ख्रिस गेलच्या विक्रमी १७५ धावा आणि इतरही फलंदाज, गोलंदाजांचा आक्रमक खेळ बघता तक्रारीला जागाच नाही. उलट आपणही घरबसल्या क्रिकेटमुळे उत्कंठावर्धक मनोरंजनाचा आस्वाद घेतोय.  
मला अजूनही तो दिवस आठवतो. जेव्हा मुंबईत ठिकठिकाणी मोठमोठय़ा होर्डिगवर नुसती लाल रंगाची मिरची दिसायला लागली. मग त्याच्याखाली काही अक्षरं उमटली. तरीही माझ्या डोक्यात काही म्हणजे काही प्रकाश पडेना- की म्हणजे काय किंवा हय़ामुळे काय होणार आहे. मी किती जणांना विचारलंसुद्धा.. की असं लिहिलंय त्याचा अर्थ काय. नंतर मग बऱ्याच कालावधीनंतर कळलं की, हे एक नवं रेडिओ चॅनल आहे. मला ही कल्पना खूप अद्भुत वाटली होती की, आकाशवाणीला समांतर असं काहीतरी उदयाला येतंय. किंवा येऊ शकतं! तसंच दूरदर्शनच्या पलीकडे एक नवं चॅनल सुरू झाला तेव्हा मला बुचकळ्यात पडायला झालं होतं. नव्या सिनेमांचे ट्रेलर किंवा छायागीत/चित्रहार नसताना गोविंदा, करिश्मा कपूरची गाणी पाहताना खरंच माझा आ वासलेलाच राहात असे.
इंटरनेटचं जाळं सर्वदूर पसरलं दरम्यान. मोबाईल फोन नावाची क्रांती झाली. एसएमएस ही संकल्पना तर मला बराच काळ भुताटकीसारखी वाटायची. मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर टाइप केलेली अक्षरं माझ्या दादा-वहिनीला थेट अमेरिकेत आणि तेही क्षणार्धात मिळायची. म्हणजे मी रोमनमध्ये लिहिलेले शब्द, विरामचिन्हं पत्रात लिहिल्यासारखी. जशीच्या तशी त्यांच्यापर्यंत जाऊन पोचायची. पुढे देवनागरी फॉण्ट आला. आता तर ब्लॅकबेरी, आयफोन, फेसबुक, ट्विटर अशा अगणित शाखा फुटल्या आहेत शोधाच्या. एव्हाना हळूहळू का होईना त्यांची ओळख आपल्याला झाली आहे आणि ती होईपर्यंत नवे प्रयोग आपल्याला चकित करायला टपल्यासारखे तयारच आहेत. आता काय अवकाशात असताना कुठल्याही खंडातून बसल्या जागेवरून घरी फोन करता येतो. शास्त्र, विज्ञान, संशोधन आता कुठल्याही थराला जाऊ शकतील हे म्या पामरानी एकुणात स्वीकारून टाकलं.
पण तरीही आश्चर्य वाटायचं थांबलं नाही. चार एक वर्षांपूर्वी जेव्हा ट्वेण्टी-ट्वेण्टी, आयपीएल, टी ट्वेण्टी असे शब्द कानावर यायला लागले तेव्हा माझ्या क्रिकेटप्रेमी मनानं आधी त्याची फारशी दखल घेतली नाही. कारण तो क्रिकेटर्सना मॉडेल कम् सेलिब्रिटी बनवण्याचा नवा काळ होता. मला वाटलं असेल कुठलीतरी नवी जाहिरात. पण त्या जाहिरातीत फक्त आपल्या देशाचे किंवा ज्या दोन देशांमध्ये लढत होणार आहे ते खेळाडू नव्हते. त्यात स.ग.ळ्या. देशांचे खेळाडू झळकायला लागले. नेहमीसारखा विस्मय वाटून घेईपर्यंत माझ्या डोक्यात जाणारे प्रश्न ‘बाइट’साठी विचारले जायला लागले. ‘‘विच क्रिकेटर यू थिंक इज दी हॉटेस्ट अ‍ॅण्ड सेक्सी इन इंडियन टीम?’’ किंवा ‘‘हू इज द परफेक्ट बॅचलर यू वुड लाइक टू मॅरी अमंगस्ट दी इंडियन क्रिकेट टीम?’’ अरे आपण कशाला असलं स्वप्नरंजन करू तारतम्य नसलेलं? मी चिडून काही जणांना बाणेदारपणे फटकारलंसुद्धा- की ‘‘प्लीज! स्टॉप इट!’’ मी खेळाडूंचा खेळ बघते. सेक्स अपील ही आपल्या खासगी आयुष्यात आपल्या जोडीदाराविषयी वाटणारी गोष्ट आहे. तिला एखाद्या क्रीडापटूशी कसं जोडायचं? असं सार्वजनिक करत या भावनांचा बाजार कसा मांडायचा? किंवा अनेक खेळाडूंची लग्नं झालीएत. तरी त्यांना ‘हॉट’ कसं संबोधायचं? चालू दे की त्यांचा संसार सुखानं. देशासाठी खेळतात ना ते? त्यांचं ग्राऊंडवरचं अपील बघू.
