अगदी आत्ता आत्तापर्यंत फॅशनचा आपल्याशी काही संबंध नाही, हे सांगण्यातच ‘साध्या-सरळ’ मुली धन्यता मानायच्या. फॅशनेबल असणं म्हणजे तेव्हा आगळीक होती. पण गेल्या दहा-बारा वर्षांत मानसिकता बदलली आणि भारतीय फॅशन व्यवसायाचाही पुनर्जन्म झाला. भारतीय फॅशन खऱ्या अर्थाने आता वयात येतेय.

साधारण बारा- पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत फॅशन म्हणजे सिनेमा आणि सिनेमातले कपडे म्हणजेच फॅशन हेच समीकरण आपल्या डोक्यात होतं. खरं तर भारतीय फॅशन व्यवसाय इतका काही नवजात नाही. तो गेली किमान चार दशकं तरी अस्तित्वात आहे. तरीही आपल्या भारतीय मध्यमवर्गीय मानसिकतेला फॅशनचं हे एवढं एकच समीकरण माहिती होतं. मोठमोठय़ा आलिशान हॉटेल्समध्ये फॅशन शो होत असतात, हे ज्ञात असलं तरीही त्याच्याशी तसा आपला काही संबंध असायचं कधी कारणच नव्हतं आणि तिथे दाखवतात ती फॅशन थोडी आपण अंगावर मिरवतो, अशी सर्वसाधारण समजूत. पण गेल्या पाच-सात वर्षांत आजूबाजूची परिस्थिती आमूलाग्र बदलली आहे. खरेदी करायला आपण दुकानाऐवजी शॉपिंग मॉलमध्ये जायला लागलो, साधारण तेव्हापासून हा बदल अगदी ठळक व्हायला लागला.
भारतीय फॅशन डिझायनर म्हणजे बॉलीवूडसाठी आणि पेज थ्री पाटर्य़ामध्ये मिरवणाऱ्या मोजक्या उच्चभ्रू लोकांसाठी कपडे डिझाइन करणारे ही आणखी एक समजूत हळूहळू बदलतेय. डिझायनर वेअर आता सामान्यांच्याही आवाक्यात यायला लागलंय. बॉलीवूडमुळे अर्थातच फॅशन डिझायनर्सना ग्लॅमर लाभत होतं. पण आता खऱ्या अर्थानं फॅशन डिझायनिंग म्हणजे एक स्वतंत्र कला आणि एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून नावारूपाला यायला लागला आहे. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीक समर रिसॉर्ट-२०१४ च्या निमित्तानं हाच बदल अधोरेखित झाला. भारतीय फॅशनचा वाढलेला आवाका त्यातून लक्षात आला आणि रॅम्पवरची फॅशन सर्वसामान्यांपर्यंत येतेय याची दखल बडे फॅशन डिझायनर्स घ्यायला लागले हेदेखील दिसलं.
जागतिक फॅशन विश्वात भारतीय फॅशनचं एकत्रित अस्तित्व दिसावं यासाठी आणि फॅशन उद्योगाच्या भवितव्याला दिशा देण्याच्या उद्देशानं हा फॅशन वीकचा सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. वर्षांतून दोन वेळा होणाऱ्या या सोहळ्यात देशभरातून नावाजलेले फॅशन डिझायनर्स सामील होत असतात तसे नवोदितही असतात. पूर्वी या फॅशन वीकमध्ये बॉलिवूडचा दबदबा होता. ‘शो स्टॉपर’ म्हणून िहदी चित्रपटांतल्या ताऱ्यांचं वर्चस्व अजूनही असतंच पण सोहळा आता त्यांच्यापुरताच मर्यादित राहत नाही. म्हणूनच गेले दोन सीझन बॉलीवूडच्या आघाडीच्या फॅशन डिझायनरने – मनीष मल्होत्रानं फॅशन शोची सुरुवात होतेय, पण समारोप मात्र तितकाच दणक्यात बॉलीवूडशिवायही होऊ शकतो हे दिसलं. गेल्या वेळीही मनीष ओपनिंग शोला होता. पण शेवट सब्यसाची मुखर्जीनं केला होता आणि आश्चर्य म्हणजे त्याचा शो स्टॉपर कुणीही बॉलीवूड स्टार नव्हता. यंदाच्या वर्षी सांगता अर्थात ‘ग्रॅण्ड फिनाले’ राजेश प्रताप सिंगनं केली. त्याचंही नाव निव्वळ फॅशन डिझायनर म्हणून जगन्मान्य आहे.
रॅम्पवरून दुकानापर्यंत
यंदाच्या फॅशन वीकमध्ये सादर झालेली डिझाइन्स अॅबस्ट्रॅक्ट नव्हती तर अधिक प्रॅक्टिकल होती, अशी प्रतिक्रिया फॅशनविश्वातून येतेय. याचाच अर्थ फॅशन आता सर्वसामान्यांसाठी येतेय. रॅम्पवर मॉडेल्सनी सादर केलेले कपडे थेट ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाताहेत. आपल्या घराजवळच्या मॉलमध्ये आता हे फॅशन शोमध्ये सादर झालेले कपडे दिसतील, हे निश्चित झालंय.  
