लग्न ठरल्याची कुणकुण जरी ऐकली तरी पहिला प्रश्न येतो.. आपल्यातलंच स्थळ आहे ना? परजातीय, परप्रांतीय, परभाषीय लग्नांच्या आजही कथा होतात. आम्ही दोन राज्यांच्या संस्कृतींना जोडणाऱ्या अशाच काही जोडप्यांना त्यांचा अनुभव शेअर करायला सांगितलं. त्यांच्या लग्नाच्या गोष्टी त्यांच्याच शब्दात..
मुलगा पंजाबी आणि मुलगी साऊथ इंडियन.. मुलाच्या घरच्यांना पंजाबी लग्नाची, भपक्याची सवय आणि त्याचा गर्व; तर दक्षिण भारतीयांना आपल्या बुद्धिजीवी समाजाविषयी आणि ‘पवित्र’ चालीरीतींविषयी जाज्वल्य अभिमान.. अशा अवस्थेत हे लग्न कसं पार पडतं, याची गोष्ट आहे गेल्या आठवडय़ात रिलीज झालेल्या ‘टू स्टेट्स’मध्ये. चेतन भगत यांच्या गाजलेल्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट नवा असला तरी आंतरजातीय, आंतरराज्यीय विवाह हा काही नवा विषय नाही. पण आजही अशी लग्नं होताना प्रेमात पडलेल्या नवरा-नवरीला कितने पापड बेलने पडते हैं.. त्यांनाच माहिती. कारण ‘लग्न’ हा तसा फारच गंभीर विषय! घरात कोणाचं लग्न ठरतंय अशी कुणकुण लागली न लागली की, पहिला प्रश्न ठरलेला असतो, ‘आपल्यामधलंच आहे ना स्थळ?’ म्हणजे थोडक्यात काय, तर जात, समाज या गोष्टींविषयी चर्चा तर होतेच. बहुतेक वेळा एकाच समाजातील असूनदेखील अनेक पद्धतींमध्ये फरक असतो; पण ज्यांची केवळ जातच नाही तर संस्कृतीदेखील पूर्णत: भिन्न असते अशा लग्नांच्या गोष्टी काही वेगळ्याच असतात. ‘आपल्यातलाच’ जोडीदार हवा, असा दृढनिश्चय केलेला असला तरी ‘परफेक्ट लाइफ पार्टनर’ मिळाला की या निश्चयांचा विसर पडतो. दोन राज्यांच्या संस्कृतींमध्ये पूल बनलेलेल्या अशाच काही रिलेशनशिप्सच्या गोष्टी.
पूनम थोरवे
मी मूळची गुजराती. मी लग्न करून थोरव्यांकडे आले तेव्हा मला सगळ्या मराठी परंपरा नव्याच होत्या. आमच्या लग्नासाठी माझ्या बाबांची परवानगी होती; पण आई सुरुवातीला राजी नव्हती. नंतर आईनेदेखील परवानगी दिली. भाषेचा प्रॉब्लेम मला फारसा आला नाही. मी मराठीतूनच संवाद करते. उलट मी असं म्हणते की, मला लग्नानंतर जास्त स्वातंत्र्य मिळालंय.
मयूरी लाड नंबियार
भिन्न संस्कृती म्हटलं की, लग्न नेमक्या कोणत्या पद्धतीप्रमाणे करायचं हा प्रश्न असतो आणि त्यावरचा उपाय म्हणजे दोन्ही पद्धतीने लग्न लावणं. मी मराठी आहे आणि आता लग्न करून मल्याळी कुटुंबात आलेय. आमचं लग्न मराठी आणि दाक्षिणात्य अशा दोन्ही पद्धतीने एकाच दिवशी झालं. लग्न होण्याआधी आपल्याला खूप गोष्टी अॅडजस्ट कराव्या लागणारेत याची पूर्ण कल्पना होती; कारण गंमत म्हणजे मला मुळात इडली, डोसा एकंदर कुठल्याच दाक्षिणात्य डिशेस लहानपणापासून आवडायच्या नाहीत. माहेरी मसालेदार, चटकदार खायची सवय होती आणि आता सासरी सगळं याउलट आहे. त्यामुळे सुरुवातीला कठीण गेलं. मी हळूहळू मल्याळी भाषा शिकतेय. मराठी सण-उत्सव जाणून घेण्यासाठी सासरचे तेवढेच उत्साही आहेत.
वंदना पुजारी पाटील
मुळात मी साउथ इंडियन. पण साउथ इंडियन असले तरी लहानपणापासून शेजारच्या महाराष्ट्रीय लोकांकडे येणं-जाणं व्हायचं, मित्र-मत्रिणी महाराष्ट्रीय होते, म्हणजे एकूणच महाराष्ट्रीय पद्धतच जास्त आवडायची. पण लग्न जमविताना मात्र योगेश म्हणजे माझ्या पतीच्या घरातून खूप विरोध होता. मग शेवटी लग्न जमवायचं कसं? म्हणून मग मीच आई-बाबांसोबत त्यांच्या घरी जाऊन लग्नाची बोलणी करून आले. खरंतर आमच्यात ती सगळी बोलणी नवरा मुलगा घरी येऊन करतो. पण आमचं थोडं ‘वेगळं’ असल्याने हेही वेगळंच झालं. लग्न लागतानाही दोन्ही पद्धतीने लागत होतं, तेव्हाही दोन भटजींमध्ये लग्न लावण्याच्या पद्धतींवर काही वाद होऊ नयेत हीच प्रार्थना मी करत होते, पण सुदैवाने तसं काही झालं नाही. आणि आता तर मला असं वाटतही नाही की मी साउथ इंडियन आहे.
