प्रसिद्ध चॉकलेटिअर आणि शेफ वरुण इनामदार यांनी देश-विदेशातील चॉकलेट्सची चव घेत केलेलं हे चॉकलेटी रसग्रहण! या पाक्षिक सदरातून शेफ वरुण नव्या-जुन्या चॉकलेटी दुनियेची सैर घडवतात. अनेक लोकप्रिय चॉकलेट बार्सचा अविभाज्य भाग असूनदेखील स्वतंत्र अस्तित्त्व नसणाऱ्या न्यूगट नावाच्या सूत्रधाराविषयी आजच्या लेखात..

कर्तृत्ववान एकटा नसतो. त्याच्यामागे कुणाचा तरी हात असतो. गोडधोडाच्या दुनियेत चॉकलेटचं तसंच आहे. चॉकलेटच्या अवीट चवीच्या मागे त्याच्यात मिसळलेले आमंड, पिस्ता, अक्रोड म्हणा वा काजू आणि हेजलनट हे उभे असतात. या साऱ्यांचं मुख पाहिलं की, साऱ्यांच्याच चेहऱ्यावर हसू पसरतं; पण ते उमटतं तेव्हा जिभेला पाणी सुटतं; पण यामागे एका छुप्या रुस्तमची कामगिरी मोठी असते, ती म्हणजे न्यूगटची. आता  Nougat (उच्चारी ‘न्यूगट’ किंवा ‘नूगाट’) ही बुवा काय भानगड आहे? तर चघळण्याची कॅण्डी. साखर किंवा मधापासून बनवलेली रसाळ कँडी. आजवर ही कँडी कळायची कशी काय राहिली, या प्रश्नाने अनेकांच्या भुवया उंचावल्या; पण त्याला इलाज नाही, कारण हे न्यूगट स्वत:चं असं वेगळं अस्तित्व घेऊन चॉकलेटच्या दुनियेत मुळी वावरत नाही. त्याचं कुणाशी तरी सख्य राहिलं आहे. आता ‘न्यूगट’ हा शब्द मुळात फ्रेंच भाषेतील ‘नॉगो’ या शब्दापासून आला आणि आज जगभरात मान्यता पावला. ‘नॉगो’ म्हणजे ‘नट्स’. फार वर्षांपूर्वी नट्सला या भाषेत ‘नॉगो’ म्हटलं जात होतं.

चवीला आसुसलेल्या अनेकांच्या रसनांना तृप्त करायचं, पण स्वत:चं डिंडिम कधी वाजवायचं नाही असं काहीसं या ‘न्यूगट’च्या बाबतीत म्हणता येईल. म्हणजे पडद्यामागचा सूत्रधार म्हणून काम करायचं; पण अख्खा प्रयोग गाजवायचा आणि पुन्हा स्तुतीची अपेक्षा ठेवायची नाही. गुलाबजामुनला गोड साखरेचा पाक, पण स्तुती मात्र गुलाबजामुनची, तसंच काहीसं याचं!

या न्यूगटची तीन रूपं. ‘व्हाइट न्यूगट’ ज्याचा जन्म साखर किंवा मधापासून झालाय म्हणजे या प्रकाराचं बहुतेक जण अधिक सेवन करतात. हा मधाळ असणारच. शिवाय मखमली हे याचं आणखी मोहक वैशिष्टय़. आता हा न्यूगट इतका मनमिळाऊ, की चॉकलेटमध्ये स्वत:ला विलीन करून टाकायचं आणि आपली चव कायम राखायची. ‘मुरावे परी चवरूपी उरावे’, हे याचं ब्रीद.

दुसरा आहे ‘ब्राऊन न्यूगट’. आता याच्या रंगावरूनच तो आपले गुण दाखवतो. म्हणजे तो व्हाइट न्यूगटसारखा पारदर्शी, मऊ नाही. तर हा आतल्या गाठीचा. कडक. त्याची बांधणी म्हणजे निर्मितीच तशी आहे. याचं ‘टेक्स्चर’ जाडभरडं. म्हणून मग याला फ्रेंचमध्ये स्वतंत्र नाव देण्यात आलं- ‘न्यूगटाइन’! हेजलनट्स टाकून खरपूस भाजलेल्या साखरपाकाचा क्रीमी असा याचा बांधा. नट्स आणि साखरेच्या मिश्रणाला ‘प्रालीन’ म्हणतात. म्हणून ‘प्रालीन’ हा शब्द न्यूगटला जोडून तो ‘न्यूगटाइन’ झाला.

