शब्दांकन : राधिका कुंटे
‘दादर, मुंबई २८’ हा पत्ता असणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात माझा जन्म झाला. लहानपणापासून मी सिलेक्टिव्ह आणि फोकस्ड होते. नेहमीच मी माझ्या आवडीच्या गोष्टी करत आले आहे. मला वाचन, गाणं, ड्रॉइंग, लिखाणाची आवड आहे. प्रत्येक गोष्ट मनासारखी होईपर्यंत त्यात झोकून देण्याची सवय असल्याने पुढे काहीतरी वेगळं करायचं हे लहानपणीच ठरलं होतं. वयाच्या अकराव्या वर्षी पहिल्यांदा सिंगापूरला गेले तेव्हा मला भारतातील आणि परदेशातील शैक्षणिक पद्धतींबद्दल कुतूहल वाटलं. पहिल्यांदा मुंबई ते चेन्नईच्या विमान प्रवासात महिला वैमानिकाला पाहून नकळत मी या क्षेत्राकडे आकर्षित झाले. तेव्हाच आपणही वैमानिक व्हायचं, हे मनाशी पक्कं ठरवलं होतं. मग एव्हिएशन क्षेत्राची माहिती जाणून घेऊ लागले. कोणत्या विषयाचं ज्ञान लागतं, उत्तम शिक्षण कुठं मिळतं, त्याचा खर्च – कालावधी, पोस्टिंग, डय़ुटी, कामाचे तास, एअरलाइन्स कंपनी, निष्णात वैमानिकांचे अनुभव अशी सगळी माहिती घेत होते. भारतात कोविडचा शिरकाव झाला आणि सगळं बदलून गेलं. आमच्या बोर्डाच्या परीक्षेचा शेवटचा पेपर रद्द झाला होता. मी साने गुरुजी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून एसएससी झाले. पुढे अकरावी-बारावी विद्यालंकार इंटिग्रेटेड कॉलेजमध्ये केलं. कोविडमुळे जग जणू एका ठिकाणी थांबलं. अनेक उद्योगधंदे बंद झाले. याचा सर्वाधिक परिणाम एव्हिएशन क्षेत्रात झाल्याचं जाणवलं. तेव्हा अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या दृष्टीने संधी उपलब्ध होतील का? याचा शांतपणं मागोवा घेतला आणि या क्षेत्राऐवजी दुसरा आवडीचा पर्याय शोधू लागले. त्यासाठी बाबांचा सल्ला खूप उपयोगी पडला. फॅशन बिझनेस मॅनेजमेंट / इंटरनॅशनल बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंटमध्ये करिअर करण्याचं निश्चित झाल्यावर अकरावीच्या अभ्यासासोबत मी एसएटी / टोफेलचा अभ्यास सुरू केला. टेक्नॉलॉजी आंत्रप्रीनरशिप : लॅब टु मार्केट (हार्वर्ड युनिव्हर्सिटी), मॅनेजमेंट ऑफ फॅशन अॅण्ड लक्झरी कंपनीज (युनिव्हर्सिटा बोकोनी), इंटरनॅशनल बिझनेस फस्र्ट अॅण्ड सेकंड (युनिव्हर्सिटी ऑफ न्यू मेक्सिको), सस्टेनेबल फॅशन (कोपनहेगन बिझनेस स्कूल) अशा जगभरातील काही प्रख्यात युनिव्हर्सिटीजमधून काही ऑनलाइन कोर्स केले. दरम्यानच्या काळात मुंबईतील काही संस्थांमध्ये प्रत्यक्ष काही तास काम करून थोडा अनुभव गोळा केला आणि या परीक्षा दिल्या.
