विनय जोशी

१५ ऑगस्टला ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ने ५४ वर्षे पूर्ण केली आहेत. १५ ऑगस्ट १९६९ ला स्थापन झालेल्या या संस्थेने आरंभीची प्रतिकूल परिस्थिती आणि इतर आव्हानांना तोंड देत अल्पावधीत मोठी झेप घेतली आहे. अंतराळ मोहिमेत भारतीयांचा उत्साह इस्रोच्या यशाची पावती आहे.

ISRO docked SpaDeX satellites space
ISRO Mission : इस्रोची आणखी एक मोहीम फत्ते, अवकाशात दोन उपग्रहांची केली यशस्वी जोडणी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
ISKCON temple kharghar history
नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन… इस्कॉनचा इतिहास काय? ही संस्था कशी चालविली जाते?
pm narendra modi launches mission mausam
‘मिशन मौसम’ला सुरुवात; हवामान विभाग भारतीयांच्या वैज्ञानिक प्रगतीचे प्रतिक, पंतप्रधानांचे गौरवोद्गार
investment opportunities in India,
साहसी भांडवलदारांसाठी संधीचा सुकाळ
interesting facts about formation of the himalayas
कुतूहल : हिमालयाची निर्मिती
Mahakumbh 2025 Grah Yog, subh yog horoscope
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्याच्या मुहूर्तावर ११४ वर्षांनी जुळून आला अद्भुत योग; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल, हाती लागणार पैशांचे घबाड
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन

 ‘शं अन्तरिक्षं दृशये नो अस्तु’ (ऋग्वेद ७.३५ .५) ऋग्वेदाच्या या शांतीसूक्तात ‘अंतरिक्ष आम्हाला अलौकिक दृश्य दाखवणारे ठरो’ अशी प्रार्थना केली आहे. भारताच्या प्रदीर्घ खगोलशास्त्राच्या परंपरेत लगध, आर्यभट, वराहमिहीर, भास्कराचार्य या आणि अशा अनेक खगोलविदांनी अंतराळाच्या अलैकिक घटनांचा अभ्यास करत खगोलशास्त्राचा पाया घातला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ने गेल्या ५४ वर्षांत गरुडझेप घेत भारतीय अंतराळ संशोधनाचा कळस रचला आहे. १५ ऑगस्टला ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना इस्रो ५५व्या वर्षांत पदार्पण करते आहे.

एकोणिसाव्या शतकात जगात नवे वैज्ञानिक वारे वाहत अंतराळातील नवी रहस्ये उलगडत असताना भारत मात्र पारतंत्र्याच्या बेडीत अडकून पडला होता. स्वातंत्र्याची पहाट  उजाडू लागली तशी काही भारतीय वैज्ञानिकांच्या डोळय़ात अंतराळाला स्पर्श करण्याची स्वप्ने दिसू लागली. डॉ. विक्रम साराभाई आणि  डॉ. होमी भाभा या ध्येयवेडय़ा तरुणांची जोडी यात अग्रेसर होती. या दोघांच्या प्रयत्नाने १९४५ मध्ये ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ या संस्थेची स्थापना झाली. १९४७ मध्ये स्वतंत्र झालेल्या देशापुढे अनेक आव्हाने होती. निधिवाटपासाठी अनेक इतर क्षेत्रे प्राथमिकतेवर होती; पण देशाच्या विकासासाठी अंतराळ संशोधनाचा उपयोग होऊ शकतो हे सरकारला पटवून देण्यात शास्त्रज्ञांना यश आले. परिणामी बहुतांश लोकांना वायफळ खर्च वाटूनदेखील अवकाश कार्यक्रम सरकारने स्वीकारला. यासाठी १९६२ मध्ये ‘भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समिती’ (INCOSPAR) स्थापन करण्यात आली. या समितीचे नेतृत्व डॉ. विक्रम साराभाई यांनी केले. याअंतर्गत सुरुवातीला वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी लहान ‘साऊंडिंग’ रॉकेट उडवण्याचे प्रयोग सुरू झाले. यासाठी पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्तावर वसलेले केरळमधले थुंबा हे चिमुकले गाव सर्वार्थाने योग्य ठरले. थुंबा इथल्या जुन्या चर्चमध्ये ‘थुंबा इक्विटेरियल लाँच सेंटर’चे ऑफिस थाटण्यात आले. चर्चपासून किलोमीटर अंतरावर असणारा समुद्रकिनारा हे रॉकेट लॉन्च करायचे ठिकाण. रॉकेटचे सुट्टे भाग सायकलवरून आणून नारळाच्या झाडाखाली डॉ. कलाम आणि त्यांचे सहकारी रॉकेटची जुळवणी करत असत. अशा खडतर परिस्थितीवर मात करत अखेर २१ नोव्हेंबर १९६३ मध्ये भारताने पहिले रॉकेट लाँच केले आणि अंतराळ संशोधनाची मुहूर्तमेढ रोवली. अंतराळ कार्यक्रमाची पायाभरणी करण्यासाठी १९६५ मध्ये साराभाईंनी थुंबालगतच्या वेली इथे अंतराळ व तंत्रज्ञान केंद्र (SSTC) स्थापन केले. १९६८ मध्ये भारताचे थुंबा केंद्र संयुक्त राष्ट्रांना अर्पण करण्यात आले.

