नीलांबरी मराठे
एका मराठी मालिकेत वाक्य होतं, ‘शोधलं की सापडतं.’ ते वाक्य त्यातल्या गुप्तहेर नायिकेच्या तोंडी होतं. हा शोधाविषयीचा संदर्भ केवळ चटकन कळेल म्हणून सांगितला. ते मालिकेचं कथानक होतं. मी मात्र शास्त्रशुद्ध अभ्यास केला आणि करते आहे. मी बीएससी फॉरेन्सिक सायन्स आणि एमएससी डिजिटल अॅण्ड सायबर फॉरेन्सिक हे दोन्ही अभ्यासक्रम मुंबईच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स’ या संस्थेतून पूर्ण केले. या अभ्यासक्रमांत ‘तपास’ हा घटक मध्यवर्ती होता. शिवाय सिक्युरिटी ऑडिटवर आधारित आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्राच्या अभ्यासक्रम परीक्षेतही मी उत्तीर्ण झाले आहे. एस.वाय.मध्ये जर्मन भाषेचं मूलभूत शिक्षण घेतल्यामुळे ती बऱ्यापैकी कळते. इथेही ती भाषा शिकते आहे. माझं राहतं शहर एखाद्या छोटय़ाशा गावासारखं आहे. इथल्या वयस्कर लोकांना जर्मनखेरीज अन्य भाषेचा गंध फारसा नाही. त्यांचा भाषाभिमान प्रखर आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात मला गुगल ट्रान्सलेटर वापरावा लागला. सांगायची गोष्ट म्हणजे, आपण तोडकंमोडकं का होईना, पण जर्मन बोललेलं त्यांना चालतं.
जर्मनीत जायचं आधीपासूनच डोक्यात होतं. लहानपणापासून असलेल्या या आकर्षणामागचं कारण होतं ‘डायरी ऑफ अॅन फ्रँक’. ते पुस्तक वाचून जर्मनीला जावंसं वाटू लागलं होतं. पुढे या क्षेत्रात आल्यावर नवनवीन गोष्टी कळत गेल्या. त्यापैकी अत्याधुनिक तंत्रज्ञानात जर्मनी अगदी अद्ययावत आहे. अनेकदा दुसऱ्यांदा पदव्युत्तर शिक्षण (मास्टर्स) घेण्याकडे बऱ्याच जणांचा कल नसतो. मात्र मी तो विचार केला. विद्यापीठांत अर्ज करायला सुरुवात केली. एकीकडे शेवटच्या वर्षांची परीक्षाही सुरू होती. अॅडव्हायझरीतर्फे तीन-चार विद्यापीठांत अर्ज केले होते. त्यातील एका अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालाही. पण तोपर्यंत या अभ्यासक्रमाचं संमतीपत्र आलं नव्हतं. मनावर बऱ्यापैकी ताण होता. आर्थिक आघाडीवर अडचण नव्हती. पण एवढे पैसे दुसऱ्यांदा मास्टर्स करण्यासाठी द्यावे का, असा विचार मनात येत होता. त्यामुळे जर्मनीला जायचं नाही, असं ठरवण्याचाही एक टप्पा येऊन गेला. आणि अखेरीस या विद्यापीठाचा ईमेल आला. माझा कएछळरचा निकाल लागला आणि त्याच दिवशी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. ब्रॅण्डेनबर्ग टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये (इळव) दोन वर्षांच्या एमएस-सायबर सिक्युरिटी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. कागदपत्रांची पूर्तता करताना थोडेसे नाकीनऊ आले. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायला वेळ नाही मिळाला. व्हिसाची बऱ्यापैकी कठीण प्रक्रिया पार केली. इम्पिरिअल संस्थेच्या मदतीने व्हिसासाठी अर्ज केला. सुदैवाने ते काम वेळेत झालं. विद्यापीठात राहायची सोय झाली नव्हती. म्हटलं तर ती माझी चूक होती. कारण त्यांचं पत्र आल्यावर मी लगेच संपर्क साधला नव्हता. तेव्हाच्या त्या ताणतणावात काही सुचलं नव्हतं. तिथे पोहचायच्या दोन दिवस आधी राहायची सोय झाली.