‘न्यूगट’ला अंगाखांद्यावर घेऊन अनेक ‘चॉकलेट्स’ भारतातही विराजमान झाली आहेत. ‘फाइव्ह स्टार’वर याआधी मी लिहिलंय. तोच यातील पहिला शिलेदार. यापेक्षा तो कसदार शिलेदार आहे, हे अनेक जणांच्या लक्षात आले नसेल; पण इथे पुनरुक्तीचा गुन्हा मला माफ आहे, म्हणजे मला मुद्दामहून सांगावं लागेल की, जिभेचे लाड पुरवणाऱ्यांसाठी ‘न्यूगट’ हा हेल्दी आहे आणि जे ‘हेल्थ कॉन्शस’ त्यांच्यासाठीही तो तितकाच लाभदायी आहे. अनेकांच्या जिव्हांना न्यूगटच्या अवीट गोडीची अनुभूती आली असेलच.

लहानपणी जिभेवर सतत रेंगाळणारी ती चव अजूनही अनेक जणांचा पिच्छा अद्याप सोडत नसेल तो ‘नेस्ले बार’. न्यूगट आणि कॅरेमलने परिपूर्ण असलेल्या मिल्क चॉकलेटमध्ये गुंडाळलेल्या या बारची चव बार बार चाखली असेल. ‘नॉस्टेल्जिया’ ही जादू खाण्यात विशेष करून चॉकलेटच्या रूपाने अनेकांच्या जीवनात कायम आहे. हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही.

नुकताच मी कर्नाटकातील पुत्तूर येथील ‘कॅम्पको’ चॉकलेट फॅक्टरीला भेट द्यायला गेलो होतो. तिथल्या व्यवस्थापकांनी आमचे स्वागत गोडधोडाच्या संस्कृतीला शोभेल असेच केले. फॅक्टरीच्या प्रवेशद्वारावर पाऊल टाकल्यावर त्यांनी आमच्या हातात कॅम्पको बार ठेवला ज्याच्यात कॅरेमल, न्यूगट आणि क्रीमी मिल्क चॉकलेट यांचा अपूर्व संगम होता. तो तोंडात टाकल्यानंतर काही क्षण मला त्या बारची चव अन्य कोणत्याही उत्पादनाशी मिळतीजुळती नसल्याचे जाणवले. म्हणजे कॅम्पको बार त्याच्या ठिकाणी एकमेवाद्वितीयच होता. पण कुठेतरी ही चव ओळखीचीही वाटत होती. ‘देजाऊ’ म्हणा हवं तर. त्या बारचा एक बॉक्स मी येताना घेतला. माझी बहीण शिवानी हिला तो द्यायचा होता. तिला हे चॉकलेट दिलं तेव्हा ओळखीच्या चवीचं रहस्य उलगडलं. माझ्या पाचव्या वाढदिवासाच्या पार्टीची माझ्याकडून देण्यात आलेली ही रिटर्न गिफ्ट होती. माझ्या मित्रांनी  अक्षरश: मिटक्या मारत कँपको तेव्हा फस्त केली होती.

‘मार्स बार’ची अशीच गंमत आहे. या बारने अनेकांच्या जिभांना मिल्क चॉकलेटचे व्यसन लावले. याच्यातही कॅरेमल आणि मिल्क चॉकलेटचा संगम. हा बार सध्या भारतात सर्वत्र उपलब्ध आहे.

शेवटी टॉबलरॉनसारख्या वेगळ्या मिश्रणाची चव असलेल्या बारचीही जादू तशीच. याला मध आणि आमंड न्यूगटचे आवरण; पण याचे न्यूगट काहीसे वेगळे. ज्यांची क्षुधा केवळ इतक्यावरच भागत नाही. त्यांना लिण्डट् स्विस मिल्क चॉकलेट बार आहे. यात काळ्या मनुका, हेजेलनट यांचे मिश्रण असते. अनेक फाइन डाइन हॉटेल्समध्ये या चॉकलेटची चव तुम्हाला चाखता येईल. स्मिटनच्या बारमध्ये भाजलेल्या आमंडसोबत व्हाइट न्यूगटची युती म्हणजे चॉकलेटप्रेमींची खाण्याची तगमग आणखीनच वाढवते. याचा अर्थ मला याविषयी अधिक काही सांगण्याची गरज नाही. सारे जण आपापल्या गुणांनी सिद्ध आहेत. म्हणजे चव आणि कसदार या दोहोंचा मिलाफ त्यांच्यात झाला आहे.

(अनुवाद : गोविंद डेगवेकर)

Story img Loader