अंतराळ संशोधन अधिक व्यापक करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन समितीचे आधुनिकीकरण करत १५ ऑगस्ट १९६९ ला तिचे नामकरण ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ म्हणजेच ‘इस्रो’ असे करण्यात आले. १९७१ मध्ये डॉ. विक्रम साराभाई यांच्या निधनाने भारतीय अंतराळ कार्यक्रमाला मोठा धक्का बसला. यानंतर एम. जी. के. मेनन आणि त्यांच्यानंतर सतीश धवन यांनी इस्रोच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. १९७२ मध्ये भारत सरकारने अंतराळ आयोगाची स्थापना केली आणि १ जून १९७२ पासून इस्रोला ‘डिपार्टमेंट ऑफ स्पेस’च्या  व्यवस्थापनाखाली आणले गेले.

स्वदेशी उपग्रहनिर्मितीचे डॉ. साराभाईंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतीश धवन यांनी प्रयत्न सुरू ठेवले. त्यांनी ‘इंडो सोव्हिएत सॅटेलाइट प्रोजेक्ट’ (ISSP) मोहीम बंगळूरु इथे सुरू करून उपग्रहनिर्मितीचा पाया घातला. यू. आर. राव यांच्या नेतृत्वाखाली बंगळूरु इथल्या पिनया भागात साध्या कामचलाऊ शेडमध्ये स्वदेशी उपग्रहनिर्मितीचे काम सुरू झाले. शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नातून अखेर १९ एप्रिल १९७५ ला पहिला स्वदेशी उपग्रह रशियाच्या मदतीने शियामधील कापुस्टीन यार या अवकाश केंद्रावरून अवकाशात सोडण्यात आला. या उपग्रहाला १५०० वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या महान भारतीय खगोलविद आर्यभट यांचे नाव देण्यात आले. यानंतर १९७५ मध्ये ‘नासा’च्या मदतीने ‘सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपरिमेन्ट’ – (साइट) नावाचा कार्यक्रम राबविण्यात आला. याद्वारे भारतातील  २० जिल्ह्यांतील २४०० गावांमध्ये उपग्रहांच्या मदतीने दूरदर्शन दिसू लागले. साइटच्या धर्तीवर पुढे देशांतर्गत संदेशवहनासाठी ‘सॅटेलाइट टेलिकम्युनिकेशन एक्सपरिमेंट प्रोजेक्ट’ (STEP) प्रकल्प पार पडला. या प्रकल्पातून शास्त्रज्ञांनी उपग्रहांच्या संदेशवहनाचे तंत्र आत्मसात केले आणि  स्वदेशी उपग्रह कार्यक्रम ‘इन्सॅट’च्या निर्मितीला चालना मिळाली. उपग्रह प्रकल्पांच्या व्यवस्थापनासाठी इस्रो सॅटेलाइट सेंटर स्थापन झाले.

ऐंशीच्या दशकात भारताने भारतीय राष्ट्रीय उपग्रह- इन्सॅट ही भूस्थिर उपग्रहांची मालिका विकसित केली. इन्सॅट मालिकेत इन्सॅट-२इ, इन्सॅट-३ब, इन्सॅट-३इ, कल्पना-१ जीसॅट-२, जीसॅट-३ व इन्सॅट-४अ या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले गेले. या प्रणालीने भारताच्या दूरसंचार, आकाशवाणी, दूरदर्शन प्रसार, हवामानशास्त्र इत्यादी क्षेत्रांत क्रांती आणली. इन्सॅट आशिया – पॅसिफिक क्षेत्रातील सर्वात मोठी देशांतर्गत दूरसंचार प्रणाली ठरली.