घरच्यांचा कायमच पाठिंबा मिळाला. विशेषत: बाबांचा पाठिंबा नसता, तर इथे येणं शक्य झालं नसतं. मी शिक्षणानिमित्त बऱ्यापैकी बाहेर राहिले असल्याने त्यांना चिंता वाटली नाही. अर्थात परदेशात जाण्याचा थोडासा ताण होता. विशेषत: आईला माझ्या स्वयंपाकाविषयी काळजी वाटत होती. आम्ही खूप जण सोबत आलो. ओळखीचे नसलो तरी व्हॉट्सअॅपवरून माहितीचे झालो होतो. एअरपोर्टवर सीनिअर घ्यायला आला होता. सुरुवातीला विद्यापीठात जायचे रस्ते लक्षात राहत नव्हते. त्यामुळे पहिले तीन-चार दिवस सीनिअर्स मला घ्यायला आणि सोडायलाही यायचे. इथे शेअर आणि वैयक्तिक अपार्टमेंट असतात. मी एकटी राहते. या रूम्समध्ये चांगल्या सोयी आहेत. एन्रोलमेण्ट झाल्याशिवाय बस पास मिळत नाही. तेव्हा बसच्या तिकिटासाठी काही युरोंचा खर्च करणं जिवावर यायचं. साहजिकच त्याची रुपयांशी तुलना केली जायची. मग मी चालत जायचे. आपल्याकडे चलन बदलताना ठरावीकच रक्कम मिळते. इथल्या व्यावहारिक गोष्टींसाठी तितकी रक्कम पुरत नाही. त्यामुळे बँकेतलं खातं सुरू होईपर्यंत जास्तीची रक्कम सोबत ठेवावी. खर्च करताना थोडं तारतम्य बाळगणं केव्हाही चांगलं. सिटी रजिस्ट्रेशनसारख्या व्यावहारिक बाबींची पूर्तता लवकरात लवकर करावी लागते. त्यात सुरुवातीचे काही दिवस जातात. इथल्या विषम हवामानात रुळायला वेळ लागतो.
जर्मनीत वेळेबाबत अतिशय काटेकोरपणा आहे. एक किस्सा आठवतो आहे. विद्यापीठातर्फे लेईपीझिंगला आम्हा नवीन विद्यार्थ्यांची सिटी टूर नेण्यात आली होती. तो छान अनुभव होता. मात्र वेळेत न पोहचल्यामुळे काहींची गाडी चुकली आणि त्यांना आमच्यासोबत येता आलं नाही. वेळेचं महत्त्व अशा अनेक प्रसंगांतून वेळोवेळी जाणवतं. आतापर्यंत आम्हाला माहिती असलेल्या गोष्टींपेक्षा थोडय़ा वेगळ्या गोष्टी आम्ही शिकतो आहोत. वर्गातली बरीच मुलं इंजिनीअर्स आहेत. माझा विषय वेगळा होता. त्यामुळे काही वेळा मला थोडी जास्ती मेहनत घ्यावी लागते. विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि त्यांचे गुण हे मुद्दे लक्षात घेतले जातात. जर्मनीतील इळवमध्ये निवड होणं हीच मोठी भारी गोष्ट आहे. माझ्या वर्गात रशिया, यूके, यूएसए, मोरक्को, इजिप्त आदी विविध देशांतील विद्यार्थी शिकतात. साधारण २५ विद्यार्थ्यांच्या आमच्या वर्गात मुलींची संख्या सहा असून त्यातल्या चार भारतीय आहेत.
आपल्याकडे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचं बॉण्डिंग असतं. इथल्या प्राध्यापकांना विद्यार्थी माहिती असतात. त्यांचं वागणं बहुतांशी औपचारिक असतं. शंकानिरसनासाठी आधी त्यांची वेळ घ्यावी लागते. शिकवताना त्या त्या संकल्पनेचं मूळ समजावून सांगतात. त्याचा विद्यार्थ्यांनी विचार करून ते कसं वापरता येईल, हे पाहायचं असतं. प्राध्यापकांनी दिलेली असाइनमेंट पूर्ण झाल्याशिवाय त्या सेमिस्टरच्या परीक्षेला बसताच येत नाही. असाइनमेंट स्वत:ची कल्पनाशक्ती वापरून पूर्ण करावी लागते. शिकवण्यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जातो. पोर्टलवर लेक्चरच्या आधी प्राध्यापक काय शिकवणार आहेत, ते अपलोड केलं जातं. विषयवार स्टडीमटेरिअल अपडेट होतं. एकदा वर्गात मी विचारलेला प्रश्न प्राध्यापकांना आवडला आणि त्यांनीही शक्यता आवडली असून त्यावर मी विचार करेन, असं सांगितलं. माझ्या फॉरेन्सिक पदवीचं इथं फार अप्रूप वाटतं. आमच्या प्रोजेक्टला हायेस्ट ग्रेड मिळाल्याने आम्ही खूश झालो, तर एका वैयक्तिक असाइनमेंटमध्ये मला शंभर टक्के मिळाले. केवळ थिअरी शिकवली जात नाही, तर तिचा वापर कसा करायचा हेही इथे शिकवलं जातं. काही प्राध्यापकांचा लेखी परीक्षांवर फारसा भरवसा नसल्याने त्या विषयांच्या लेखी व तोंडी परीक्षा घेतल्या जातात.
