शब्दांकन: श्रुती कदम
जो आँखो से दिखाई तो नहीं देते लेक़िन जिनके होने का है हरपल एहसास।
और युगों युगोंसे हैं सभीको जिनपर विश्वास ऐसी अद्भूत हैं
कृष्ण लीला।
लॉन्ग शॉर्ट टेल्स निर्मित स्पॉटिफायवर प्रसारित होणाऱ्या ‘श्रीकृष्ण लीला’ या पॉडकास्टमध्ये भगवान श्रीकृष्ण यांच्या कथा संगीताचा वापर करून रंजक प्रकारे सांगितल्या जातात. हिमांशू त्यागी आणि नीरज प्रभाकर लिखित या पॉडकास्टमध्ये भगवान श्रीकृष्ण यांच्या अनेक कथा श्रोत्यांना ऐकवल्या जातात. विशेष म्हणजे आर. जे. हिमांशू त्यागी स्वत: श्रीकृष्णाच्या भूमिकेतून या कथा श्रोत्यांना ऐकवत असल्याप्रमाणे सादर करतो. त्यामुळे या कथा अधिक मनोरंजक वाटतात. ‘श्रीकृष्ण लीला’ या पॉडकास्टमधील पहिल्या भागात द्वापार युगात श्रीकृष्ण यांनी जन्म का घेतला? याचे वैशिष्टय़ सांगितले आहे. तसेच या पॉडकास्टच्या प्रत्येक भागात प्रेक्षकांसाठी एक प्रेरणादायी संदेश दिला जातो. प्रत्येक भागाच्या सुरुवातीला श्रीकृष्णाबद्दल चार ओळी ऐकवून पॉडकास्टची सुरुवात केली जाते. पहिल्या भागात ‘जो आँखो से दिखाई तो नहीं देते, लेक़िन जिनके होने का है हरपल एहसास और युगों युगोंसे हैं सभी को जिनपर विश्वास ऐसी अद्भूत हैं कृष्ण लीला’ अशा काव्यपंक्ती ऐकवल्या गेल्या आणि मग गोष्टीची सुरुवात झाली.
हेही वाचा >>> ऐकू आनंदे
मी यावर्षी होळी या सणाच्या निमित्ताने माझ्या मित्र-मैत्रिणींसोबत मथुरेला गेले होते. तिथे आम्हाला श्रीकृष्णाबद्दल लोकांमध्ये असलेले प्रेम आणि आस्था फार जवळून पाहायला मिळाली. मोठय़ा शहरांमध्ये लोकांना कामाचे अनेक व्याप असल्यामुळे तल्लीन भक्ती इथे दिसत नाही. पण आम्ही मथुरेमध्ये असताना लोक एकमेकांना फार नम्रपणे नमस्कार करून पुढे जाताना पाहिले. तिथे असलेल्या वातावरणाची आठवण ‘श्रीकृष्ण लीला’ हा पॉडकास्ट ऐकताना झाली. त्यामुळे मी दर सोमवारी आणि बुधवारी हा पॉडकास्ट आवडीने ऐकते. आजकालची तरुण पिढी ही फक्त रिल्स, स्नॅप, क्लब पार्टीमध्येच अडकली नाही आहे, तर असे अनेक तरुण आहेत जे तंत्रज्ञानाचा वापर योग्य गोष्टींसाठी करतात आणि विशेष म्हणजे अध्यात्माकडे देखील त्यांचा कल आहे. – अभया इनामदार ( विद्यार्थिनी )