योगेश खूप सपोर्टव्हि असल्याने सगळं सांभाळून घेण्यात मदत झाली आहे.
सुरुची सजीत
एकाच कॉलेजमध्ये मी सुरुची आघारकर ‘पीजी’ आणि सजीत राधाकृष्णन ‘एमएमएस’चा विद्यार्थी म्हणून शिकत होतो. आमच्या आणि त्यांच्या बॅचचं पहिल्यापासून वाकडंच होतं. पण एक प्रोजेक्ट आम्हाला एकत्र करावं लागलं. त्या वेळी मी आणि सजीत एका ग्रुपमध्ये आलो. ‘मला कोकणस्थच मुलगा हवा’ आणि त्याला ‘मल्याळीच मुलगी हवी’ या मतांशी आम्ही ठाम होतो. त्यातही मी बडबडी आणि तो अतिशय शांत. त्यामुळे आम्ही एकमेकांच्या प्रेमात वगरे पडण्याची शक्यता जरा कमीच होती. पण या प्रोजेक्टच्या निमित्ताने आमचं बोलणं सुरू झालं आणि एकदा सजीतने माझ्या वाढदिवसाच्या दिवशी अंगठी, मल्याळी साडी आणि ‘१० दिवसांत मल्याळी शिकवणारं’ पुस्तक भेट देऊन मला प्रपोज केलं. ‘इंटरकास्ट – इंटरस्टेट मॅरेज’ला त्याचे बाबा ‘हो’ म्हणतील की नाही याबाबत जरा धाकधूक होती. पण अडचण आली नाही. उलट ‘लग्न कोणाच्या पद्धतीने करायचं’ यावर दोन्ही ‘आई-बाबा’ एकमेकांना ‘तुमच्या पद्धतीनेच करू’ असा आग्रह करत होते. फायनली दोन्ही पद्धतींने आम्ही लग्न केलं. त्यामुळे दुप्पट धमाल!
सध्या नोकरीच्या निमित्ताने सजीत केरळला असतो, मी पुण्यात. त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त वेळा मीच माझ्या सासू-सासऱ्यांना ठाण्यात येऊन भेटून जाते. सासरच्या मंडळींना ‘सुरुची’ म्हणता येत नाही. ते मला ‘सुरजी’ म्हणतात. तेव्हा सजीत मला चिडवतो की ‘बघ माझे आई-बाबा तुझ्या नावापुढे ‘जी’ लावून तुला किती आदर देतात’. तसंच एकदा ‘एवडे’ म्हणून मला त्यांनी हाक मारली. मला वाईट वाटलं. असं आणखी एकदा झाल्यावर मी सजीतला म्हटलं, ‘ते मला वेडी का म्हणतायेत?’ तो जोरजोरात हसू लागला आणि म्हणाला, ‘अगं वेडे, ‘एवडे’ म्हणजे ‘कुठे आहेस?’ अशा भाषेच्या, जेवणाच्या पद्धतींमधल्या फरकामुळे गमतीजमती नेहमीच घडत असतात. पण सासरी माझे पुरेपूर लाड होत असतात!
पद्मजा ढोलकिया
माझी मातृभाषा तेलगू आहे. लग्न करून मी गुजराती कुटुंबामध्ये आले. गुजराती मुलासोबत लग्न करण्यासाठी माझ्या घरच्यांचा खूप विरोध होता. जवळपास दहा महिने आम्ही माझ्या घरच्यांकडून लग्नाची परवानगी मिळवण्यासाठी संघर्ष केला. सुरुवातीला मला घरच्या कोणाकडूनच सपोर्ट नव्हता; पण नंतर सगळे तयार झाले. आमचं लग्न पारंपरिक तेलगू पद्धतीनं झालं. सासरी आल्यावर गुजराती शिकण्यासाठी एक वर्ष लागलं. त्यामुळे अगदी नवीन असताना मला सासरच्यांशी गुजरातीमध्ये संवाद करता येत नसे. कालांतराने गुजराती सण, परंपरा यांची ओळख झाली. एकदा एका सणाला गुजराती परंपरेप्रमाणे मी स्वत: सगळं केलं आणि ते पाहून माझ्या सासूबाई खूश झाल्या. तेलगू सण-उत्सव साजरे करायलाही सासरची मंडळी प्रोत्साहन देतात.
मधुलिका नाईक
‘मी मारवाडी आणि माझे पती मराठी. सुरुवातीला माझ्या घरातले आमच्या लग्नासाठी तयार नव्हते; पण नंतर माझ्या आई-बाबांनी लग्नाला परवानगी दिली. लग्न तर झालं, पण नंतर सगळ्यात मोठा प्रश्न खाण्यापिण्याच्या आणि भाषेच्या संदर्भातील होता. मी पंजाबमध्ये राहिल्यामुळे मला मराठी संस्कृती पूर्णत: नवीन होती. सासरी स्वयंपाकात नारळ लागायचा, नॉनव्हेज असायचं, भाताचं प्रमाण जास्त होतं आणि माझा यापूर्वी नॉनव्हेजशी कधी संबंधही आला नव्हता. चपात्यांची मला जास्त सवय होती. सुरुवातीला अजिबात काही खावंसं वाटायचं नाही, पण हळूहळू बदल झाला. आता मी मराठीदेखील उत्तम बोलू शकते. दोन्ही संस्कृतीतील सण-उत्सव आम्ही साजरे करतो.