परदेशात शिक्षणासाठी जाणारे अनेकजण काऊन्सिलर (सल्लागार) नेमतात. ते युनिव्हर्सिटीच्या अॅप्लिकेशन्सपासून ते विषय निवडीपर्यंतचा सल्ला देतात. पण मी काऊन्सिलर न नेमता स्वत:च सगळी माहिती शोधली. जवळपास तीस युनिव्हर्सिटीजमध्ये अॅप्लिकेशन्स केली आणि तीसही ठिकाणी निवडली गेले. प्रत्येक युनिव्हर्सिटीचा फॉर्म वेगळा असतो. प्रत्येक ठिकाणी वेगळे प्रबंध लिहावे लागतात. प्रोफाइल तयार करावं लागतं. स्कॉलरशिपसाठी वेगळे फॉर्म व प्रोफाइल्स लिहावे लागतात. त्यानंतर आपल्याला युनिव्हर्सिटी निवडते. आपल्याला भक्कम आर्थिक पाठबळ लागतं. माझ्या सुदैवाने आई-बाबा प्रत्येक पावलागणिक ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. युनिव्हर्सिटीमधल्या सगळय़ा व्यावहारिक गोष्टी स्वत:च बारकाईने केल्याने लॉकडाऊनमधला कठीण काळ मी सकारात्मकतेत परावर्तित करू शकले. माझ्या निवडीच्या वेळी तगडी स्पर्धा होती. दोन वर्षांतील मुलं त्या वर्षी एकत्र असल्याने युनिव्हर्सिटीजनी रिझल्ट खूप सिलेक्टिव्ह लावला होता. पण माझा जीपीए स्ट्राँग असल्याने माझी सगळीकडेच निवड झाली. या सगळय़ामध्ये व्हिसा प्रोसेस खूप महत्त्वाची होती. अनेकांचे व्हिसा नाकारले जात होते. त्यामुळे तेही एक दडपण होतं, मात्र माझी व्हिसाची मुलाखत खूप छान झाली आणि त्या तीस सेकंदात माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
मी पहिल्यांदाच एकटी प्रवास करत होते. अनेकांचे अनुभव ऐकल्याने सगळी दक्षता घेतली होती. मुंबई ते लंडन आणि लंडन ते ह्युस्टन असा प्रवास होता. मुंबईत विमानाच्या उड्डाणाला दोन तास उशीर झाला, मात्र पुढचं विमान वेळेवर होतं. त्यामुळे लंडनमधील हॉल्ट कमी झाला होता. (हिथ्रो एअरपोर्ट अजस्र आहे. आतल्या आत दोन ट्रेन बदलून मी पुढचं विमान पकडण्यासाठी पोहोचले.) मी अमेरिकेत ह्युस्टनला सगळय़ा प्रोसेस पूर्ण करून सामान घ्यायला गेले तेव्हा ते सापडेना. हेही एअरपोर्ट बरंच मोठं आहे. तिथे वायफाय नेटवर्क नसल्याने मला एअरपोर्टवर घेण्यासाठी आलेल्या मुलीसोबत संवाद साधता येईना. माझ्या एअरलाइन्सच्या काउंटरला पोहोचेपर्यंत तो बंद झाला होता. सगळं सामान त्या दोन बॅगांमध्येच असल्याने मी जाम गोंधळून गेले होते, पण वेळ न दवडता त्या मुलीला भेटले. तिने वायफाय नेटवर्क शेअर केल्यावर गोष्टी सुरळीत झाल्या. एअरपोर्टवर फॉर्म घेऊन ‘लगेज मिसिंग कंप्लेंट फाइल’ करत असतानाच एअरलाइन्स कंपनीचा कॉल आला की माझं सामान लंडन एअरपोर्टलाच राहिलं असून दुसऱ्या दिवशीच्या विमानाने सामान पाठवलं जाईल. त्यामुळे जरा हायसं वाटलं. मात्र ते सामान माझ्या पत्त्यावर जवळपास चौथ्या दिवशी आलं आणि माझ्याकडे लोकल नंबर नसल्याने पुन्हा एअरपोर्टला परत गेलं. ही तारांबळ आणि सगळी खबरदारी घेऊनही प्रत्यक्ष घडलेला प्रसंग मला बरंच काही शिकवून गेला.
मी ‘युनिव्हर्सिटी ऑफ ह्युस्टन’मधल्या ‘द ऑनर्स’ कॉलेजमध्ये The Bauer Business Honors Program ( Bauer Honors) गेले पाच महिने शिकते आहे. हे अमेरिकेतल्या टॉप १० बिझनेस कॉलेजपैकी एक आहे. तिथे अनेक बडय़ा कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू होतात. इथे मला चांगली शिष्यवृत्ती मिळाल्याने फी कमी झाली. मला आई-बाबांवर जास्त आर्थिक भार टाकायचा नव्हता. त्यामुळे तीसपैकी हेच विद्यापीठ मी निवडलं. ही अंडरग्रॅज्युएट पदवी चार वर्षांची असून सध्या आमच्या बॅचची प्री बिझनेस स्टेज आहे. आम्हाला सगळय़ा विषयांची तोंडओळख करून दिली जाते. त्यातून आपली आवड ओळखून विषय निवडायचा असतो. त्यामुळे मी माझा मुख्य विषय अजून निवडला नाही. आम्ही अनेक विषय शिकत असून मला मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम हा विषय शिकायचा आहे. त्यात विज्ञान आणि उद्योगविश्व या दोन्ही विषयांचा समावेश होतो. माझे आवश्यक असलेले क्रेडिटस् पूर्ण झाल्यावर मी माझा विषय निवडू शकते.
