अडथळे पार करीत वायुवेगानं धावणं आणि विजयी होणं हेच तिच्या आयुष्याचं ध्येय आहे आणि तिच्या या ध्येयावर साऱ्या देशाच्या आशा आता केंद्रित झाल्या आहेत. ‘ती’ – ललिता बाबर. सातारा जिल्ह्य़ातल्या माण तालुक्यातील मोही या खेडेगावात जन्माला आलेली ललिता आता जागतिक स्तरावर पी टी उषाचा वारसा पुढे न्यायला सज्ज झाली आहे. तिच्या नावावर स्टीपलचेस प्रकारातला राष्ट्रीय विक्रम दाखल आहे. मुंबई मॅरेथॉन सलग तीन र्वष जिंकून तिनं हॅट्ट्रिकचा पराक्रम केलाय. पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्टीपलचेस प्रकारात तिच्यावरच साऱ्या देशाच्या आशा केंद्रित झाल्या आहेत. अडथळ्यांची शर्यत जिंकणाऱ्या ललिताचा संघर्ष मैदानाबाहेरही अगदी असाच आहे. तिचा हा संघर्षमय प्रवास तिच्याच तोंडून ऐकायची संधी व्हिवा लाउंजच्या पुढच्या पर्वात मिळणार आहे.
शेतमजूर कुटुंबात जन्म झालेल्या ललिताने जिल्हा स्तरावरील शालेय मैदानी स्पर्धापासून सुरुवात करून आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये ठसा उमटविला. अनेक मॅरेथॉन, अर्धमॅरेथॉन, १० हजार मीटर, ५ हजार मीटर धावणे आदी लांब अंतराच्या शर्यतींमध्ये तिने अव्वल कामगिरी केली. गतवर्षी दक्षिण कोरियात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत स्टीपलचेस या क्रीडा प्रकारात ललिताने कांस्यपदक मिळवलं. तिची क्षमता रेल्वे क्रीडा मंडळाच्या अॅथलेटिक्स संघटकांनी हेरली आणि त्यांनी तिला नोकरीची संधी दिली. तेव्हा कुठे तिला पूरक व्यायामाच्या सुविधा, दर्जेदार शूज, पोषक आहार, फिजीओ आदी गोष्टी बघायला मिळाल्या. या धावपटूचा प्रवास समजून घेत तिच्याशी थेट संवाद साधायची संधी मंगळवारी होणाऱ्या व्हिवा लाउंजच्या निमित्ताने मिळेल.
कधी : मंगळवार, ८ सप्टेंबर
वेळ : सायंकाळी ४.४५
कुठे : स्वा. सावरकर स्मारक सभागृह,
शिवाजी पार्क,
दादर (प)