भारतीय पद्धतीचं डाइंग आणि प्रिटिंग केलेलं कापड सध्या आंतरराष्ट्रीय फॅशन रॅम्पही गाजवत आहे. डाइंगचे मुख्य प्रकार आणि कुठलं कापड कशासाठी वापरावं याबाबत काही टिप्स..
तुमच्या वॉडरोबमध्ये एकाच पॅटर्नचे पण वेगवेगळ्या कापडापासून शिवलेले, वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या प्रिंट्सचे ड्रेस सापडण्याची शक्यता जास्त आहे की, एकाच प्रकारच्या कापडाचे पण वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये शिवलेले कपडे जास्त आहेत? बहुतेक जणींना याचा विचार आधी केलेला नसेल. आता तो विचार करा आणि वॉर्डरोबमध्ये नजर टाका. पॅटर्न एकच असला तरी वेगवेगळ्या रंगांमुळे किंवा प्रिंट्समुळे प्रत्येक ड्रेस वेगळा दिसू शकतो. एकाच कापडापासून कितीही वेगवेगळे पॅटर्न्स शिवले तरी वॉर्डरोबमध्ये तोचतोचपणा जाणवेल. म्हणजेच कापडाच्या व्हरायटीपेक्षा प्रिंट्स आणि रंग यातलं वैविध्य जास्त परिणामकारक ठरतं.
भारतात प्रिंटिंग आणि रंग यात खूप वैविध्य दिसतं. प्रांतागणिक डाइंग, प्रिटिंग, विणकाम- भरतकाम यांचं वैविध्य थक्क करणारं आहे. कॉटन आणि सिल्क या नैसर्गिक कापडांवर हे प्रयोग फार पूर्वीपासून केले जातात आणि आजही या पद्धती वापरात आहेत. हे भारतीय नैसर्गिक कापड आपल्या वातावरणाला साजेसं आहे. हीच बाब डिझायनर्सच्यासुद्धा लक्षात आली आहे. त्यामुळे यंदाच्या समर कलेक्शन्समध्ये विविध देसी डाइंग, प्रिंटिंग पद्धतींचा वापर करून बनवलेले ड्रेस प्रामुख्याने पाहायला मिळाले. केवळ भारतीय नाही तर परदेशातसुद्धा डिझायनर्स या आपल्या देसी पद्धतींच्या प्रेमात पडले आहेत. इक्कत, बांधणी, शिबोरी, टाय-डाय, लेहरिया, बाटिक हे डाइंगचे तर कलमकारी, ब्लॉक प्रिंट हे प्रमुख प्रिंटिंगचे प्रकार आपल्याकडे सापडतात. यावर सध्या आपल्याकडेच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध प्रयोग करून कलेक्शन्स बनविण्यात येत आहेत. डाइंग म्हणजे कपडय़ावर रंग चढवण्याची पद्धत. पटोला पद्धतीने धाग्याला रंग चढवून त्याचे कापड विणले जाते किंवा टाय-डाय पद्धतीत कपडय़ांना विशिष्ट प्रकारे बांधून त्यावर रंग चढवतात.
डाइंगची परंपरा भारतात अनेक वर्षांपासून होती. कॉटन, सिल्क अशा नैसर्गिक कापडांवर नैसर्गिक डायचे रंग सुंदररीत्या पकडले जातात. परंतु जॉर्जेट, शिफॉनसारखे कृत्रिम धाग्याचे कापड हे रंग पकडू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर डिजिटल प्रिंटींग पद्धतीने डाइंगचा परिणाम साधला जातो. सध्या अनेक कृत्रिम डायसुद्धा बाजारात आले आहेत. त्यांचा वापरही कृत्रिम कापडाला डाइंग करण्यासाठी केला जातो.
उन्हाळ्याच्या मोसमात कॉटन सर्वात कम्फर्टेबल कापड वाटू लागतं. कॉटनवर सिम्पल डाइंग केल्यास त्याचे रंग डल दिसतात, त्यामुळे अशा वेगवेगळ्या डाइंग प्रक्रियांमुळे कापडाला ट्विस्ट तर मिळतोच आणि उठाव येतो.
