे असतात, ते प्रत्येक कुत्र्याच्या वागण्याची तऱ्हा अभ्यासून त्याची माहिती मालकाला समजवून सांगतात. त्यामुळे घराबाहेर वावरताना आपल्या पेटला अधिकाधिक समजून घेत अॅक्टिव्हिटीज एन्जॉय करणं त्यांच्या पेरेन्ट्सना शक्य होतं, असं शर्विल सांगतो. शहरातील बंदिस्त घरांमध्ये न मिळणारा मोकळेपणा, स्वातंत्र्य त्या पेट्सनाही निसर्गाच्या सान्निध्यात राहून अनुभवता येतं. ट्रेकिंगची अॅक्टिव्हिटी ही पेट्स आणि त्यांच्या पेरेन्ट्ससाठीही व्यायाम ठरतो. हिरव्यागार निसर्गात मनमोकळेपणाने फिरणं, तिथली तजेलदार हवा, झाडापासून गाईम्हशींच्या वासापर्यंत नैसर्गिक वातावरणाचा अनुभव हा पेट्ससाठीही आनंददायी आणि ताण घालवणारा ठरतो. स्विमिंग करताना पाण्यात खेळण्याचा पेट आणि पेरेन्ट्स दोघेही मनसोक्त आनंद घेतात. हे खेळ म्हणजे संबंधित पेट आणि त्याचे आई – बाबा यांच्या नात्यातील संबंध अधिक घट्ट करण्याची दोघांना मिळालेली संधी असते, असं शर्विल सांगतो. एरव्ही प्रत्येक वेळी आपल्या कामाच्या व्यापातून सवड काढून पेट्सबरोबर इतकं मनमुराद खेळणं, बोलणं हे शक्य होत नाही. डॉग कॅम्पिंगमुळे हा उद्देश पूर्ण होतो, असं तो सांगतो.
पुण्यामध्ये डॉग कॅम्पिंग सुरू करणारी ‘क्रेझी केनाईन कॅम्पर्स’ची सर्वेसर्वा पूजा साठे ही तरुणी या संकल्पनेविषयी सांगते, ‘रोजच्या धावपळीच्या जीवनात डॉग कॅम्पिंग ही आता काळाची गरज होऊ लागली आहे. पेट आणि पेरेन्ट्समध्येही घट्ट बंध असणं हे गरजेचं आहे. दररोज प्रत्येकाला त्यासाठी वेळ काढणं शक्य होतंच असं नाही. डॉग कॅम्पिंग करताना या दोघांना एकत्र आणणं हाच मुख्य उद्देश असल्याने इतर कोणतीही व्यवधानं पेट पेरेन्ट्सना नसतात. या दोघांनाही एकमेकांचा सहवास मिळतो’. आपल्या मालकाचं आपल्यावर प्रेम आहे याची जाणीव कुत्र्यांनाही होते. शिवाय, इतर वेगवेगळे लोक आणि त्यांचे पेट्स यांच्यामधला वावर त्यांच्यासाठीही सोशलायझेशनचा एक नवा अनुभव असतो, असं पूजा सांगते. व्यवसायाने डॉग ट्रेनर आणि डॉग बिहेविअरिस्ट असलेल्या पूजाच्या मते पेट्सनाही नवीन मित्र भेटतात. त्यांच्यासाठीही हे नवे अनुभव महत्त्वाचे असतात. पेट आणि त्यांचे पेरेन्ट्स दोघांनाही विरंगुळय़ाचे क्षण मिळवून देणाऱ्या डॉग कॅम्प्सना म्हणूनच एवढा प्रतिसाद मिळतो आहे. शर्विलही या कॅम्प्सना भरपूर प्रतिसाद मिळत असल्याचे सांगतो. मुंबई पुण्यातूनच नाही तर दिल्ली, बेंगलोर, सुरत मधूनही डॉग कॅम्पिंगला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे, असं सांगणारा शर्विल लवकरच पेट्सना बरोबर घेऊन ‘ऑफबीट टूर’चं आयोजन करणार आहे.
डॉग कॅम्पिंगमुळे शर्विल व पूजासारख्या अनेक तरुणांना आपली आवड जोपासण्याबरोबरच उत्तम रोजगाराचेही साधन उपलब्ध झाले आहे. करिअरची ही वाट नक्कीच हटके आहे. प्राणी आणि त्याच्या पालकांना घरापासून दूर, रोजच्या दिनक्रमापेक्षा वेगळय़ा वातावरणात एकत्रितपणे वेळ घालवता यावा,’ अशी मूलभूत संकल्पना असलेल्या या डॉग कॅम्पिगच्या निमित्ताने वेगवेगळी प्राणीप्रेमी कुटुंबे एकत्र येत आहेत. त्यांच्यातही संवादाची देवाण-घेवाण होते आणि विरंगुळाही मिळतो. पेट्ससाठीचा हा एक उनाड दिवस त्यांच्या पेरेन्टसाठीही रिफ्रेशिंग अनुभव आहे.