विनय जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२० जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग यांच्या रूपाने मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस आंतरराष्ट्रीय चंद्र दिन म्हणून ओळखला जातो. आदिम काळात चंद्राकडे कुतूहलाने बघणाऱ्या मानवाने थेट चंद्रावर स्वारी केली. मानवजातीच्या या प्रगतीचा चंद्र जणू साक्षीदार आहे.

दिनांक १४ जुलै २०२३, स्थळ  श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र, दुपारी २:३५ ची वेळ. अवघ्या भारतीयांच्या नजरा खिळल्या होत्या तो क्षण अखेर आला. ५..४..३..२..१.. 0 काऊंट डाऊन संपले, धुराचा लोट उडवत क्षेपणयान मार्क- ककक ने आकाशात झेप घेतली. नियंत्रण कक्षात इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावरील तणाव हळूहळू  निवळत  गेला. आणि चांद्रयान नियोजित कक्षेत पोहोचल्यावर एकच जल्लोष झाला. भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान ३ मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वी पार पडला होता. चंद्राकडे झेपावलेल्या या अजून एका यानाने मानव आणि चंद्र यांच्यातील अनोख्या नात्याची वीण अधिक घट्ट केली.

अगदी आदिम काळापासून चंद्र आपल्या भावविश्वाचा अविभाज्य भाग आहे. खरंतर आपलं अस्तित्व ही चंद्राचीच देणगी आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. सुमारे ५ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा तिला उपग्रह नव्हता. तेव्हा तिच्या अक्षाचा झुकाव आणि परिवलन गती जास्त असल्याने हवामान आणि ऋतुचक्राची परिस्थिती जीवनाला प्रतिकूल होती. पुढे अवकाशातून एक गोल पृथ्वीवर येऊन आदळला. यातून उडालेल्या धुळीने पृथ्वीभोवती फेर धरत आकार घेतला. तो म्हणजे आपला चंद्र. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने ब्रेक लावत पृथ्वीची गती कमी केली. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशावर स्थिर झाला. जीवसृष्टीच्या विकासासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली. सुमारे साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी समुद्रात जीवनाचा आरंभ झाला. चंद्र नसता तर कदाचित आजही पृथ्वीवर फक्त जलचरच आढळले असते. चंद्राच्या भरती – ओहोटी चक्रामुळे काही जलचर जमिनीवर येत अनुकूलन साधत उभयचर झाले. उत्क्रांतीच्या ओघात पुढे सरीसृप आणि मग माणसाची उत्क्रांती झाली.

पण चंद्राची ही भूमिका फक्त मानवजातीच्या जन्मापुरतीच मर्यादित नाही. गणना, मोजमाप, प्रतिभा अशा बौद्धिक विकासासाठी एखाद्या उत्प्रेरकाची गरज असते. चंद्राच्या रोज बदलत जाणाऱ्या आकारासारखी दुसरी  ठळक आणि नियमित घटना काय असणार? आपल्या आदिम पूर्वजांच्या बौद्धिक, सामाजिक  विकासासाठी चंद्राने प्रेरणा दिली. चंद्राच्या कला पाहून मानवाने कालमापनाला सुरुवात केली. त्याच्या टिपूर चांदण्यांनी मानवी प्रतिभेला फुलवले. मानवाच्या सांस्कृतिक, धार्मिक विकासातदेखील चंद्राचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. सणवार, उत्सव हे चंद्राच्या आधारे साजरे केले जात असत. चंद्राचे इतके उपकार असल्यावर त्याला सर्व संस्कृतींनी देव मानले यात नवल ते काय? प्रत्येक संस्कृतीत सोम(भारत), इसीस(इजिप्त), आर्तेमीस (ग्रीक), डायना, जुनो (रोम), ए सुर्दू (खल्डीयन) अशा चंद्रदेवता आहेत. चंद्राला देवत्व बहाल करून जणू चंद्राच्या संशोधनाला सुरुवात झाली.

