सिद्धेश झाडे

नमस्कार. मी मूळचा नागपूरचा. माझं बालपण दोन्हीकडच्या आजीआजोबांच्या प्रेमळ छायेत गेलं. माझे आईबाबा डॉक्टर आहेत. मात्र मीही डॉक्टर व्हावं, असा आग्रह त्यांनी कधीच धरला नाही. मला करिअर निवडीचं स्वातंत्र्य मिळालं. बाबांच्या एका संशोधक मित्रांच्या ओळखीने अकरावीत पहिल्यांदा ‘आयसर’ पाहायला मिळालं आणि बारावीनंतर तिथेच जायची खूणगाठ मनाशी पक्की बांधली गेली. त्यानुसार पुण्याच्या ‘आयसर’मध्ये (ककरएफ) बीएसएमएसला प्रवेश घेतला. पहिली दोन वर्ष अभ्यासक्रमातल्या काही विषयांची सक्ती असते. तिसऱ्या-चौथ्या वर्षी विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार विषय निवडता येतात. मी बायोलॉजीसह फिजिक्स आणि मॅथ्स घेतलं होतं. पाचव्या वर्षी प्रबंध लिहायचा असतो. केवळ पुण्याच्याच आयसरमध्ये भारत किंवा परदेशातील विद्यार्थ्यांना प्रबंधाच्या (थिसिस) अभ्यासासाठी जायची संधी मिळते. तेव्हा मला खुराणा शिष्यवृत्ती मिळाली होती. माझा थिसिस न्युरोसायन्समध्ये होता. ‘ट्रान्सक्रे निअल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन्स’ (TMS) या तंत्राच्या साहाय्याने मेंदूमधल्या काही भागांचा अदमास घेऊ न वेगवेगळ्या रोगांचं निदान त्यावरून करता येऊ शकतं. त्यानुसार अल्झायमर या आजारासाठी मेंदूच्या कोणत्या गुणधर्माचा शोध घ्यावा, हा माझा विषय होता. मी या तंत्राचा उपयोग रुग्णांसाठी केला. त्यामुळे या संशोधनाचा लगेच उपयोग होऊ  शकतो का, हे कळणार होतं. हार्वर्डला जाऊन या थिसिसवर काम केलं. तिथून भारतात परतल्यावर बीएसएमएसची पदवी मिळाली.

बोस्टनमधील हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये जवळपास वर्षभर होतो. या संस्थेशी काही मुख्य हॉस्पिटल्स संलग्न आहेत. त्यापैकी बेथ इस्रायल डिकोनेस मेडिकल सेंटरमध्ये ‘कॉग्निटिव्ह न्युरोलॉजी’ विभागात मी काम करत होतो. या विभागात अधिकांशी वयोवृद्ध रुग्णांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यविषयक काम करण्यावर भर दिला जातो. जीवनशैलीशी निगडित असणाऱ्या आजारांचं प्रमाण वाढतं आहे; हे लक्षात घेऊन या विभागाचं काम चालतं. माझ्या लॅबचे प्रमुख डॉ. अल्वारो पास्कल-लिओनी हे माझे मार्गदर्शक होते. ते नामवंत न्युरोलॉजिस्ट आहेत. जगभरातल्या ज्या मोजक्याच डॉक्टरांनी टीएमएसचं तंत्र वापरायला सुरुवात केली; त्यात डॉ. अल्वारो यांचा समावेश होतो. त्यांच्याकडूनच हे तंत्र शिकता येणं ही फार मोठी गोष्ट होती. त्याआधीही मी ‘आयसरमध्ये न्युरोसायन्समध्ये काम करत होतो. ‘युनिव्हर्सिटी ऑफ विस्कांसिन-मॅडिसन’मधला माझा समर प्रोजेक्ट याच संदर्भातला होता. या प्रोजेक्टमध्ये मला कळलं की, न्यूरोइमेजिंगने मेंदूतल्या अ‍ॅक्टिव्हिटी बघून आजाराचं निदान करता येतं. मात्र टीएमएसमुळे थेट निरीक्षण करून आजाराचं निदान करता येतं. माझ्या मार्गदर्शकांनी केलेल्या संशोधनानुसार नैराश्याच्या एका प्रकारात औषधोपचारांचा गुण येत नाही, मात्र नैराश्य टीएमएसच्या साहाय्यानं बरा करता येतं.

