परवा त्या आपल्या ‘योयो’चे एक गाणे ऐकत होतो.. ‘इसे केहेते है हिप हॉप हिप हॉप.. ’ तसा मी योयोचा चाहता वगरे अजिबात नाही; पण त्याची काही गाणी (जसे ‘अंग्रेजी बीट’, ‘मनाली ट्रॅन्स’) त्यांच्या प्रोग्रॅमिंगसाठी (संगीत संयोजन) आवडतात. त्याच्या लिरिक्समध्ये ब्रेक्स, यमक वापरण्याची पद्धत कधी कधी वेगळी असते खरी, पण तरीही त्यातल्या काव्याकडे माझे लक्ष जात नाही कधी (आणि जात नाही तेच बरे आहे!). परवा का कोण जाणे, लक्ष गेले, तर त्या ‘इसे केहेते है..’मध्ये पट्ठय़ा म्हणतो, ‘मं ग्रॅमी ले आउंगा!’. एकूणच साहेबांच्या महत्त्वाकांक्षेला सलाम!! देव यांना (ग्रॅमी देवो ना देवो, पण किमान) सुबुद्धी देवो. (मजा म्हणून हे गाणे लक्षपूर्वक ऐकाच!)
पण त्यानिमित्ताने हे ग्रॅमी आहे तरी काय? ज्यांना माहीत नाही त्यांच्या साठी- ग्रॅमी अॅवॉर्ड हा संगीत आणि ध्वनिमुद्रण क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जाणारा जगातील सर्वोच्च मानला जाणारा असा पुरस्कार आहे. ग्रॅमीला संगीतातील ऑस्कर असेही म्हणतात. हे अॅवॉर्ड अमेरिकेच्या ‘नॅशनल अॅकॅडमी ऑफ रेकॉìडग आर्ट्स अँड सायन्स’ने १९५८ साली चालू केले. आजपर्यंत भारताच्या खिशात ८ ग्रॅमी पुरस्कार पडले आहेत. या वर्षी अजून दोन कलाकारांनी हे अॅवॉर्ड पटकावून भारतीयांची छाती गर्वाने फुगवली आहे. एक अॅवॉर्ड नीला वासवानी हिला ‘बालकांसाठीचा सर्वोत्तम अल्बम’ या कॅटॅगरीत मिळाले. तिच्या ‘आय अॅम मलाला’ या श्राव्य पुस्तकासाठी (audiobook) हा पुरस्कार मिळाला. तर दुसरे ग्रॅमी ‘बेस्ट न्यू एज म्युझिक’ या गटात रिकी केज याला मिळाले. त्याने साऊथ आफ्रिकन सहकलाकार वॉल्टर केलर्मनबरोबर काढलेल्या ‘विंड्स ऑफ संसारा’साठी हे ग्रॅमी मिळाले. ‘विंड्स ऑफ संसारा’मध्ये दोन गाणी आहेत- ‘लाँगिंग’ आणि ‘महात्मा’. दोन्हीमध्ये सांगीतिक दृष्टीने फार असे काही वेगळेपण नसले तरी त्यांचे ध्वनी-मिश्रण अत्यंत सुंदर आहे. मुळात शांती आणि सकारात्मकता या दोन भावना मनात जागृत करण्यासाठी या अल्बमची निर्मिती झाली आहे आणि या प्रयत्नात हे दोन कलाकार शंभर टक्के यशस्वी झाले आहेत.