चंद्रावरील डाग म्हणजे पर्वत असावेत असा अंदाज डेमोक्रॅटिस (इसपू  ४ शतक) यांनी  लावला. हिप्पर्कस यांनी  (इसपू १५०) चंद्राचा आकार मोजला. आर्यभट्ट (इस ५०० ) यांनी चंद्र – पृथ्वी अंतर गणिताने काढले. गॅलेलियो गॅलिली (१६ शतक) यांनी  पहिल्यांदा दुर्बिणीतून चंद्राचे निरीक्षण केले. चंद्राच्या पृष्ठभागावरील विवरे, पर्वत यांसारखी महत्त्वपूर्ण निरीक्षणे त्यांनी नोंदवली. १७व्या शतकात जोहान्स हेव्हेलियस आणि जियोव्हानी रिकिओली यांनी चंद्राचे विस्तृत नकाशे बनवून चंद्राच्या अनेक भौगोलिक वैशिष्टय़ांना नावे दिली, ही  नावे आजही वापरली जातात.

अनेक लेखकांनी आपल्या लिखाणातून चंद्राची सफर घडवून आणली. योहान केप्लर यांनी मानवाचा चंद्रापर्यंत प्रवास, तिथून पृथ्वीचे वर्णन यावर पुस्तक लिहिले. फ्रेंच लेखक जुल्स व्हर्नने मोठय़ा तोफेतून अंतराळवीरांना चंद्रावर  पाठवता येईल अशी कल्पना करून ‘टू द मून अ‍ॅण्ड बॅक’ ही कादंबरी लिहिली. चंद्रापर्यंत जाण्यासाठी तोफेत किती दारू लागेल, तिचा आकार किती असावा याचे शास्त्रशुद्ध वर्णन यात आहे. त्यातील काही वैज्ञानिक तपशील आश्चर्यकारकरीत्या अचूक ठरल्याचे नंतर लक्षात आले.

आदिम काळात चंद्राच्या प्रेरणेने माणसाच्या आकाश निरीक्षणातून खगोलशास्त्राचा विकास झाला, पण दुसऱ्या महायुद्धांनंतर थेट चंद्रावरच स्वारी करायच्या महत्त्वाकांक्षेला प्रेरणा मिळाली शीतयुद्धातून.. यात सुरुवातीला सोव्हिएत रशियाने बाजी मारली. १९५९ मध्ये रशियाचे लुना-१ चंद्राजवळून  उड्डाण करणारे पहिले अंतराळयान ठरले. पाठोपाठ लुना -२ द्वारे थेट चंद्रावर प्रोब आदळून रशिया चंद्रावर पोहोचणारा पहिला देश ठरला. लुना-३ ने चंद्राची प्रदक्षिणा करत त्याची आतापर्यंत कधी न पाहिलेली दुसरी बाजू जगाला दाखवली. पुढे  लुना-९ यान  चंद्रावर अलगद उतरले. दरम्यान रशियाच्या या घोडदौडीमुळे विचलित होऊन अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनेडी यांनी  १९७० साल संपण्याच्या आत अमेरिकन माणूस चंद्रावर उतरवण्याची घोषणा केली. आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी अमेरिकेने ‘अपोलो’ मोहीम राबवली.