भारतीय वैज्ञानिकांनी उपग्रहनिर्मितीचे तंत्र विकसित केले असले तरी उपग्रहांना पृथ्वीच्या कक्षेत दाखल करण्यासाठी आवश्यक स्वत:चे प्रक्षेपक म्हणजेच रॉकेट  सज्ज झाली नसल्याने इतर प्रगत देशांच्या मदतीवर विसंबून राहावे लागत होते. हे अवलंबन कमी करत स्वदेशी रॉकेट तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी इस्रोने सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल प्रकल्प हातात घेतला. रॉकेटच्या प्रक्षेपणासाठी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा इथे अधिक सुसज्ज  आणि अत्याधुनिक उपग्रह प्रक्षेपण केंद्र उभारण्यात आले. इथून डॉ. कलामांच्या नेतृत्वाखाली १८ जुलै १९८० मध्ये पहिले भारतीय रॉकेट, १७ टनी ‘एस. एल. व्ही. – ३’  अंतराळात झेपावले. याद्वारे रोहिणी या उपग्रहाला पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्यात यश आले आणि उपग्रह प्रक्षेपणाची क्षमता असणाऱ्या मोजक्या देशांच्या पंक्तीत भारताला मानाचे स्थान मिळाले.

एसएलव्हीनंतर रॉकेटची उपग्रहवहन क्षमता वाढवण्यासाठी ‘संवर्धित उपग्रह प्रक्षेपण यान’ (एएसएलव्ही) ची तयारी सुरू करण्यात आली. सुरुवातीच्या अयशस्वी प्रयोगांनंतर अखेर २० मे १९९२ रोजी ‘एएसएलव्ही डी-३’चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या अनुभवातून १९९४ मध्ये ध्रुवीय कक्षेत उपग्रह पाठवण्याची क्षमता असणाऱ्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाचे (पीएसएलव्ही) यशस्वी प्रक्षेपण झाले. पीएसएलव्हीने अंतराळ मोहिमांची गणिते बदलली. याद्वारे ध्रुवीय, सूर्य-समकालिक आणि भू-समकालिक कक्षामध्ये  कमी खर्चात उपग्रह प्रक्षेपित करणे शक्य झाले. नव्वदचे दशक पीएसएलव्हीने गाजवले. पुढचे लक्ष म्हणून भारताने भूस्थिर कक्षेत उपग्रह पाठवण्यासाठी आवश्यक भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक (जीएसएलव्ही) निर्मितीचे प्रयत्न सुरू केले. याच्या शेवटच्या टप्प्यासाठी निम्नतापी (क्रायोजेनिक) इंजिनाची गरज असते. इस्रोने क्रायोजेनिक इंजिनच्या पुरवठय़ासाठी रशियाच्या ग्लाव्हकोसमॉस या पुरवठादाराशी करार केला; पण बदलत्या भूराजकीय परिस्थितीमुळे भारताला क्रायोजेनिक इंजिन मिळण्यात अडचणी येऊ लागल्या. अखेर भारतीय शास्त्रज्ञांनी मेहनत घेत स्वदेशी  क्रायोजेनिक इंजिनाचे तंत्रज्ञान विकसित केले. १८ एप्रिल २००१ ला भारताच्या जीएसएलव्ही रॉकेटने उड्डाण घेत जीसॅट-१ हा उपग्रह भूस्थिर कक्षेत स्थापन केला. सुरुवातीच्या प्रायोगिक उड्डाणानंतर २००४ मध्ये जीएसएलव्हीचे पहिले व्यावसायिक उड्डाण होत शिक्षणाला समर्पित एज्युसॅट हा उपग्रह सोडला गेला. या उपग्रहाद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचली.

२००८ मध्ये भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला  गेला. २२ ऑक्टोबर २००८ रोजी चांद्रयान-१ या मानवरहित यानाचे प्रक्षेपण पीएसएलव्ही-सी रॉकेटच्या साहाय्याने झाले. याचा इम्पॅक्ट प्रोब चांद्रभूमीवर आदळून भारताचा झेंडा चंद्रावर उमटला. चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात पाण्याच्या अस्तित्वाचा शोध लावत भारताने जगाचे लक्ष वेधले. चंद्रानंतर भारताने अत्यंत कमी खर्चामध्ये आणि संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने मंगळयान मोहीम यशस्वी केली. २४ सप्टेंबर २०१४ ला मंगळयान मंगळाच्या कक्षेत दाखल झाले. पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत अंतराळयान पाठविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला.