इथे काम करण्याचा-शिकण्याचा अनुभव खूपच चांगला होता. डॉ. अल्वारो यांना विविध व्यवधानांमुळे अत्यल्प वेळ देता यायचा. साधारणपणे महिन्यात एकदा आमची भेट व्हायची. त्यामुळे मला स्वत:चं स्वत: शिकायला, शोधायला, धडपडायला आणि सावरायलाही वेळ मिळाला. मात्र त्यांच्या मार्गदर्शनाने कामाला एक दिशा मिळायची. इथल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधनाबद्दल, पेपर्स प्रसिद्ध करण्याबाबत परिपूर्ण आत्मविश्वास असतो. ती मुभा त्यांना मिळते. किंबहुना त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. माझे पेपर्स ‘सोसायटी फॉर न्युरोसायन्स’ आणि ‘इंटरनॅशनल ब्रेन स्टिम्युलेशन कॉन्फरन्स’मध्ये प्रसिद्ध झाले. नवीन जागी नवीन लोकांशी कनेक्ट होणं, ही काही वेळा थोडी कठीण गोष्ट असते. मध्यंतरी मी ऑस्ट्रेलियामधल्या लॅबमध्ये काही काळ काम केलं, तिथं कनेक्ट होणं लगेच जमलं. पण हार्वर्डमधल्या वर्षभरात ते तितकंसं साधलं नाही. तेव्हा वाटलं, मी नवीन आहे, बाकीचे इथंच काम करत आहेत, म्हणून असं होतं असावं. काही अंतर राखून वागणं ही इथली एक वृत्ती दिसते आहे. आता ही गोष्ट कमी जाणवते आहे; कारण डय़ुक युनिव्हर्सिटी वर्गात आम्ही ११ देशांमधले ३४ विद्यार्थी आहोत.

हार्वर्डला असताना ‘निर्माण’आणि अन्य काही मित्रमंडळी मिळून आम्ही एका विषयावर चर्चा करत होतो. विषय होता – डॉक्टरांची ग्रामीण भागातली आरोग्यसेवा. या विषयासंबंधीचे पैलू पडताळून पाहता येतील का, असा विचार करत थोडी माहिती जमवायचा प्रयत्न केला. दरम्यान माझा थिसिस संपला. आमच्याकडे जमा झालेल्या माहितीचा काहीतरी चांगला उपयोग करावा, असं आम्हाला वाटलं. तेव्हा आमच्यापैकी कुणीही थेट सार्वजनिक आरोग्यक्षेत्राशी संबंधित नव्हतो. आमची टीम वाढवून कामाची कक्षा वाढवली. पुढं ‘कंसोर्टियम ऑफ युनिव्हर्सिटीझ फॉर ग्लोबल हेल्थ मिट २०१९’ मध्ये ‘कंसोर्टियम ऑफ युनिव्हर्सिटीज फॉर ग्लोबल हेल्थ’ हा आमचा पेपर वाचला. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधल्या इंटरनॅशनल हेल्थ कँाग्रेसमध्ये आमचा पेपर सादर केला. काही जर्नलमध्ये पेपर्स प्रकाशित व्हायची प्रक्रिया सुरू आहे.

या कामातून प्रेरणा मिळाल्याने मी डऱ्हममधील डय़ुक युनिव्हर्सिटीच्या डय़ुक ग्लोबल हेल्थ इन्स्टिटय़ूटमध्ये मास्टर्स ऑफ सायन्स इन ग्लोबल हेल्थ या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. न्युरोसायन्स आणि ग्लोबल हेल्थचा थेट संबंध नसला तरीही लोकारोग्यासाठी काम करण्याची वृत्ती, संख्याशास्त्राचं तंत्र आदी गोष्टी दोन्हीकडे समान आहेत. जगातल्या दोन शहरांमधल्या आरोग्यसमस्या सारख्या असतील तर त्यावरून काही उपाय करता येऊ  शकतो का, असा विचार या अभ्यसक्रमामागे आहे. साधारण पाच-सहा अमेरिकन विद्यापीठांमध्ये जागतिक आरोग्यविषयक अभ्यासक्रम आहेत. मी हार्वर्ड, हॉपकिन्स, डय़ुक, बोस्टन या विद्यापीठांमध्ये अर्ज केला होता. हार्वर्डमध्ये मुलाखतीनंतर निवड झाली नाही. हॉपकिन्स आणि बोस्टनमध्ये निवड झाली, पण शिष्यवृत्ती मिळत नव्हती. डय़ुकमध्ये शिष्यवृत्ती मिळाली.