एकच अंतराळयान चंद्रावर उतरवून पुन्हा परत आणणे अवघड होते. म्हणून नासाने अपोलो यानाचे कमांड मोडय़ूल चंद्राभोवती फिरते ठेवून ल्यूनर मोडय़ुल चंद्रावर उतरवायचे ठरवले. कमांड मोडय़ूलमध्ये तीन अंतराळवीरांना राहण्याची सोय होती. ल्यूनर मोडय़ुलला  चंद्रावर उतरवण्यासाठी आणि पुन्हा मुख्य यानाला जोडण्यासाठी रॉकेट, इंजिन आणि डॉकिंग सुविधा होती. सॅटर्न या शक्तिशाली रॉकेटने अपोलो यानाचे चंद्रापर्यंत उड्डाण शक्य होणार होते. १९६७ मध्ये अपोलो-१ मोहिमेतून अंतराळवीरांचे चंद्रावर जाण्याचे नियोजन असताना दुर्दैवी घटना घडली. प्री-लाँच चाचणी दरम्यान केबिनला आग लागल्याने तीन अंतराळवीरांचा होरपळून मृत्यू झाला, पण नासाने अपोलो प्रकल्प नेटाने चालू ठेवत पुढील  वर्षांत अपोलो-४,५,६ या मानवरहित मोहिमांतून यशस्वी चाचणी घेतल्या. १९६८  मध्ये अपोलो-७ तीन अंतराळवीरांना घेऊन उडाले आणि ११ दिवस पृथ्वी प्रदक्षिणा करत सुखरूप परत आले. अपोलो-८, ९, १० मोहिमांतून अंतराळवीर चंद्राभोवती फेरी मारून आले. या रंगीत तालमींतून चंद्रावर मानव उतरवण्याची क्षमता सिद्ध झाली होती. आणि अपोलो-११ मोहीम नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज होती.

दिनांक १६ जुलै १९६९ , स्थळ -अमेरिकेतील केनेडी स्पेस सेंटर, वेळ सकाळी ८:०३. ५..४..३..२..१. ० काऊंट डाऊन संपले. सॅटर्न -५ रॉकेट अपोलो ११ अवकाशयानाला घेऊन झेपावले.  या यानाचे कॅप्टन होते नील आर्मस्ट्राँग. कोलंबिया या कमांड मोडय़ुलचे इन्चार्ज मायकेल कॉलिन्स होते आणि ‘ईगल’ ल्युनर मोडय़ुलची जबाबदारी एडविन यूजीन आल्ड्रिन यांच्यावर होती. पृथ्वीच्या कक्षेतील यानाचा चंद्रप्रवास सुरू करण्यासाठी उड्डाणानंतर काही तासांनी रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्याचे इंजिन प्रज्वलित झाले. तीन दिवसांत ३,२०,००० किमी अंतर कापून यान चंद्राजवळ पोहचले. अपोलो-११ यान चंद्राभोवती १०० किमीच्या उंचीवर फिरू लागले. २० जुलैला  नील  आर्मस्ट्राँग आणि  एडविन आल्ड्रिन यांना घेऊन ‘ईगल’ हे  ल्युनर मोडय़ुल कमांड मोडय़ूलपासून वेगळे झाले. चंद्रावरील ‘सी ऑफ ट्रांक्विलिटी’ या पूर्वनियोजित स्थानावर ईगल अलगद उतरले. यानंतर सुमारे सहा तासांनंतर तो ऐतिहासिक क्षण आला. ईगलचे शटर उघडले गेले, शिडीच्या नऊ पायऱ्या उतरत नील आर्मस्ट्राँग बाहेर आले. आणि पृथ्वीवासीयांचे पहिले पाऊल  चंद्रावर पडले ! यानंतर  एडविन आल्ड्रिनदेखील चंद्रावर उतरले. दोघांनी चंद्रावर अमेरिकेचा झेंडा फडकवला. निरनिराळी शास्त्रीय  उपकरणे तिथे ठेवली. सुमारे अडीच तास चंद्रावर घालवून ते ईगलमध्ये बसले. ईगल चांद्रभूमीवरून उड्डाण करून कंट्रोल मोडय़ूलला जोडले गेले. आणि पृथ्वीकडे परतीचा  प्रवास सुरू झाला. तीन दिवसांनी २४ जुलैला पॅसिफिक महासागरात सुखरूप उतरत अपोलो ११ मोहिमेची यशस्वी सांगता झाली. चंद्रावर उतरताना  नील आर्मस्ट्राँग यांनी म्हटलेले  ‘माणसाचे हे छोटे पाऊल  मानव जातीची प्रचंड झेप आहे’ हे उद्गार अजरामर ठरले. 

