|| मनीष खन्ना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पारंपरिकपणे आपली भारतीय संस्कृती एकत्र कुटुंबाबरोबर किंवा मित्रांसोबत जेवणाची शिकवण देत आली आहे. आपले डेझर्ट किंवा आपल्या संस्कृतीनुसार बनवण्यात आलेली मिठाई आपल्या दैनंदिन आयुष्यात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती किंवा नातेवाईक यांच्याबरोबर आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण व्यतीत करताना मिठाईनेच त्याची पूर्तता होते. मग ती मिठाई कोणतीही असो, उत्तरेकडील पतीसा, पश्चिमेकडील घेवर, दक्षिणेकडील म्हैसूरपाक किंवा पूर्वेकडील रसगुल्ला असो. भारतीयांचे मिठाईबद्दल असलेले प्रेम हे फार श्रीमंत अशा पुराणकाळापासून चालत आलेले आहे. आपली आवडती मिठाई ही मंदिरात प्रसाद म्हणून दिली जाते, धार्मिक कार्यात, प्रत्येक उत्सव साजरा करताना मिठाईशिवाय परिपूर्णता येत नाही. म्हणून मिठाई ही आपल्याला खूप जवळची आहे.

आधुनिक काळात शेफ आपल्या कल्पक बुद्धीचा वापर करताना वेगवेगळ्या साधनसामुग्री आणि चवीचा वापर करून भारतीय मिठाई फ्युजन पद्धतीने सादर करत आहेत. पूर्वी कधी नावं ऐकलेलीही नसतील अशा नावात आता मिठाई मिळते आहे, तथापि अलीकडील वर्षांमध्ये पाश्चात्त्य मिष्टान्न भारतीयांची लोकप्रियता मिळवत असल्याने शेफमंडळी पाश्चात्त्य मिष्टान्न आणि भारतीय लोकप्रिय मिठाईचा अनोखा संगम साधण्याचा प्रयत्न करत आले आहेत. परिणामी आपल्या मुलांसाठी भारतीय आणि पाश्चात्त्य मिठाईचे सुंदर, अफलातून मिश्रण साधत वेगवेगळ्या प्रकारचे डेझर्ट्स आज बाजारात उपलब्ध झाले आहेत. गुलाबजाम चीझ केक, रबडी मूस, श्रीखंड टार्ट, कलाकंद बटर केक आणि इतर डेझर्ट्सनी मिठाईच्या दुकानांत ठाण मांडलेलं आपल्याला सहज दिसून येईल.

एका साध्यासुध्या पदार्थापासून बनवलेले असे भन्नाट कॉम्बिनेशन्स साधणारे शो स्टॉपर डेझर्ट्स तेही जागतिक आवडीनिवडीचा विचार करून बनविणे म्हणजे जोखमीचे काम. पण अशा प्रकारे गुलाबजाम चीझ केक, शाही फिरनी टार्ट, गाजर हलवा पन्नाकोटासारखी स्वादिष्ट मिठाई बनवण्याची संधी आम्हाला मिळते. या नावीन्यपूर्ण प्रयोगांमुळे उत्साहित होऊन मीही भारतीय डेझर्ट्सना केक आणि पेस्ट्रीमध्ये घालून वेगळे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केला. यातील काही अगदी वैविध्यपूर्ण होते तर काही पदार्थानी साफ निराशा केली. मात्र अथक प्रयत्नांमधून मिठाईपासून केक बनवण्याचे हे प्रयत्न यशस्वी ठरले. आणि सध्या रसमलाई केक, गुलाबजाम केक, मोतीचूर रबडी केक, गाजर हलवा चीझ केक आणि शाही फिरनी पाई असे अनेक पदार्थ आमच्या ग्राहकांसाठी आम्ही उपलब्ध क रून देऊ शकलो. सध्या या केक्सना विशेष मागणी आहे.

सुरुवातीला मिठाई ते केक बनवण्याच्या या प्रयोगाकडे ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. काही काळानंतर मात्र भारतीय मिठाईचे चाहते असलेल्या खवय्यांकडून त्यांच्या आवडत्या मिठाईचे केक बनवण्यासाठी स्पेशल ऑर्डर येऊ  लागल्या. काही दिवसांपासून मसाला चहाच्या चवीवर खूप सारे प्रयोग करत होतो. त्याही प्रयत्नांना यश आले असून आता लवकरच मसाला चहाच्या चवीचे डेझर्ट सणासुदीच्या काळात फुडी मंडळींच्या भेटीला येतील.

जुन्या केकचे रूपांतर नवीन चवीमध्ये करणे हाही सध्याचा नवीन ट्रेंड आहे. मिठाईची जागा घेणे कठीण असल्यामुळे पाश्चात्त्य केक आणि भारतीय मिठाईचे फ्लेवर्स एकत्रित करून बनवलेले केक भारतीय बाजारात सध्या खूप मागणीत आहेत आणि हे केक सर्व वयोगटातील लोकांना आवडतात हे विशेष आहे.

