नव्या पिढीचा गायक, संगीतकार, रिअॅलिटी शोचं व्यासपीठ गाजवणारा, रॉक म्युझिक बॅण्डमध्ये झोकून देऊन गाणारा आणि शास्त्रीय संगीताच्या तानाही तितक्याच नजाकतीनं घेणारा हरहुन्नरी कलाकार जसराज जोशी सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!
उगाचच जुन्या कपाटाचे कप्पे उचकत बसलो होतो आणि एक जुनी कॅसेट हाती लागली. आबिदा परवीन यांनी गायलेल्या गझलांची. मी लहान असताना दर शनिवार रविवार आमच्याकडे लागलेली असायची. माझे तेव्हा फार काही कळायचे वय नव्हते, तरीही मी ते ऐकून तल्लीन होऊन जायचो. अगदी न कळणाऱ्या वयापासून मला वेगवेगळे संगीत ऐकवल्याबद्दल मी माझ्या आई-बाबांचा आणि नित्यनियमाने पाकिस्तान रेडिओ ऐकणाऱ्या माझ्या आजोबांचा प्रचंड ऋणी आहे. आजच्या काळातही टेप रेकॉर्डर चालू अवस्थेत असलेल्या माझ्या एका मित्राच्या घरी जाऊन मग मी ही कॅसेट दोन-तीन वेळा ऐकून काढली, तेव्हा कुठे समाधान पावलो.
‘कू ब कू फैल गयी बात शनासाई की
उसने खुशबू की तरह मेरी पझेराई की..’
किंवा-
‘जबसे तूने मुझे दीवाना बना रखा है
संग हर शाक़स ने हातोंमे उठा रखा है..’
नंतर- ‘वो हमसफर था मगर उससे हम- नवाई ना थी..’ मग- गालिबची- ‘हर एक बातपे कहते हो तुम के तू क्या है..’
काहीशी कव्वाली अंगाकाडे झुकणारी ही आबिदाची गज़्ाल गायकी, उस्ताद नुसरत फतेह अली खान साहेबांशी बरीच मिळतीजुळती. थोडासा फरक हाच की खान साहेबांचे गाणे जास्त अभिजात(किंवा शास्त्रीय) संगीताकडे झुकणारे आणि आबिदाचे तल्लनतेकडे!
पुढे थोडा मोठा झाल्यावर हे लक्षात आले की, आबिदाचा मूळ पेशाच ‘तल्लीनता’ हा आहे. कारण तिच्यात सूफी गायकी मुख्य आहे, गज़्ाल तर तोंडी लावायला आहे. ढोबळ मानाने सूफी म्हणजे काय? तर ‘त्या’ला म्हणजे ईश्वर/ अल्लाह जो कोणी असो, त्याला आपला प्रियकर मानून प्रेमाच्या मार्गाने त्याची साधना करणे. आबिदा या प्रेमात नखशिखांत बुडलेली दिसते. तिने गायलेले ‘बुल्लेशाह’चे सूफी क़लाम (‘दमादम मस्त कलांदर’, ‘तेरे इश्कनाचाया’..‘अरे लोगो तुम्हारा क्या? म जानु मेरा खुदा जाने..’, ‘एक नुक़ते वीच गल मुकदी ए’, ‘बुल्ले नु समझावण आया..’) याचाच प्रत्यय देतात. ‘ओ मिया..’ नि आबिदा गायला सुरुवात करते आणि ती आणि तिचा प्रियकर गप्पा मारत राहतात. साक्षीदार मात्र राहून अनुभव घेत राहणे एवढेच काय ते आम्हा श्रोत्यांच्या हाती उरते. ‘आलात? या.. बसा. ऐका हवं तर..बाकी म जानु मेरा खुदा जाने!
हे ऐकाच..
बुल्लेशाहव्यतिरिक्त आबिदाने कोळून प्यायलेला अजून एक संत म्हणजे कबीर. ‘कबीर बाय आबिदा’ हा अल्बम आवर्जून ऐकायला हवा असा आहे. कबिराचे काही निवडक दोहे (‘मन लागो यार फकिरी मे’, ‘साहेब मेरा एक है’, ‘भला हुवा मेरी मटकी फून्टी रे’ , ‘सोऊ तो सपने मिलू.’) पालुपदी घेऊन बाकी दोहे त्यात माळेसारखे गुंफून आबिदा आपल्यासमोर घेऊन येते! या अल्बमचे सादरकत्रे आहेत गुलजार साहेब! त्यामुळे प्रस्तावनेत गुलजार साहेबांचा आवाज आणि गाण्यात आबिदाचा; अशी डबल ट्रीट आपल्याला अनुभवता येते. प्रस्तावनेतील काही ओळी सांगून थांबतो –
‘रांझा रांझा करदी हुण म आपही रांझा होई.. सूफियों का कलाम गाते गाते आबिदा परवीन खुद सूफी हो गयी. उनकी आवाज़्ा अब इबादत की आवाज़्ा लगती है. मौला को पुकारती है तो लगता है की हां, इनकी आवाज जरूर उस तक पहुचती होगी.
वो सुनता होगा- सिदक सदाकत की आवाज़्ा. ‘माला कहे है काठ की; तू क्यूँ फेरे मोये; मन का मनका फेर दे; तो तुरत मिला दूँ तोये..’ आबिदा कबीर के मार्फत पुकारती है उसे, हम आबिदा के मार्फत उसे बुला लेते है’
‘कबीर को पढते जाओ- परत खुलती जाती है. आबिदा को सुनते रहो- सूरत खुलती जाती है. ध्यान लग जाता है, इबादत शुरू हो जाती है, आँखें अपने आप बंद हो जाती है. कभी इन्हे सामने बठ के सुनें. आँखें खोलो तो बाहर मे नजर आती है, आँखे मुन्दो तो अंदर मे..’
जसराज जोशी