|| मितेश जोशी
शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे, असा सल्ला अनेक योगाभ्यासक देतात. रोग निवारणाच्या या पद्धतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे. संयुक्त राष्ट्राने दिलेल्या मान्यतेनुसार आजचा २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून १७५ देशांमध्ये साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने तरुणाई या क्षेत्रात किती रमते आहे. किती जणांच्या आयुष्यात हा योगायोग करिअर म्हणून जुळून आलाय याचा व्हिवाने घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट ..
२१ जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. भारतातील योग परंपरा प्रचंड जुनी आहे, असे मानले जाते. आपापले शिक्षण-व्यवसायात उच्च स्थानी असूनही एकाक्षणी योगाकडे वळलेले आणि त्यातच करिअर साध्य करणारे असे अनेक तरुण सध्या आजूबाजूला दिसत आहेत.
डोंबिवलीतला मकरंद मोदे हा तरुण. मकरंद हा पेशाने मॅकेनिकल इंजिनिअर. पुण्यात एका जर्मन कंपनीत सेल्स इंजिनियर या पदावर उत्तम पगाराची नोकरी सोडून तो योग मार्गावर आला. त्याची सुरुवात झाली त्याच्या आईमुळे. त्याचा मित्र हा इशा फाऊंडेशनचा विद्यार्थी होता. त्याच्या आग्रहामुळे मकरंदने सर्वप्रथम आईला या फाउंडेशनच्या एका क्लासला पाठवलं. पुढे आईत सकारात्मक बदल दिसल्यानंतर त्यानेही हा कोर्स करायचा निर्णय घेतला. त्याने ७ दिवसांचा इनर इंजिनिअर हा कोर्स पुण्यात नोकरी सांभाळून केला. नोकरी संभाळून सकाळ-संध्याकाळ त्याची प्रॅक्टिस करणारा मकरंद त्यातच रमला. त्याला इशा फाउंडेशनच्या ‘हठयोग टीचर ट्रेनिंग कोर्स’बद्दल माहिती मिळाली. सखोल अभ्यास करून त्याने या कोर्ससाठी आश्रमात जायचा निर्णय घेतला. अथक मेहनत, अभ्यास आणि साधनेच्या बळावर मकरंद हा वयाच्या तिसाव्या वर्षी भारतातील प्राचीन आणि कठीण साधनेचा म्हणजेच हठयोगचा शिक्षक बनला. मकरंद त्याच्या अनुभवाविषयी सांगतो, ‘योग म्हणजे केवळ आसन आणि ध्यान नव्हे. यातून मिळणारी एनर्जी ही सतत आपल्याबरोबर असते. तुम्ही जिम आणि योगाची सांगड घाला. दिवसातला दीड तास तुम्ही काढा. ४५ मिनिटं तुम्ही जिमला द्या, तर ४५ मिनिटं तुम्ही योगला द्या. जिम तुम्हाला शारीरिकदृष्टय़ा फिट ठेवतं. तर योग तुम्हाला मानसिक व भावनिकदृष्टय़ा फिट ठेवतं’. मकरंद सध्या इशा फाउंडेशनच्या अंतर्गत विविध कोर्स घेतो. ज्यामध्ये भारताबरोबरच इंडियन कोस्टल गार्ड्स, फिलिपिन्स व इंडोनेशिया येथेही त्याने हठयोगचे कोर्स घेतले आहेत. यंदाचा योग दिन तो अंदमानला एयरफोर्सबरोबर साजरा करणार आहे. ‘योगवाणी’ या नावाने मकरंदने युटय़ूब चॅनेल सुरू केलं असून त्या माध्यमातून तो विविध अंगांनी योगचा प्रसार करत असतो.
आपण बऱ्याचदा पाहतो योगासनांनी मनुष्याचे अनेक ताप विकार दूर होतात. या क्षेत्रामध्ये अनेक तरुण योगथेरपिस्टसुद्धा आहेत. त्यातीलच एक हर्षद नेरे हा तरुण. हर्षद हा मूळचा स्पोर्ट्समधला. अजिंक्य रहाणे वर्गमित्र असल्याने त्याच्यासोबत अनेकदा मॅच खेळण्याचा योग त्याच्या आयुष्यात आला आहे. हर्षद क्रिकेटमुळेच योगाकडे वळला. त्याच्या कोचना पाठीच दुखणं सुरू झालं. त्यांनी योगाचा आधार घेत हे दुखणं कमी केलं. त्यामुळे गुरूच्या पावलावर पाऊल टाकत शिष्याने म्हणजेच हर्षनेही योग शिक्षक होण्याचा ध्यास घेतला. मुलुंडच्या डॉ. समीर महाजनांनी त्याला ‘योग थेरपिस्ट’ या क्षेत्राशी ओळख करून दिली. फिजिओथेरपी जे काम करते तेच योगसुद्धा करते हे लक्षात आल्यावर तो योग थेरपिस्ट म्हणून काम करू लागला. आतापर्यंत त्याचे हजारो पेशंट ठणठणीत झाले आहेत. एक अनुभव सांगताना हर्षद सांगतो, ‘एका काकांना अर्धागवायूचा तीव्र झटका आला होता. तीन दिवसांनी त्यांच्या नातेवाईकांनी माझ्याशी संपर्क साधला. मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांच्यावर थेरपी सुरू केली. अगदी हलके व त्यांना सहन होतील असे काही व्यायाम मी त्यांना दिले. त्यांच्या डाव्या बाजूला झटका आला होता. दोन दिवसांनी त्याच डाव्या हाताने त्या काकांनी डॉक्टरांशी हस्तांदोलन केलं. तेव्हा त्या डॉक्टरांनी माझा नंबर घेतला. कोणी अर्धागवायूचा रुग्ण त्यांच्याजवळ आला तर ते मला बोलवून घेतात’. हर्षदने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड रचले आहेत. सलग १५ मिनिटं त्याने बर्फाच्या लादीवर योगासने केली आहेत. योग स्पर्धेत महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकावर आणण्यात हर्षदचा मोठा वाटा आहे. त्याला आपलं संपूर्ण आयुष्य योग प्रसारासाठी वेचायचं आहे.
योगाकडे अनेक तरुण मुलं आज वळत आहेत. मानसिक शांती, मानसिक आरोग्य वाढवण्यासाठी योगाची मदत घेत आहेत. मेहेक कपूर ही आर्हाट योगच्या माध्यमातून शारीरिक-मानसिक आजार दूर करण्याचे काम करते आहे. आर्महाट योग म्हणजे राज योग, ज्ञान योग, कर्म योग, अष्टांग योग, कुंडलिनी योग, भक्ती योग, क्रिया योग आणि हठयोगाचं पूर्णपणे मिश्रण आहे. मेहेकचे कुटुंबीय गोळ्या औषधांच्या व्यतिरिक्त व्याधी दूर होणारं माध्यम शोधत होते. कारण तिच्या आईला काही शारीरिक व्याधी झाल्या होत्या. तेव्हा तिच्या वडिलांना ‘योग प्राण विद्या’ या संस्थेची माहिती मिळाली. हिलींग व योग साधनेमुळे मेहेकच्या आईत दिवसागणिक फरक पडू लागला होता. कुतूहल म्हणून तिने हिलींगचे आणि आर्महाट योगचे क्लासेस अटेंड केले. ज्यात तिच्या वागण्याबोलण्यात प्रचंड फरक पडल्याचं तिला स्वत:ला जाणवलं. न्यूट्रिशियन पदवीधर असलेल्या मेहेक आर्महाट योगकडे आकर्षित झाली. एक वर्ष तिने योग प्राण विद्याच्या बेंगलोर आश्रमात जाऊ न सराव व साधनासुद्धा केली. त्यानंतर तिने न्यूट्रिशियनला रामराम ठोकून पूर्णवेळ हीलिंग व आर्महाटयोग साधनेत घालवायचं ठरवलं. मेहेक सांगते, ‘माझ्या आईला होणाऱ्या त्रासात फरक पडल्याने आमच्या कुटुंबाचा या शास्त्रावर विश्वास वाढला. त्यामुळे पदवीधर व नोकरी असतानासुद्धा मी माझं करिअर बदलताना मला घरातून कोणताही त्रास झाला नाही. आज अनेक नामांकित कंपनी, शाळा, कॉलेज आमच्याकडे मार्गदर्शनासाठी, समुपदेशनासाठी, हिलिंगसाठी येतात. मला एक गोष्ट तरुणाईत प्रकर्षांने जाणवते ती म्हणजे मुलं एखाद्या समस्येला स्वत:च आंजारून गोंजारून मोठी करतात. त्यांना समुपदेशन करून योग्य मार्गावर आणण्यासाठी सध्या मी धडपड करते आहे’.
पुण्यातील भालचंद्र ढेकाणे हा तरुण खरंतर इतिहासप्रेमी. पण त्याचं इतिहासप्रेम हळूहळू कमी होत योगसाधनेकडे वाढलं. इतिहास व तत्त्वज्ञानात एम.ए. केलेल्भालचंद्रने पुणे विद्यापीठात शिकत असतानाच पतंजलीच्या अंतर्गत काही योग शिबिरे अटेंड केली. तिथे त्याला याची गोडी लागली. त्याने लगेचच आपला मोर्चा योगशास्त्रात एम. ए. करण्यासाठी वळवला. अष्टांग योगचा गाढा अभ्यास केल्यावर त्याने ‘कैवल्यधाम’ लोणावळा येथून योग या विषयात डिप्लोमा व योग शिक्षकाचा कोर्स पूर्ण केला. पुढे त्याला पुणे विद्यापीठातच योग शिक्षकाची संधी मिळाली. अभ्यास व शिक्षक अशी दोन्ही भूमिका सध्या तो बजावतो आहे. त्याची स्वत:ची योगशाळा असून तो पुण्यात विविध ठिकाणी शिबिरं भरवतो. भालचंद्र त्याच्या अनुभवांविषयी सांगतो, युद्धातील काही प्रसंगामुळे कंबरेच्या खालून किंवा मानेच्या खालून हालचाल करू न शकणाऱ्या सैनिकांसाठी मी सध्या योगासनं करून घेतो आहे. म्हणजे एक प्रकारची योगथेरपीच त्यांच्यावर सुरू आहे. व्हीलचेअर हाताने चालवून त्यांचे पूर्वी हात सतत दुखायचे, पण आसनांमुळे त्यांची ही तक्रार व अनेक छोटय़ामोठय़ा तक्रारी दूर करण्यात यशस्वी झालो आहे. अंध मुलांसाठी योग शिबिरं घेणारा भालचंद्र सध्या पी.एच.डीच्या संशोधनाची खटपट करतो आहे. अंध किंवा शारीरिक दुर्बळ लोक काही वस्तूंचा आधार घेत योगासन कसे करू शकतील व त्याच्यातून त्यांना कसा फायदा मिळेल, यासाठी त्याचा अभ्यास सुरू आहे.
मकरंद, हर्षद, मेहेक आणि भालचंद्र हे चौघेही पूर्णवेळ या क्षेत्रात स्थिरावले आहेत मात्र ऐश्वर्या पगारेसारखी तरुणी केवळ छंद म्हणून या योगप्रसाारासाठी कार्यरत आहे. सेंट झेविअर्स या महाविद्यालयातून लाईफ सायन्समध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलेल्या ऐश्वर्याने कैवल्यधाम येथून योगशिक्षकाची पदवी मिळवली आहे. ऐश्वर्या सांगते, लहानपणापासूनच आईकडून योगाविषयी ऐकलेली माहिती आणि महत्त्व यातून कुतूहल म्हणून मी अकरावीत योगशिबिरात भरती होण्याचा विचार केला. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर मी शिक्षक कोर्स पूर्ण केला. योगमुळे मला प्रत्येक स्थितीकडे पाहण्याची योग्य दिशा मिळाली. योगाबरोबरच उत्तम सरोद वाजवणारी आणि संगीताचा अभ्यास करणारी ऐश्वर्या प्रत्येक तरुणाला योगशिक्षणाचे धडे गिरवण्याचा सल्ला देते. योगामुळे तुमच्या उठण्या-बसण्यात, वागण्या-बोलण्यात, चालण्यात, खाण्यापिण्यात कसा बदल होतो ते बघाच.. असं सांगणारी ऐश्वर्या लवकरच इंग्लंडला पदव्युत्तर शिक्षणासाठी जाणार असून तिथेही योगाचा प्रसार व साधना सुरूच ठेवणार असल्याचं ती सांगते.
गिरगावातील विराज आचार्य या तरुणाने तबल्यात अलंकार पदवी मिळवली आहे. गेली ३० वर्षे त्याचे वडील योगाभ्यासक व शिक्षक असल्याने त्याने या क्षेत्राची वाट धरली. कैवल्यधाममधून योग शिक्षकाची पदवी मिळवलेल्या विराजने तबला व योगाची सांगड कशी घातली याविषयी सांगताना विराज म्हणतो, योग आणि तबल्याचा रियाज सारखाच आहे. शरीराची व मनाची स्वच्छता ठेवणं हा त्यामागचा मुख्य उद्देश. सकाळी लवकर उठून योगसाधना करण्याला मी तबल्याच्या रियाजाइतकंच महत्त्व देतो, असं तो म्हणतो. नियमित योगसाधना व्याधीमुक्तीसाठीही उपयोगी पडू शकते, असं तो म्हणतो. सर्वच आजार सायको-सोमॅटिक म्हणजेच शारीरिक-मानसिक असतात. प्रत्येक आजारासोबत प्रचंड मानसिक आणि वैचारिक उलाढाल होत असते. ही उलाढाल व्यक्तिसापेक्ष असते. आणि ‘योग’ मार्गाने ही प्रचंड प्रमाणात कमी होऊ शकते, अशी माहिती त्याने दिली.
यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या आठ अंगांनी अलंकृत झालेल्या अष्टांग योगचा अभ्यास करणारा भालचंद्र, आर्महाट योगचा प्रसार करणारी मेहेक, हठयोगमध्ये आपलं करिअर करून आनंद मिळवणारा मकरंद, योगथेरपिस्ट हर्षद, केवळ आनंदासाठी योगसाधनेच्या प्रसाराचे कार्य करणारे ऐश्वर्या व विराजसारखे असंख्य तरुण-तरुणी योगसाधनेला पुन्हा एकदा संजीवनी देण्याचं काम करत आहेत.