प्रेमाच्या या गुलाबी महिन्यात ‘शेफखाना’ सदरातून महिनाभर ट्रेंडिंग डेझर्टविश्वाची सफर तुम्हाला घडवताना मला स्वत:ला खूप मजा आली. गेल्या तीन लेखांमधून दिलेली माहिती व रेसिपी तुम्हाला खूप आवडली याची पोच मला ई-मेल व पत्राद्वारे तुम्ही वेळोवेळी कळवल्याने तुमचे मनापासून आभार !!

या सीरिजमधील सर्वात शेवटचा लेख तुम्हा वाचकांसमोर ठेवताना अत्यानंद होतो आहे. टी-केकपासून सुरू झालेला आपला प्रवास चॉकलेट व कोकोनट डेझर्टची सैर करत आता भारतीय मिठाई केकच्या थांब्यावर येऊन पोहोचला आहे.

गुलाबजाम रबडी केक

  • साहित्य : १ वॅनिला स्पाँज ६ इंच व्यास, २५० ग्रॅम व्हीप क्रीम, १५० अधिक १५० ग्रॅम रबडी, ६ गुलाबजाम, ३० ग्रॅम बदामाचे काप, साधे साखर पाणी सोकिंग करता..
  • कृती : वॅनिला स्पाँजचे दोन गोलाकार काप करून घ्या. एका भांडय़ात व्हीप क्रीम आणि १५० ग्रॅम रबडीचे मिश्रण करून बाजूला ठेवा. साखर पाणी वॅनिला स्पाँज ओला करण्यास वापरावा. त्यावर रबडीयुक्त व्हीप क्रीमने लेपन करावे. उरलेल्या रबडीचा अर्धा भाग केकवर पसरवून त्यावर गुलाबजामचे तुकडे करून ते ठेवावेत. नंतर दुसरा स्पाँज घेऊन साध्या साखरपाण्याने ओला करून रबडीयुक्त व्हीप क्रीमने लेपन करून पहिल्या स्पाँजवर ठेवावा. संपूर्ण केक क्रीमने कव्हर करून गुलाबजाम, उरलेली रबडी आणि बदामाच्या कापनी वरती सजवा. थोडय़ा वेळासाठी फ्रिजमध्ये ठेवून केक सव्‍‌र्ह करा.

रसमलाई केक

  • साहित्य : १ वॅनिला स्पाँज ६ इंच व्यास, २५० ग्रॅम व्हीप क्रीम, २० मिली केशर सिरप, ६ रसमलाई चाशनीसहित, ३० ग्रॅम पिस्ताचे तुकडे.
  • कृती : वॅनिला स्पाँजचे दोन गोलाकार काप करून घ्या. एका भांडय़ात व्हीप क्रीम आणि केशर सिरप मिश्रण करून बाजूस ठेवावे. रसमलाई चाशनीमधून बाहेर काढून ठेवावे. आणि त्या चाशनीचा वापर वॅनिला स्पाँज ओला करण्यास वापरावा. त्यावर केशरयुक्त व्हीप क्रीमचे लेपन करावे. ३ रसमलाई घेऊन त्याचे तुकडे करून त्यावर ठेवावे. नंतर दुसरा स्पाँज घेऊन चाशनीने ओला करून त्यावरही केशरयुक्त व्हीप क्रीम लेपून घ्यावा. आता हा स्पाँज पहिल्या स्पाँजवर ठेवा आणि संपूर्ण केक क्रीमने कव्हर करून रसमलाई आणि पिस्ताच्या तुकडय़ांनी वरती सजवावा. थोडय़ा वेळासाठी फ्रिजमध्ये ठेवून सव्‍‌र्ह करावा.

केशरयुक्त पिस्ता केक

  • साहित्य : १ वॅनिला स्पाँज ६ इंच व्यास, २५० ग्रॅम व्हीप क्रीम, २० ग्रॅम केशर सिरप, २० ग्रॅम पिस्ता सिरप, सोकिंग करता साधे साखर पाणी, गार्निशिंगसाठी व्हाइट चॉकलेट आणि ३० ग्रॅम पिस्त्याचे तुकडे.
  • कृती : वॅनिला स्पाँजचे दोन गोलाकार काप करून घ्या. एका भांडय़ात ५० ग्रॅम व्हीप क्रीम, केशर सिरप आणि पिस्ता तुकडे एकजीव करून मिश्रण बाजूला ठेवा. उरलेल्या व्हीप क्रीममध्ये केशर सिरपचे मिश्रण करून बाजूल ठेवा. साखर पाण्याचा वापर करून दोन्ही वॅनिला स्पाँज ओले करावेत. त्यावर केशर सिरपयुक्त व्हीप क्रीमचे लेपन करा. नंतर उरलेल्या वॅनिला स्पाँजवर पिस्ता क्रीमने लेपन करून पहिल्या स्पाँजवर ठेवावे. संपूर्ण केक केशरयुक्त क्रीमने कव्हर करून पिस्ता काप आणि व्हाइट चॉकलेट त्यावरती सजवावे. थोडय़ा वेळासाठी फ्रिजमध्ये ठेवून सव्‍‌र्ह करा केशरयुक्त पिस्ता केक..

शब्दांकन : मितेश जोशी