पहिल्या आठवडय़ात इन्स्टिटय़ूटमध्ये एक ग्रुप अ‍ॅक्टिव्हिटी आयोजित करण्यात आली होती. आम्ही कॅम्पेन साइटला गेलो होतो. तिथे वेगवेगळे खेळ होते. त्या खेळांत लोकांची सहभागी होण्याची पद्धत खूप वेगळी वाटली. मोठय़ांना लहान मुलांचे खेळ खेळायला लावल्यावर सगळे किती मनमोकळेपणाने व्यक्त होतात, ते कळलं. आता माझी पहिली सेमिस्टर संपली आहे. इन्ट्रोडक्शन टू ग्लोबल हेल्थ, ग्लोबल हेल्थ रिसर्च- डिझाइन अ‍ॅण्ड प्रॅक्टिस, बायोस्टॅस्ट आणि एपिडिमॉलॉजी हे विषय अभ्यासाला आहेत. डॉ. जोओ व्हिस्सोची हे माझे मार्गदर्शक आहेत. पुढे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्रबंध लिहिणार आहे. शिक्षणात अल्पकाळाचा खंड पडल्यावर पुन्हा वर्गात बसणं तितकं जड गेलं नाही, कारण माझं ध्येय निश्चित होतं. आमचा रिसर्चग्रुप इंज्युरी, ब्रेन ट्रॉमा आणि मद्यपानाच्या व्यसनासंदर्भात काम करतो. बरंच काम आफ्रिकन देशांमध्ये सुरू आहे. उदाहरणार्थ-  टाझांनिया. मी सध्या मद्यपानाच्या व्यसनाची पूर्वचिन्ह दर्शवणाऱ्या आणि त्याचं निदान करणाऱ्या चाचण्या कशा करता येतील, यावर काम करत असून त्याची नुकतीच सुरुवात झाली आहे. इथं अभ्यासक्रमाच्या आराखडय़ासाठी आणि विषयनिवडीसाठी वगैरे  खूप मेहनत घेतात आणि त्याचं तंतोतंत पालन केलं जातं. विद्यार्थ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी लक्षात घेतात. अभ्यासकोडी घरी, वर्गात एकटय़ानं, ग्रुपनं सोडवायला देतात. शिवाय असाइनमेंट, प्रॅक्टिकल, प्रेझेंटेशन असतं. ग्रुपनं काम करताना टीमवर्क आणि संवादाचं महत्त्व कळतं. ग्लोबल हेल्थ संदर्भात प्रेझेंटेशन द्यायचं होतं. आम्ही आमच्या इथल्या संशोधनावर आधारित प्रेझेंटेशन सादर के लं. या माध्यमात काम करताना हे विषय आणखी चांगल्या रितीनं कळतात.

मी माझ्याच मार्गदर्शकांकडे रिसर्च असिस्टंट म्हणून पार्टटाइम जॉब करतो आहे. त्याशिवाय वेगवेगळ्या प्रोजेक्टवर लेखन-संपादन आणि विश्लेषणात्मक लिखाण करणं, ही माझी जबाबदारी आहे. निधीसंकलनासाठी करण्यात येणाऱ्या अर्जाच्या लेखनात प्राध्यापकांना सहाय्य करतो. हे काम आणि माझ्या संशोधनाचं काम या गोष्टी बऱ्याच अंशी एकमेकांशी संबंधित आहे.

हार्वर्ड आणि इतर अनुभवांची तुलना मनात वारंवार होते. तिथे असताना ज्युनिअर फॅकल्टीला मी करत असलेलं काम पटत नसल्यामुळे संभाषणात अडचण निर्माण झाली होती. त्यावेळी मार्गदर्शकांशी बोलून सगळ्या गोष्टी करत होतो. शेवटी ज्युनिअर फॅकल्टींनी ईमेलवरून बोलणं थांबवू या. परदेशी गेलेले मार्गदर्शक परतल्यावर प्रत्यक्ष भेटून बोलू, असं सांगितलं. तेव्हा मला थोडीशी भीती वाटली होती. आम्ही भेटल्यावर मार्गदर्शकांनी दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं. थिसिसबाबत मार्गदर्शकांशी आणि पेपरबद्दल ज्युनिअर प्राध्यापकांशी बोलायचं ठरलं. माझा अभ्यास, संशोधन आणि काम या गोष्टी वेगळ्या ठेवता आल्या पाहिजेत, हे मी या अनुभवातून शिकलो. त्यामुळे इथल्या लॅबमध्ये काम सुरू केलं, तेव्हा गोष्टी सुकर झाल्या. इथल्या रेस्तरॉमध्ये प्रत्येक डिशसमोर तिचा कॅलरीकाऊं ट लिहिलेला असतो. त्यामुळे आपसूक आहारावर नियंत्रण राहायला मदत होते. आहारात लक्षणीय बदल झाला. आताचं जीवनमान आरोग्यदायी झालं आहे. भारतापेक्षा इथं सगळ्यात स्तरांतल्या माणसांसाठी रोजचं जीवनमान बरंच कठीण आहे. पैसे वाचवायला स्वत:चा स्वयंपाक करावा लागतो. एकूणच स्वावलंबन, जबाबदारीनं वागणं, स्वयंनिर्णय आणि वेळेचं व्यवस्थान करावं लागतं. अभ्यास, काम आणि भारतातल्या आमच्या ग्रुपचं काम यात थोडी धावपळ होते. अर्थात हे सगळंच माझ्या आवडीचं आहे. हा अभ्यासक्रम संपल्यावर अमेरिके तच एमडी-पीएचडी किंवा पीएचडी करेन. मधल्या काळात काही माहिने भारतात येऊन काम करण्याची इच्छाही आहे. विश मी लक.

कानमंत्र

* अमेरिकेत स्थलांतरित भारतीय म्हणून वावरताना आपली ओळख शाबूत ठेवली पाहिजे. मातृभूमीचं आपण काहीतरी देणं लागतो, याची जाणीव मनात शिल्लक ठेवली पाहिजे.

* रोजच्या जीवनातल्या सुखसोयींनी युक्त असणारं इथलं जीवनमान भारताइतकं सुखदायी नाही. म्हणून इथं येण्यापूर्वीच स्वावलंबनाचे धडे गिरवलेले उत्तम.

शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com

Story img Loader