मुळात माझा इन्व्हेस्टिगेशन (तपास) हा मुख्य विषय असल्याने त्या दृष्टिकोनातून गोष्टी माहिती आहेत. इथे मला पहिल्यापासून ती गोष्ट माहिती करून घ्यायची आहे. आम्ही विद्यार्थी समान अभ्यासविषयांची बऱ्याचदा चर्चा करतो. बहुतांशी सबमिशन ग्रुपमध्ये करायची असतात. आमच्या ग्रुपमध्ये चायनीज, नायजेरियन, इराक-इराण वगैरे देशांतील विद्यार्थी आहेत. सगळे इंग्रजी बोलत असले तरी प्रत्येक देशातलं इंग्रजी, त्याचा वापर, उच्चार हे भिन्न असतात, हे इथे आल्यावर कळलं. आपल्याकडे सर्रास इंग्रजीचा वापर होतो. काही देशांत इंग्रजीपेक्षा तिथल्या भाषेला प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलायला त्रास होतो. त्यांना कामचलाऊ इंग्रजी येतं. त्यांच्याशी बोलताना जरासा अडथळा येतो. तरीही एकमेकांना समजावून सांगितलं जातं, समजून घेतलं जातं. इथे एकाच अभ्यासक्रमाला असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मैत्र असणं फार कमी आहे. उलट शेजारी राहणं, एका बॅचचे असणं यामुळे ग्रुप होतात.
नवीन विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठातर्फे एका इव्हेंटचं आयोजन केलं जातं. विद्यापीठातील कल्चरल नाइट्समध्ये सगळ्या देशांतील विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. इंडियन कल्चरल नाइटमध्ये प्रत्येकाने काही ना काही पदार्थ करून आणायचा होता. अलीकडे बॉलनाइट पार्टी झाली. मी आधी कधी पार्टीजना वगैरे गेलेले नसल्याने माझ्यासाठी हे वेगळं होतं. इथे ते खूप कॉमन आहे. आम्ही विद्यार्थीही आळीपाळीने एकमेकांकडे जेवायला, गप्पा मारायला जातो. इंटरनॅशनल स्टुण्डण्ट ऑफिसमध्ये आपल्या शंकांचं निरसन होतं. इथल्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये दाक्षिणात्य आणि उत्तरेतील विद्यार्थी बऱ्यापैकी आहेत. त्या मानाने मराठी विद्यार्थी कमी आहेत. त्यामुळे मराठी भाषा, संस्कृतीची थोडीशी उणीव भासते. मात्र काही मराठी विद्यार्थ्यांच्या ओळखी झाल्यावर दिलासाही वाटला. परदेशात सेट व्हायच्या काळात आमच्यापैकी अनेक विद्यार्थ्यांना मॅगीची मदत फार झाली. त्या काळात घरी फोन करून पदार्थाची कृती विचारून केली गेली. मात्र सेट झाल्यावर सगळे शिकले. इथल्या मुलींपेक्षा मुलांना सगळा चांगला स्वयंपाक येतो. परीक्षेच्या काळात थोडीथोडीशी धावपळ सुरू झाली आहे. बाकी एरवी जर्मनीतील जीवन फार आरामात असतं. अभ्यास सांभाळून कामं करायला वेळ पुरत नाही. मग पॉटलक पार्टी केली जाते. त्यात प्रत्येकाने एकेक पदार्थ करायचा, आणायचा आणि सगळ्यांनी मिळून खायचं. मेसमधील पदार्थ चविष्ट असतात. अॅपवर त्यातला मेन्यू अपडेट होतो. भारतीय रेस्तराँ असली तरी तिथे खाणं महाग असतं.
इथलं ग्रंथालय हे एकदम भारी आहे. या इमारतीची रचना एकदम हटके आहे. आत गेल्यावर लहानांच्या प्ले स्कूलसारखा फील येतो, एवढी इथली रंगसंगती अनोखी आहे. त्यामुळे अभ्यासापेक्षा फोटो काढणं जास्ती होतं. प्रथमदर्शनी ते ग्रंथालय वाटतच नाही. विद्यार्थ्यांना स्वत:च्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अन्य कोर्सेसनाही प्रवेश घेता येतो. उदाहरणार्थ – मी फ्लॅमिंको डान्स आणि म्युझिक शिकायचा विचार करते आहे. मला ड्रॉइंग, पेण्टिंग, लिखाणाची आवड आहे. पण सध्या छंद जोपासायला सवड नाही. शिक्षण संपल्यावर इथे नोकरी मिळाली तर ती करण्याचा विचार आहे. शोधलं की सापडतं, हे मात्र खरंच!
कानमंत्र
* अभ्यासक्रमाची निश्चिती झाल्यावर त्या हिशेबाने बाकीच्या गोष्टी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आखा आणि तितक्याच तत्परतेने त्या प्रत्यक्षात आणा. जर्मन अकॅडमिक एक्स्चेंज सर्व्हिसची ही वेबसाइट फॉलो करा.
* जर्मन भाषा येत असेल तर चांगलंच आहे, पण केवळ भाषेचा बाऊ करून इथे यायचं टाळू नका.
शब्दांकन : राधिका कुंटे
viva@expressindia.com