पण अचानक या खेळानं वळण घेतलं आणि क्रिकेट एकदम घाऊक प्रमाणात मंडईतच आलं. काही श्रीमंत, रूपवान शेठजी आणि शेठाण्या या घाऊक खरेदी-विक्रीत सरसावून उतरले आणि एक अविश्वसनीय उलाढाल बघायला मिळाली. त्याचं नाव ट्वेण्टी ट्वेण्टी! त्यात भलतेच संघ बनले. मला खूप दिवस (महिने, वर्ष) पटतच नव्हतं की, सचिन आणि धोनी एकमेकांच्या विरुद्ध कसे काय खेळू शकतात? टीम म्हणून आपण नक्की कुणाला चीअर करायचं? कुणाची बाजू घ्यायची? रांचीचा महेंद्रसिंग धोनी भारताचा कर्णधार ना. मग तो चेन्नईचा कॅप्टन का आणि कसा झाला? सचिन तेंडुलकर मुंबईच्या टीममध्ये आहे म्हणून मुंबईची बाजू घेईपर्यंत- पुण्याचा संघ आला! आता पंजाबी युवराज सिंगबद्दल अचानक पुणेरी आत्मीयता कशी काय वाटून घ्यायची? संघ बघायचे? मालक बघायचे, खेळाडूंचे हेअरकट बघायचे, चीअर-लीडर्स बघायच्या, जाहिराती बघायच्या, कॉण्ट्रोव्हर्सी बघायची की काही संबंध नसताना आलेले फिल्मस्टार्स बघायचे?
गेल्या काही वर्षांतल्या या गुंतागुंतीच्या गोंधळानंतर यंदा माझ्या डोक्यात प्रकाश पडलाय- की खेळ बघायचा. बाकीची सजावट जोरदार असली तर पिचवर जाऊन बॅटिंग, बोलिंग, फिल्डिंग करावीच लागते ना खेळाडूंना. आधुनिकता थांबवता येणार नाही. पाच दिवसांच्या टेस्ट मॅचवरून वन डे आणि वन डेवरून आता वीस ओव्हपर्यंत आलंय गणित. हे स्वाभाविकच आहे. रात्र रात्र चालणारी पाच अंकी वन्समोअर नाटकं आता तीनपासून दोन अंकांवर आली आहेत. मध्यंतर धरून सव्वादोन तासांचा खेळ आहे सगळा. सिनेमासुद्धा चार दिग्दर्शकांनी केलेल्या वीस-वीस मिनिटांच्या चार गोष्टींचा झालाय, शॉर्टफिल्मचं महत्त्व आपण मान्य करतोय. पण त्या सगळ्यांतही आपल्याला लेखक, दिग्दर्शक, कलाकार, निर्माते यांचं कौतुक आहे ना?
उलट चांगलंच आहे. भारतीय संघात स्थान न मिळालेले कितीतरी खेळाडू आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करतायत. त्यांना त्याचं मानधनही उत्तम मिळतंय. मग काय. गुड फॉर अस. खेळावर प्रेम करणाऱ्या आपल्यासारख्यांना पर्वणीच आहे!

Story img Loader