अपोलो ११ च्या यशानंतर अवघ्या चार महिन्यांत अपोलो १२ मोहिमेतून अजून तीन अंतराळवीर चंद्रावर जाऊन सुखरूप परत आले. पुढच्या अपोलो १३ मोहिमेला मात्र अपयशाचा सामना करावा लागला. ऑक्सिजन टाकीच्या स्फोटामुळे अंतराळवीरांना चंद्रावरील लँिडग रद्द करून कसाबसा जीव वाचवत पृथ्वीवर परत यावे लागले. यानंतरच्या अपोलो-१४  (१९७१), १५  (१९७१ ), १६ (१९७२), आणि १७ (१९७२ ) मोहिमा यशस्वी ठरल्या. अपोलो मोहिमेतून  चंद्रावर विविध ठिकाणी १२ अंतराळवीर उतरवण्यात नासाला यश आले. यातून तिथली  तब्बल ३६५ किलो वजनाची दगड – माती पृथ्वीवर आणली गेली.

अपोलो मिशनने तांत्रिक क्षमता सिद्ध करून अमेरिकेला अंतराळ क्षेत्रात सुपर पॉवर म्हणून प्रस्थापित केले, पण याची मोठी किंमत मात्र चुकवावी लागली. अपोलो मिशनसाठी २५ अब्ज डॉलरहून अधिक खर्च आला. चंद्रावर माणूस पाठवण्याच्या मोहिमांचा खर्च आणि धोके लक्षात घेता चांद्रमोहिमा आवरत्या घेऊन  इतर ग्रहांच्या मोहिमा आणि अंतराळ स्थानकांची निर्मिती यांना प्राधान्य देण्यात आले. १७ जुलै १९७५ ला रशियाचे सोयुझ १९ आणि अमेरिकेचे अपोलो -१८ अंतराळात एकमेकांना जोडले जाऊन स्पेस वॉर संपले.

चंद्रावरच्या मानवी मोहिमा थांबल्या असल्या तरी इतर चांद्रमोहिमा मात्र सुरू राहिल्या आणि यात इतर देश सहभागी झाले. १९९० मध्ये हितेन अंतराळयानाला  चंद्राभोवती फिरत ठेवून चंद्राला भेट देणारा जपान तिसरा देश बनला. यानंतर युरोप स्पेस एजन्सीचे मिशन स्टार्ट, जपानचे सेलेनी कागुया ,चीनचे चँग -ए  अशा अनेक चांद्रमोहिमा यशस्वी झाल्या. आतापर्यंत एकूण ११ देशांच्या चांद्रमोहिमा यशस्वी ठरल्या आहेत. यातील ९ देशांना चंद्रावर प्रोब आदळवण्यात तर अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांना चंद्रावर लॅन्डर आणि रोव्हर उतरवण्यात यश मिळाले आहे.

२० जुलैला चंद्रावर मानवी पाऊल पडण्याला आता अर्धशतक उलटून गेले आहे. या पन्नास वर्षांत तंत्रज्ञान बरेच पुढे गेले आहे. मंगळ आणि इतर ग्रहांच्या मोहिमांसाठी  चंद्रांचा उपयोग थांबा म्हणून करता येऊ शकतो असे लक्षात आले आणि आर्टेमिस मोहिमेतून पुन्हा एकदा नासा मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या तयारीत आहे. चांद्रयान-३ यशस्वी होऊन भारत चंद्रावर लॅन्डर उतरवणारा चौथा देश बनण्याच्या बेतात आहे. आयएसएस सारखे चंद्राच्या कक्षेत ‘लुनार गेटवे’ अंतराळ स्थानक फिरत ठेवण्याची योजना आहे. चंद्रावर मानवी तळ उभारण्याची देखील चाचपणी सुरू आहे. नव्या सहस्रकातील या  चांद्रमोहिमांची सविस्तर माहिती घेणे अगत्याचे ठरते.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International moon day 2023 india chandrayaan 3 mission astronauts neil armstrong zws
Show comments