२०१६ मध्ये ‘इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम’ मालिकेतील सातवा उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडला गेला. यातून भारताची संपूर्ण स्वदेशी बनावटीची ‘नाविक’ ही स्थितीदर्शक यंत्रणा (जीपीएस)  सज्ज झाली. स्वत:ची ‘जीपीएस’ यंत्रणा विकसित करणाऱ्या मोजक्या देशांत भारताचा समावेश झाला. २०१७ मध्ये पीएसएलव्हीच्या उपग्रहवहन क्षमतेचा पुरेपूर उपयोग करत एकाच उड्डाणात तब्बल १०४ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून भारताने नवा इतिहास घडवला. इस्रोने मिळवलेली विश्वासार्हता आणि  कमी खर्च यामुळे इतर अनेक देश त्यांच्या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी भारताकडे आकर्षित होऊ लागले आहेत.

२०१९ मधली चांद्रयान-२ मोहीम काहीशी अयशस्वी ठरली, तरी त्यातून धडा घेत आवश्यक सुधारणा करत चांद्रयान-३ चंद्राजवळ पोहोचले आहे. येत्या २३ ऑगस्टला विक्रम अवतरक चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात उतरून इतिहास घडेल आणि चंद्रावर सुरक्षित उतरणारा भारत चौथा देश ठरेल. चंद्र आणि मंगळाला गवसणी घातल्यानंतर भारत शुक्रावर स्वारी करायला सज्ज होतो आहे. ‘शुक्रयान’  या महत्त्वाकांक्षी योजनेतून येत्या काही वर्षांत शुक्राभोवती उपग्रह फिरत ठेवून शास्त्रीय निरीक्षणे करण्यात येतील. भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यासाठी ‘गगनयान’ मोहीमही आकार घेत आहे. यासाठी अंतराळवीरांना अवकाशात नेऊन पुन्हा पृथ्वीवर आणणारी कुपी आणि यानाला पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यासाठी ‘ह्युमन रेटेड लॉन्च व्हेइकल’ (एचआरएलव्ही ) हे रॉकेट विकसित करण्यात आले आहे. गगनयानाच्या ड्रोग पॅराशूटची चाचणी मागच्या आठवडय़ात यशस्वीपणे पार पाडली. येत्या दोन वर्षांत भारताचे ‘व्योमनॉट’ अंतराळ स्पर्श करतील. ‘आदित्य एल वन’ मोहिमेतून सूर्याच्या प्रभामंडळाचा अभ्यास करण्यात येईल.

जेव्हा प्रगत देशांची याने विविध ग्रहांभोवती फिरू लागली होती तेव्हा भारताचा  अंतराळ कार्यक्रम सुरू झाला. आरंभीची प्रतिकूल परिस्थिती आणि इतर आव्हानांना तोंड देत भारताने अल्पावधीत मोठी झेप घेतली आहे. सुरुवातीच्या काळात इस्रोने गरजेपोटी इतर देशांच्या मदतीने उपग्रह बनवून त्यांच्याच रॉकेटने प्रक्षेपित केले आणि संदेशवहनाचा श्रीगणेशा केला; पण लवकरच स्वदेशी रॉकेट आणि उपग्रह बनवण्याचे तंत्र आत्मसात करून देश स्वयंपूर्ण केला. अवकाश संशोधनासाठी इतर प्रगत देशांच्या तुलनेने निधी कमी असूनदेखील इस्रोने तक्रार न करता उपलब्ध निधी काटेकोर वापरण्याची शिस्त पाळली. उलट कमीत कमी खर्चात गुणवत्ता हे जणू इस्रोचे ब्रीद ठरले.

इस्रोने जगाचीच नाही तर  भारतीयांची दृष्टीदेखील बदलली. सुरुवातीला अवकाश संशोधनावर होणाऱ्या खर्चाला वायफळ ठरवणारी जनता हळूहळू इस्रोच्या यशात सहभागी होऊ लागली. चांद्रयान, मंगळयान यांसारख्या मोहिमांचे  प्रक्षेपण संपूर्ण भारत श्वास रोखून बघतो आणि मोहिमांचे यश दिवाळीसारखे साजरे करतो. भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई म्हणाले होते, ‘एखाद्या संशोधनात जेव्हा फक्त शासनच नाही तर देशातील जनता सहभागी असते तेव्हाच त्याची खरी सफलता असते.’ अंतराळ मोहिमेत भारतीयांचा उत्साह इस्रोच्या यशाची पावती आहे. गगनभरारी घेण्याचे बळ इस्रोच्या पंखांना असेच मिळत राहो याच शुभेच्छा!

Story img Loader