vv11नव्या पिढीचा गायक, संगीतकार, रिअ‍ॅलिटी शोचं व्यासपीठ गाजवणारा, रॉक म्युझिक बॅण्डमध्ये झोकून देऊन गाणारा आणि शास्त्रीय संगीताच्या तानाही तितक्याच नजाकतीनं घेणारा हरहुन्नरी कलाकार जसराज जोशी सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!
नुकताच म्हणजे ६ जानेवारीला वाढदिवस झाला ए. एस. दिलीप कुमार ऊर्फ अल्लाह रखाँ रेहमान ऊर्फ सरांचा, अर्थात आपल्या लाडक्या ए. आर. रेहमान यांचा. त्यानिमित्ताने पेश आहे अफफ प्ले लिस्ट. खरंतर रेहमान हे प्रकरण एका प्ले लिस्टमध्ये सामावणारं नाही. म्हणून या आठवडय़ात विचार करतोय रेहमान सरांच्या सुरुवातीच्या काही चित्रपटांचा. अर्थात रेहमान फेज वन.
अशी फेज किंवा असा काळ, जेव्हा सरांचं नवीन आलेलं प्रत्येक गाणं ऐकताक्षणीच ब्रह्मानंदी टाळी लागायची. असा काळ, ज्यात बाकी संगीतकरांमध्ये चढाओढ असायची ती रेहमानचं गाणं पहिल्यांदा कोण चोरी करेल याची. ऑडिओ कॅसेटचा काळ होता तो. फार पूर्वीचा नसला तरी आता आठवावा लागेल असा. तुम्हाला आठवत असेल ती ‘रोजा’ची सुप्रसिद्ध कॅसेट, ज्यात एका बाजूला तमिळ आणि एका बाजूला िहदी गाणी होती. या कॅसेटची आम्ही चक्क पारायणं केली आहेत. क्लासिक रेहमानचा काळ. साधारण १९९२ ते ९५ ची ती रेहमान फेज वन!
सुरुवात अर्थातच ‘रोजा’च्या गाण्यांनी. ‘रोजा’तली सर्वच गाणी अफलातून. त्यातली माझी सर्वात आवडती म्हणजे ‘दिल है छोटासा’ आणि ‘ये हसीन वादियाँ’. एक किस्सा प्रसिद्ध आहे या चित्रपटाबाबतचा.. दिग्दर्शक मणिरत्नम जेव्हा रेहमान सरांना पहिल्याप्रथम भेटले तेव्हा त्यांनी सरांना ‘रोजा’मधला तो गावातला सीन वर्णन करून सांगितला आणि म्हणाले, याच्यावर काहीतरी म्युझिक तयार कर. त्यावर रेहमानने तिथल्या तिथे एक आलापसदृश म्युझिक पीस तयार केला. तो ऐकूनच रेहमानला रोजा ही फिल्म बहाल झाली आणि ‘रेहमान’ नावाचा प्रवास सुसाट चालू झाला. हाच पीस आपल्याला ‘दिल है छोटासा’च्या दुसऱ्या कडव्याआधी (M2) ऐकू येतो. ‘ये हसीन वादियाँ’.. या गाण्याविषयी काय बोलू? केवळ म्युझिकच्या आधारे शब्दाचा वापर न करता बर्फाचे वातावरण, बर्फाळ प्रदेशाचा फील कसा काय निर्माण करता येऊ शकतो एखाद्याला?.. केवळ अशक्य!
नंतर १९९३ मधली ‘जंटलमन’ आणि ‘थिरुडा थिरुडा’ (हिंदी- ‘चोर चोर’) मधली गाणी. ‘जंटलमन’मधलं ‘चिककू बुक्कू रैइले’ (ज्याच्यावरून ‘पाकचिक राजाबाबू’ हे गाणं चोरलेलं आहे) ऐकून मी वेडाच झालो होतो. यात रेल्वेच्या आवाजाचा ऱ्हिदममध्ये जो वापर झालाय तसा आजपर्यंत कुठल्याही गाण्यात झाला नाहीए.
‘थिरुडा थिरुडा’मधलं ‘थी थी’ (हिंदी- ‘दिल दिल’) हे गाणं फार लोकांनी ऐकले नसेल, कारण ही फिल्म हिंदीमध्ये चालली नाही. हे एक प्रणयगीत आहे आणि यात सरगम आणि तालाच्या पढंतीचा (बोलांचा) जो वापर झालाय तो आजही नवा नवा वाटतो. मग १९९४ मध्ये आला ‘काधलन’ म्हणजेच हिंदी- ‘हमसे है मुकाबला’. यातलं ‘मुक्काला मुकाबला’ या गाण्याची चाल उचलून तर जवळ जवळ ५ ते ७ गाणी निघाली नंतर. ‘हमसे है मुकाबला’मधलं माझं सर्वात आवडतं म्हणजे ‘सुन री सखी’ हे हरिहरनजींच्या मखमली गायकीतलं ठुमरीवजा गाणं. याच चित्रपटातलं ‘गोपाला गोपाला’ हे गाणंही अफलातून. खटय़ाळ स्वभावाच्या या गाण्यात मध्ये बासरीवरची एक इमोशनल टय़ून येऊन जाते आणि गाण्याची मजा द्विगुणित करते. असं कॉम्बिनेशन फक्त सरांच्याच डोक्यातून येऊ शकतं.
मग ९५ मध्ये आला ‘बॉम्बे’! माझा सर्वात आवडता अल्बम. ‘हम्मा हम्मा’, ‘तू ही रे’, ‘कुच्चि कुच्चि रक्कमा’, ‘बॉम्बे थीम’ आणि नुसत्या आठवणीने अंगावर काटा आणणारं ‘कहेना ही क्या’! चाल, कोरस, मधूनच हार्मोनियमबरोबर येणारी सरांची सरगम, सगळं काही अद्भुत! या गाण्यावर प्ले लिस्ट संपवण्यावाचून पर्याय नाही! (याच वर्षी ‘रंगीला’सुद्धा आला, पण ‘रंगीला’ मी फेज-२ मध्ये टाकू इच्छितो. ती पुढे कधीतरी येईलच..)
जसराज जोशी

हे  ऐकाच..
‘थिरुडा थिरुडा’ या तमिळ चित्रपटातलं ‘थी थी’ हे रेहमान सरांचं ऐकावंच असं एक गाणं. हिंदीत फिल्म आली. ते गाणंही ‘दिल दिल’ नावानं उतरलं. पण मुळात हिंदी चित्रपट कधी आला कधी गेला कळलंच नाही. अर्थातच हे गाणं फार लोकांपर्यंत पोहोचलं नाही. पण यातली सरगम आणि बोलांचा वापर ऐकावाच असा. हरिहरननी गायलेलं ‘सुन री सखी’ हे ‘हम से है मुकाबला’मधलं गाणंही ऐकावंच असं या सदरात मोडणारं. जरूर ऐका. रेहमान सरांची फेज १ जागवण्यासाठी ही दोन गाणी पुन्हा एकदा ऐकलीच पाहिजेत.

Story img Loader