जपानमध्ये टीनएजर्ससाठी ‘इंटरनेट फास्टिंग कँप्स’ आयोजित करण्यात येताहेत.  इंटरनेट उपासाची ही कल्पना कशी वाटते, ते मुंबईतल्या तरुणाईलाच ‘विवा’नं विचारलं.
सारं जग सध्या एका जाळ्यात अडकलं आहे, ते म्हणजे इंटरनेटचं मायाजाल. पूर्वी फक्त कॉम्प्युटरपुरतंच मर्यादित असलेलं इंटरनेट कनेक्शन सध्याची तरुण पिढी खिशात घेऊन फिरतेय. २४ बाय ७ मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर ‘पडिक’ असणाऱ्या तरुण पिढीचं इंटरनेटशिवाय पान हलत नाही, हे खरंय. अभ्यासाच्या नोट्ससुद्धा हल्ली व्हॉट्सअ‍ॅपवरून शेअर होतात. जगभरातल्या तरुणाईची सध्या ही अशीच अवस्था आहे. या मायाजालातून बाहेर येऊन तरुणाईनं त्याशिवाय जगणं शिकायला हवं, यासाठी जपानच्या शिक्षण मंत्रालयानं ‘इंटरनेटचा उपास’हा उपक्रम हाती घेतल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली. म्हणजे जपानी सरकार काही दिवस मुलांसाठी इंटरनेट बंद करणार म्हणे.
‘मॅककफे ट्विन्स अँन्ड टेक्नॉलॉजी’ने इंटरनेट वापरणाऱ्या भारतीयांचं सर्वेक्षण केलं. त्यांच्या या २०१३ च्या अहवालात असं म्हटलंय की, भारतात आता सगळ्यात जास्त इंटरनेटचा वापर मोबाइलवरून होतो. त्यांच्या आकडेवारीनुसार भारतात सध्या लॅपटॉप, मोबाइल आणि डेस्कटॉप या सगळ्या उपकरणांवरून इंटरनेट अ‍ॅक्सेस केलं जातं. यामध्ये ६० टक्के लोक दररोज १ ते ४ तास डेस्कटॉपवर इंटरनेट सर्फ करण्यात घालवतात. ४० टक्के टॅबलेटवरून अ‍ॅक्सेस करतात आणि ६८ टक्के मोबाइलचा वापर करतात. मोबाइलवर आणि अन्य उपकरणांवरून इंटरनेटवर साधारण ४ तासांपेक्षा अधिक वेळ घालवला जातो. या सर्व निरीक्षणातून असं दिसून आलंय की इंटरनेट यूजर्समध्ये तरुण पिढी मोठय़ा प्रमाणावर आहे आणि तिच्यावर इंटरनेटचा मोठा प्रभाव आहे.
खरंच आजची पिढी इंटरनेटशिवाय जगू शकेल का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

सायली महाजन ‘मी मोबाईलशी सगळ्यात जास्त अ‍ॅडिक्टेड आहे. वेगवेगळे गेम्स, फेसबुक आणि व्हॉट्सअप हे सगळं मी मोबाइलच्या इंटरनेटवरूनच वापरते. मोबाइलमुळे जवळपास पूर्णवेळ मी ऑनलाइन असते. मला नेहमी गुगल माझ्या स्क्रीनवर लागतं. अगदी स्पेिलग तपासण्यापासून वेगवेगळ्या बातम्या कळण्यापर्यंत. माझा अभ्यासासाठीही मी इंटरनेटचा वापर करते. दर ५ मिनिटांनी फेसबुकवर काय चालू आहे याचे अपडेट्स घेतल्याशिवाय मला चन पडत नाही आणि दिवसभर कोणी ना कोणी मला बोलायला लागतं. त्यामुळे मी व्हॉट्सअ‍ॅप बंद ठेवूच शकत नाही. परीक्षेच्या वेळेसदेखील इंटरनेटमुळे खूपच मदत होते. त्यामुळे एक दिवस काय एक क्षणही नेटविना राहणं मला अशक्य वाटतं.

अमोघ देशपांडे ‘मी बऱ्याच प्रमाणात इंटरनेटसाठी व्यसनी आहे. ऑफिसच्या कामांसाठी तर नेटशिवाय पर्याय नसतोच; पण त्यापलीकडे जाऊन ऑफिसच्या कामांचं प्रेशर हलकं करण्यासाठी नेटचा वापर मी करतो. मग त्यासाठी नेटवरचे वेगवेगळे व्हिडीओ, गाणी, चॅटिंग यांचा वापर आपसूकच होतो. पण एखाद्दिवस नेट नसेल तरी मला फारसा फरक पडत नाही. कारण तेव्हा मी मित्रांसोबत, पुस्तक वाचून वेळ घालवतो, व्यायाम करतो, सोशल वर्क करतो. त्यामुळे नेटशिवाय मी जगूच शकत नाही असं नाही; पण जास्त दिवस नेटपासून दूर राहणं ही कल्पनाही कठीण आहे. नेट नसेल तर प्रोफेशनल लाइफ डिस्टर्ब व्हायला जास्त वेळ लागत नाही.’

भूमिका पाटील माझ्यासाठी इंटरनेट सतत वापरणं हे आता गरजेचंच झालं आहे; कारण एखाद्या बातमीपासून ते अगदी साध्या टाइमपास गोष्टींसाठी मला ‘गुगल’ करायची सवय आहे. आता आमची परीक्षा सुरू आहे. काही विषयांच्या कोणत्याच नोट्स आम्हाला उपलब्ध नाहीत. अशा वेळेस सतत नेटचा उपयोग होतो आणि आता तर मोबाइलमध्ये नेटची सोय असल्यामुळे हवं तेव्हा नेट वापरणं अधिक सोपं झालंय. व्हॉटसअ‍ॅपवर असलेल्या फ्रेंड्सच्या ग्रुपमुळे अभ्यासातलंही शेअिरग वाढतं. एक दिवस जरी नेट नसेल तरी खूप अपूर्ण वाटतं.

पूजा वैद्य मला सतत नेट वापरणं आवडत नाही. माझ्या मोबाइलमध्येही नेट कनेक्शन आहे; पण मला हवं तेव्हाच मी ते ऑन करते. कारण एकदा ते ऑन केलं की मग संपूर्ण वेळ त्यातच जातो. त्यामुळे माझं जेव्हा काही काम असेल तेव्हाच मी नेट वापरते. दिवसातले २ ते ३ तासच मी अधून मधून चॅटिंग करते. अभ्यासाच्या वेळेस तर नेट बंद म्हणजे बंद ठेवण्याकडेच माझा कटाक्ष असतो. नेट काही वेळ नसेल तर फार काही फरक पडतो असं मला वाटत नाही.

अथर्व जोशी माझ्या मोबाइलमध्ये असणारं नेट कनेक्शन काही दिवसांपूर्वीच मी मुद्दामहून बंद केलं. त्यामुळे आता व्हॉट्सअ‍ॅपपासून सगळंच बंद आहे. खरं तर व्हॉट्सअ‍ॅपवर एवढे ग्रुप्स झाले होते की, प्रत्येकाला उत्तरं देत सगळा दिवस निघून जायचा. कंटाळा आला की नेट, वेळ जात नसेल की नेट, सगळ्या गोष्टींसाठी नेट वापरण्यात स्वतला कधी वेळच देता आला नाही आणि त्यामुळे विचार करायलाही वेळ मिळायचा नाही; परंतु आता खूप शांत वाटतंय आणि स्वतला हवा तसा वेळही देता येतो आहे. आठवडय़ातून २ वेळा फेसबुक वापरण्यासाठी किंवा इतर नेटशी संबंधित असलेल्या कामांसाठी मी ऑनलाइन येतो. त्यामुळे नेटशिवाय जगणंही मी एन्जॉय करतोय.

Story img Loader