सध्या प्रत्येक कॉलेज मध्ये हीच परिस्थिती आहे. तर आपण आपल्या कॉलेजमधील दोस्तांनाच विचारू की, परीक्षेच्या काळात खरंच कॅम्पस रिकामा असतो की, फेस्टिवल मूडनंतर कॅम्पसमध्ये अभ्यासाचादेखील मूड असतो..
हसत खेळत गेला कॉलेजचा फेस्टिवल ,
रडतखडत आली परीक्षा,
कॅम्पस झाला आता रिकामा ,
मुलांनो लयब्ररीत चला, आली तोंडावर परीक्षा..

संध्याकाळपासून अभ्यासाला सुरुवात करते, मग अभ्यासाचा मूड येऊन तो चालू करायला थोडा वेळ लागतो म्हणून रात्री उशिरापर्यंत चालू असतो व रात्री झोपायला उशीर झाल्यामुळे सकाळी लवकर उठवत नाही. सकाळी सगळ्यांची ऑफिसला जायची गडबड असते. अशा गोंधळात तर अभ्यास होणं शक्यच नाही. इंजिनीयरिंगला असल्यामुळे असाइनमेंट्स संपता संपत नाहीत म्हणून परीक्षेचे टाइमटेबल आल्याखेरीज अभ्यासाला सुरुवात करता येत नाही. नोट्स काढल्या की त्या बद्दल आधी मित्र-मैत्रिणींबरोबर चर्चा करते पण अभ्यास मात्र आपापलाच करते.
श्रद्धा टिकेकर

माझ्या मित्र-मैत्रिणींच्या अभ्यासाच्या वेळा ठरलेल्या असतात, पण माझं थोडं वेगळं आहे. माझ्या मूडवर ठरवतो अभ्यास कधी करायचा ते. शक्यातोवर रात्री जागून अभ्यास करतो पण खूप पोर्शन असेल तर मात्र झोपेची वेळ कमी करून सकाळी लवकर उठूनपण करावा लागतो. घरी एकटय़ाने केलेला अभ्यास जास्त चांगला होतो.
सस्मित नाईक

रात्री जागून अभ्यास करायला मला आवडतं. परीक्षा तोंडाशी आल्यावरच अभ्यासाला सुरुवात होते. खरं तर इतक्या उशिरा अभ्यास चालू केला की टेन्शन येतं पण आधीपासून अभ्यास अजिबात होत नाही, परीक्षेला अजून वेळ आहे, असं म्हणत दिवस कसे जातात आणि परीक्षा कधी येऊन ठेपते ते कळतंच नाही. पण अशाच टेन्शनमध्ये अभ्यास होतो. आम्ही मित्र-मित्र आधी थोडी चर्चा करतो कधी कधी नोट्सचीपण आदलाबदली करतो. तरीसुद्धा अभ्यास मात्र माझा मीच करतो.
यश लळीत    

परीक्षेच्या जस्ट आधी मी अभ्यासाच्या तयारीला लागते. कारण कितीही आधीपासून अभ्यास करायचा म्हटला तरी परीक्षा जवळ आल्याशिवाय अभ्यास चालूच होत नाही. तो जो एक सीरियसनेस असतो ना तो आधी येतच नाही. माझा अभ्यास उशिरापर्यंत जागूनच होतो. सकाळी लवकर उठून अभ्यास करणं जमत नाही. गणितासारखे विषय ग्रुपमध्येच चांगले होतात. पण थिअरी सबजेक्टस् मात्र मी एकटीच करते. लायब्ररीपेक्षा माझा अभ्यास कॅम्पसमध्येच जास्त चांगला होतो.
कृत्तिका सावंत

परीक्षेच्या थोडंच आधी मी अभ्यासाला सुरुवात करतो. एका फुलस्केप पेपरवर मेन पॉइंट्  काढतो व तेच परीक्षेच्या आधी वाचतो, ज्या मुळे वेळपण वाचतो आणि लक्षात चांगले राहते. सकाळी लवकर उठूनच अभ्यास होतो. मी सकाळी चार वाजता उठतो, तेंव्हा बाकी सगळे झोपलेले असतात. मग शांततेत एकाग्र होऊन अभ्यास करता येतो. कुठला विषय कुठल्या दिवशी करायचा असे वेळापत्रक ठरवण्याऐवजी विषयातला महत्त्वाचा टॉपिक किंवा कठीण गणितावर लक्ष केंद्रित करतो.
शार्दुल जोगळेकर

माझा अभ्यास घरीच जास्त चांगला होतो. कॉलेजमध्ये खूप गडबड असते. अशा गोंधळात अजिबात अभ्यास होत नाही. अभ्यासाची पद्धत म्हणजे मी दिवसभरात जेंव्हा आणि जसा वेळ मिळेल तसा अभ्यास करतो. सकाळी लवकर उठणं किंवा उशिरा झोपणं जमतच नाही. कॉलेज चालू झाल्यापासूनच मी अभ्यासाला सुरुवात करतो, कारण ऐन वेळी अभ्यास चालू केला की खूप बर्डन येतं. कॉलेजमध्ये जेव्हा नोट्स काढतो तेंव्हा लायब्ररीत जाऊनच काढतो.
अथर्व करंदीकर

एकाच जागी खूप वेळ बसून माझा अभ्यास होत नाही. वाचनाचा अभ्यास मी फेऱ्या मारत करतो. सकाळी खूप लवकर उठत नाही व उशिरा झोपतही नाही, दिवसभरात मध्ये मध्ये वेळ मिळतो तसा अभ्यास करतो. स्वत:च स्वत:चा अभ्यास करायला आवडतो. शंका मात्र मी मित्र-मैत्रिणींशी बोलूनच सॉल्व करतो.
– कुणाल परांजपे

Story img Loader