ऑनलाइन शॉपिंगचं वर्चस्व वाढणार
गेल्या दोन-तीन वर्षांत ऑनलाइन शॉपिंगसाठी अनेक वेबसाइट आल्या आहेत. शॉपिंग पोर्टल्स आहेत. त्यावर सतत कुठल्या ना कुठल्या ऑफर्स असतात आणि जगभरातली सगळी फॅशन तिथे पाहायला मिळते. घरबसल्या शॉपिंग करण्याचा हा पर्याय हळूहळू लोकप्रिय होतोय, तसं या वेबसाइट्सचं वर्चस्व वाढतंय. अनेक देशी तसंच आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड साइट्सवर उपलब्ध असतात. यंदाच्या फॅशन वीकसाठी तर जबाँग.कॉम या ऑनलाईन शॉपिंग पोर्टलनी प्रायोजकत्व दिलं होतं. नवोदित डिझायनर्ससाठी जबाँगने आपलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. शिवाय फॅशन शोमध्ये सादर झालेलं सगळं कलेक्शन तातडीने त्यांच्या वेबसाइटद्वारे सामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं.
परदेशी ब्रॅण्ड्स
अमेरिकेचा फॉरएव्हर २१, ब्रिटनचा झारा, एच अॅण्ड एम यासारखे हायस्ट्रीट ब्रॅण्ड्स आता मुंबई- पुण्यात आपली आऊटलेट्स उघडायला लागले आहेत. फॅशनची जाण वाढलीय तशी एकूणच परदेशी ब्रॅण्ड्सबद्दलही माहिती लोकांना झालेली आहे. शिवाय परदेश वाऱ्या करणाऱ्यांमध्ये मध्यमवर्ग समाविष्ट झाल्यानंतर आता तिथले ब्रॅण्ड इथे यायला उत्सुक दिसताहेत. ब्रिटनचा डोरोथी पर्किन्स हा आणखी एक हायस्र्ट्ीट ब्रॅण्ड लॅक्मे फॅशन वीकच्या निमित्ताने भारतात लाँच झाला. लंडनच्या डोरोथी पार्किन्स ब्रॅण्डसाठी अभिनेत्री कंगना राणावत रॅम्पवर उतरली.  
‘ग्लोकल’ फॅशन
भारतीय फॅशन म्हणजे साडी, पंजाबी सूट, लेहंगा, घागरा ही मर्यादा आता अजिबात उरलेली नाही. भारताने परदेशी फॅशन अंगीकारून आता जमाना झाला. पण हल्ली देशी टच असलेली पण ग्लोबल म्हणता येईल अशी ‘ग्लोकल’ फॅशन चलतीत आहे. या ‘ग्लोकल’ फॅशनची झलक फॅशनवीकमध्ये बघायला मिळाली. डिझायनर स्वप्निल शिंदे याने वेस्टर्न आऊटफिट्स म्हणता येतील, अशी डिझाइन्स सादर केली, मात्र त्यासाठी पैठणीचा वापर केला. पैठणीचं वेस्टर्न रुपडं त्यातून दिसलं. कृष्णा मेहता, श्रुती संचेती, वैशाली एस अशा डिझायनर्सनीसुद्धा अशी देसी टच असलेली पण ग्लोबल अपील असलेली डिझाइन्स सादर केली. गेले काही सीझन फॅशन वीकमध्ये इंडियन टेक्स्टाइल डे साजरा केला जातो. या दिवशी सादर झालेली सगळी डिझाइन्स भारतीय विणकरांच्या हातून घडलेल्या कापडाची असतात.
सर्वसामान्य मुलगीसुद्धा स्वतला ‘प्रेझेन्टेबल’ ठेवण्यासाठी फॅशनचा अगदी आवर्जून विचार करते आणि तिचा विचार आता बडे डिझायनर्ससुद्धा करू लागले आहेत. हेच यंदाच्या फॅशन वीकमधल्या नव्या फॅशनमधून दिसलं. वयात आलेल्या आपल्या फॅशन इंडस्ट्रीला फळतं- फुलतं ठेवायचं असेल तर फॅशन सर्वसमावेशक व्हायला हवी, ही बाब लक्षात घेऊन डिझाईन्स बदलताहेत, प्रयोग होताहेत. या सगळ्या बदलांमधून आपल्यापर्यंत अधिक कलात्मक, सुयोग्य आणि भरपूर पर्याय उपलब्ध होतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ग्लोकल’ फॅशनची झलक : एकीकडे डोरोथी पर्किन्ससारखा ब्रिटनचा हायस्ट्रीट फॅशन ब्रँड भारतात लाँच झाला तर दुसरीकडे पैठणी पाश्चिमात्य रूपात सादर झाली.

‘ग्लोकल’ फॅशनची झलक : एकीकडे डोरोथी पर्किन्ससारखा ब्रिटनचा हायस्ट्रीट फॅशन ब्रँड भारतात लाँच झाला तर दुसरीकडे पैठणी पाश्चिमात्य रूपात सादर झाली.