इथलं वातावरण आणि शिकवण्याची पद्धत खूप वेगळी आहे. माझ्यासोबत जगभरातील मुले आहेत. त्यांच्यासोबत स्पर्धा आहे, त्यामुळे अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत. परीक्षेत लिखाणापेक्षा विद्यार्थ्यांना विषय समजला आहे ना हे पाहिलं जातं. प्रॅक्टिकल्सवर भर दिला जातो. या सगळय़ाची पूर्वकल्पना होती कारण इथे यायच्या आधी मी स्वत:ला त्या दृष्टीने तयार केलं होतं. यूटय़ूबवर काहींचे अनुभव ऐकले होते. नेटवरून माहिती वाचली होती. शिवाय मी ऑनलाइन केलेल्या अभ्यासक्रमांतूनही थोडी कल्पना आली होती. ते शिकवणं सोप्या भाषेत होतं आणि सहज लक्षात राहायचं. तरीही प्रत्यक्षात पहिल्या परीक्षेनंतर इथल्या शिक्षण पद्धतीचा अंदाज आला आणि आता सगळं अॅडजस्ट झालं आहे. इथे प्राध्यापकांना कधीही भेटून आपल्या शंका विचारता येतात. माझ्यासारख्या परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदतीचा हात आणि वेळोवेळी सल्ला दिला जातो. आमचे अकाऊंटिंगचे प्राध्यापक डॉ. मायकेल न्यूमन यांनी तुम्ही सगळय़ांनी नुकताच शिक्षणाचा श्रीगणेशा केला असल्याने पहिल्या परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत, असा आम्हाला दिलासा दिला होता.
इथे भरपूर एसेज (निबंध) लिहावे लागतात. मी ह्युमन सिच्युएशन हा कोर्स करते आहे. त्यात ग्रीक तत्त्वज्ञानाचा समावेश आहे. आठवडय़ातून पाच दिवस ही लेक्चर्स असतात. एक पुस्तक वाचून रोज त्यावर चर्चा करायची असते. ते करताना मी निबंध लिहीत होते, कारण फायनल पेपरमध्ये या पुस्तकातून तुम्हाला काय कळलं, हे लिहायचं होतं. किंवा कधी व्हिडीओ दाखवून त्यातून काय कळलं हे लिहायचं असतं. तेव्हा वेळोवेळी लिहिल्याने माझा चांगला सराव झाला असून त्याचा आत्ता मला फायदा होतो आहे. हे निबंध एमएलए फॉरमॅटनुसार ( मॉडर्न लँग्वेज असोसिएशन) लिहिले जातात. इथे केवळ थिसिस लिहिणंच अपेक्षित नसून त्यात युक्तिवाद करणं अपेक्षित आहे. निबंध फायनल सबमिट करण्याआधी त्याचा ड्राफ्ट तयार करून तो प्राध्यापकांना किंवा रायटिंग सेंटरमध्ये जाऊन दाखवता येतो. किंवा वाटल्यास क्लासमेटशी चर्चा करता येऊ शकते. त्यात आवश्यकता असल्यास त्यांच्या सूचनांच्या आधारे तो सुधारून मग फायनल सबमिशन करू शकतो.
इंटर्नशिपही पहिलं वर्ष संपल्यावर किंवा दुसऱ्या वर्षांत करता येते. मोठय़ा कंपन्यांकडून इंटर्नशिप तेव्हाचा जीपीए बघून दिली जाते. शिवाय विद्यार्थ्यांच्या इतर अॅक्टिव्हिटीजही पाहिल्या जातात. मलाही मार्केटिंग किंवा मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम या विषयांशी निगडित इंटर्नशिप करायची आहे. सध्या अभ्यासामुळे फक्त पेंटिंग करते आहे, पुढच्या सेमिस्टरला मी गाणं, ड्रॉइंग वगैरेंच्या क्लबमध्ये जाईन. इथे इंडियन स्टुण्डण्ट ऑर्गनायझेशन असून त्यात हिंदूू युवा ही एक संघटना आहे. त्याद्वारे आम्ही सगळे मिळून आपले सणवार साजरे करतो. इथे स्पोर्ट्स क्लब जॉइन केला नसला तरी मी व्हॉलिबॉल, बॅटिमटन, टेनिस खेळते. कधीकधी एकटं वाटतं, आई-बाबांची आठवण येते, पण मग आपण करिअरसाठी इथे आलो आहोत, भावनांचा अतिरेक होणं चांगलं नाही, असं स्वत:लाच समजावते. कधी फोनवरून आई-बाबा माझी समजूत घालतात. कधी मित्रमैत्रिणींशी बोलून बरं वाटतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर चांगल्या कंपनीत नोकरी करून शैक्षणिक कर्ज फेडायचं आहे. त्यानंतर एमबीए करायचा विचार आहे. त्यासाठी कॉलेज शोधणं, इंटर्नशिप वगैरेचा विचार सुरू आहे. पुढे पुन्हा नोकरीचा अनुभव घेऊन मग स्वत:ची कंपनी किंवा ब्रॅण्ड सुरू करायचा आहे. विश मी लक!
viva@expressindia.com