यार्न डाइंग :
या पद्धतीमध्ये यार्न म्हणजेच कापडाचा धागा डाय करून मग कापड विणलं जातं. अशा रंगीत धाग्यांपासून आपल्याकडे विविध साडय़ांचे विणकाम पारंपरिक पद्धतीनं केलं जातं. कित्येकदा दोन किंवा तीन वेगवेगळ्या रंगांचे धागे एकत्र करून कापड बनवलं जातं. यार्न डाइंगपासून बनवलेला कपडा नॉर्मल डाइंगपेक्षा उठावदार दिसतो. कारण तयार कापडाला रंग चढवताना तो सगळीकडे समान चढेल याची खात्री नसते. यार्न डाइंगमध्ये ही अडचण येत नाही. इक्कत हा देखील यार्न डाइंगचा प्रकार. यामध्ये धाग्यांनासुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने बांधून दोन-तीन रंग चढविले जातात (कापडाऐवजी धागेच टाय-डाय पद्धतीनं रंगवतात)आणि मग कापड विणलं जातं.
टाय-डाय :
बांधणी, लहेरिया सर्व हे टाय-डाय चे प्रकार आहेत. यात कापडाला विशिष्ट गाठी मारून त्यावर रंग चढविले जातात. लहान वर्तुळांच्या प्रिंट्सना बांधणी म्हणतात. नवरात्रीचे घागरे, गुजराती साडय़ा, दुपट्टे यावर बांधणी प्रिंट पाहायला मिळतं. इतर टाय-डायचे प्रिंट्स बांधणीपेक्षा आकाराने मोठे असतात. आडव्या, उभ्या, झिगझ्ॉग रेषा उमटलेल्या कापडाला लहेरिया म्हणतात. राजस्थानी साडय़ांमध्ये हा प्रकार पाहायला मिळतो.
बाटिक :
बाटिक डाइंगमध्ये मेणाच्या सहाय्याने कापडावर नक्षी काढली जाते. त्यानंतर कापड डाय करतात. या प्रक्रियेत कापडावर मेण असलेल्या भागावर रंग चढत नाही. त्यामुळे नक्षीवर मूळ कापडाचा रंग कायम राहतो आणि बाकीच्या भागावर डायचा रंग दिसतो.
प्रिंटिंगचे प्रकार
कलमकारी प्रिंटिंगमध्ये नैसर्गिक रंगांचा वापर करून कापडावर चित्र रेखाटली जातात. यात पौराणिक कथा, पात्र यांचा समावेश असतो. ब्लॉक प्रिंटिंगमध्ये वेगवेगळ्या आकाराचे नक्षीकाम केलेले ब्लॉक तयार केले जातात. त्याचे ठसे कापडावर उमटवले जातात. या प्रिंट्सचे आपण साडय़ा, कुर्ते, सलवार सूट शिवण्यासाठी वापरतो.
प्रिंट्स आणि रंग वापरताना काय काय प्रयोग करता येतील याच्या काही टिप्स.
* उन्हाळ्यात पांढरा रंग आपल्याला अधिक खुणावतो. पांढऱ्या कुर्त्यांसोबत जीन्स किंवा लेगिंगऐवजी प्रिंटेड पलॅझो, स्कर्ट वापरून बघा.
* या प्रिंट्सची जॅकेट्स तुमच्या नेहमीच्या डेनिम जॅकेट्सना उत्तम पर्याय ठरू शकतात. विशेषत: लहेरिया प्रिंटच्या जॅकेटमुळे फॉर्मल लुकसुद्धा मिळेल. समर ड्रेससोबत हे जॅकेट खुलून दिसतं.
* इंडिगो शेड या सीझनमध्ये फोकसमध्ये आली आहे ते या प्रिंट्समुळेच. इंडिगो आणि सफेद रंगांचा टाय-डाय, बाटिक किंवा ए-लाइन ड्रेस सिम्पल पण स्टायलिश दिसतो. लाल रंगासोबत याची जोडी अजूनच खुलून दिसते.
* कलमकारी किंवा ब्लॉक प्रिंट तुम्ही मिक्स मॅच करून वापरू शकता. त्याचे प्रिंट्स सटल असतात. त्यामुळे त्यांच्या कॉम्बिनेशनचा प्रश्न नसतो. लेअिरगचा प्रयोग यांच्यासोबत नक्कीच करून बघा.