भारताच्या खात्यात सर्वात पहिले ग्रॅमी आले, ते स्वर्गीय पंडित रविशंकर यांच्यामुळे. १९६७ मध्ये. अमेरिकन व्हायोलिनवादक येहुदी मेन्युईन यांसोबत त्यांनी ‘वेस्ट मीट्स ईस्ट’ हा जुगलबंदीचा नावीन्यपूर्ण कार्यक्रम सादर केला होता. आत्तापर्यंत सर्वाधिक ग्रॅमी मिळवणारे भारतीयही पं. रविशंकरच आहेत! १९६७नंतर १९७२ मध्ये ‘कॉन्सर्ट फॉर बांगलादेश’साठी हे अॅवॉर्ड त्यांना पुन्हा मिळाले. बांगलादेशी निर्वासितांसाठी निधी उभारावा या हेतूने रविशंकरजी यांनी त्यांचे मित्र जॉर्ज हॅरिसन (‘बीटल्स’ या पराकोटीच्या प्रसिद्ध म्युझिक बँडचे गिटारवादक) यांच्याशी संपर्क साधला. या दोघांच्या कल्पनेतून न्यूयॉर्क येथील मॅडिसन स्क्वेअर गार्डनवर कार्यक्रम झाला. त्याचा पुढे अल्बमही झाला. रविशंकरजी आणि उस्ताद अली अकबर खानसाहेब (सरोद) यांची जुगलबंदी, अल्लाहरखाँ साहेब (तबला) यांच्या साथीत खमाज रागात मस्त रंगली आहे. हा पूर्ण कार्यक्रमच मस्त आहे. रवीजींना तिसरे ग्रॅमी मिळाले त्यांच्या वयाच्या ८० व्या वर्षी (सन २००१) कन्या अनुष्का शंकरसोबत केलेल्या कारनेगी हॉलइथल्या ‘फुल सर्कल’ या सादरीकरणाला.
जगभरात तबल्याचे नाव ताजमहालपेक्षाही जास्त प्रचलित करणाऱ्या उस्ताद झाकीर हुसेन यांनाही आजवर दोनदा ग्रॅमी अॅवॉर्ड मिळाले आहेत. दोन्ही वेळेला उस्तादजी यांनी जगातल्या विविध तालवादकांबरोबर तबलावादन आणि पढन्त केली आहे. मिकी हार्ट या कलाकाराच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्लॅनेट ड्रम (१९९२) आणि ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट (२००९) या दोन अल्बम्ससाठी झाकीरभाईंना ग्रॅमी मिळाले आहे. १९९२ ला झाकीरभाईंबरोबर विक्कु विनायकम हे दिग्गज घटमवादकही होते. या दोन्ही अल्बम्समध्ये सर्व तालवादकांनी एकत्रित येऊन जो धुमाकूळ घातला आहे; तो ऐकण्या आणि पाहण्यासारखा आहे.
गिटार आणि विचित्र वीणा या दोन वाद्यांचा सुरेख मेळ साधून ‘मोहन-वीणा’ वाद्य तयार करणाऱ्या पंडित विश्वमोहन भट्ट यांनाही १९९४ मध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळाला. ‘अ मीटिंग बाय द रिव्हर’ या अल्बमसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. यात मोहन वीणा आणि रे कूडर यांनी वाजवलेली वेगळ्या धाटणीची स्लाइड गिटार यांचा सुरेल मेळ आहे. अतिरिक्त कंप असलेले वादन, गिटारच्या लाकडाचाही केलेला वापर, कॉर्ड वादन.. सहीच! मोहन-वीणासुद्धा नेहमीप्रमाणेच गोड आणि सुरेल.
जगभरात भारताचे नाव करणाऱ्या कलाकारांच्या यादीत ए आर रेहमानचे नाव नाही आले तरच नवल! २०१० साली ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटाच्या ‘जय हो’ गाण्यासाठी आणि पाश्र्वसंगीतासाठी असे दोन ग्रॅमी मिळवून सरांनी दणक्यात हजेरी लावली. ‘स्लमडॉग..’विषयी आत्ता फार बोलत नाही; पुढे कधीतरी हा विषय निघेलच. जाता जाता एवढेच सांगेन, की ‘जय हो’ सोडून इतरही अनेक गोष्टी ‘स्लमडॉग..’ या आल्बममध्ये आहेत; आणि त्या फारच उच्च आहेत!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा