नव्या पिढीचा गायक, संगीतकार, रिअॅलिटी शोचं व्यासपीठ गाजवणारा, रॉक म्युझिक बॅण्डमध्ये झोकून देऊन गाणारा आणि शास्त्रीय संगीताच्या तानाही तितक्याच नजाकतीनं घेणारा हरहुन्नरी कलाकार जसराज जोशी सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!
मागच्या आठवडय़ात हिंदी चित्रपटांच्या पाश्र्वसंगीताची प्ले लिस्ट पाहिली. आता हॉलीवूड बॅकग्राउंड स्कोअरबद्दल. अर्थात आजची प्ले लिस्ट हॉलीवूड BGM ची. आपल्याकडे गाणी हा जसा चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे, तसा तो तिकडे हॉलीवूडमध्ये नाही. त्यामुळे तिकडे चित्रपटाचे संगीत म्हणजेच पाश्र्वसंगीतच असते. प्रत्येक चित्रपटासाठी वेगळे बॅकग्राउंड म्युझिक अर्थात BGM करायची पद्धतच तिकडे पूर्वापार चालत आलेली आहे. आपण यू टय़ूबवर नुसते Hollywood BGM असे टाकायचा अवकाश, प्रत्येक चित्रपटाच्या पूर्ण लांबीच्या म्हणजे दीड-दोन तासाच्या OST (ओरिजिनल साउंड ट्रॅक)पासून त्यामध्ये वापरण्यात आलेल्या छोटय़ा छोटय़ा थीम्सचा महासागरच आपल्यासमोर येऊन ठाकतो! आजची प्ले लिस्ट म्हणजे त्या समुद्रातील केवळ काही थेंब समजावेत. केवळ काही उदाहरणे.
जॉन विल्यम्स
जुरासिक पार्क, हॅरी पॉटर, शिंडलर्स लिस्ट, जॉज्, स्टार वॉर्स, सुपरमॅनसारख्या अनेक ‘क्लासिक्स’ला संगीत देणाऱ्या जॉन विल्यम्सची स्टाइलसुद्धा क्लासिकच आहे. पारंपरिक सिंफनी पद्धतीचा जास्तीत जास्त वापर जॉन विल्यम्स यांच्या संगीतात सुंदररीत्या केलेला दिसून येतो. ‘िशडलर्स लिस्ट’चे संगीत तर कमालच आहे.
जेम्स हॉरनर
हॉलीवूडमध्ये एकूणच खूप सिंफनी ऐकू येते. आपल्याकडे जसे शास्त्रीय संगीत हा पाया आहे, तसे तिकडे सिंफनी हा संगीताचा पाया आहे, त्यामुळे ती वगळून तिकडे अपवादानेच संगीत बनते. जेम्स हॉरनर यांचा भर हा लक्षात राहाणाऱ्या चालींच्या सिंफनीवर जास्त असतो. चाल पुढे घेऊन जाणारे एक मुख्य वाद्य – जसे बॅगपाइप, बासरी, ओबो, क्लेरिनेट असते किंवा गायक/ गायिकेचा आवाज, उत्तरोत्तर खुलत जाणाऱ्या चाली, स्वरांमधले विलक्षण सुंदर बदल आणि मागे चालू असलेल्या िस्ट्रग्स (व्हायोलिन्सचा ताफा), ब्रास (ट्रम्पिस्ट, सॅक्सफोन वगरे वाद्यांचा ताफा) या मिश्रणामुळे जेम्स हॉरनरचे संगीत नेहमीच परिणाम करते.
या संगीताचे वैशिष्टय म्हणजे हे चित्रपटाचा आनंद तर द्विगुणीत करतेच, पण त्याच्या थीम्स नुसत्या ऐकण्यासाठीही उत्तम ठरतात. उदाहरणार्थ ‘टायटॅनिक’ची थीम.. ज्याचे गाणेही आहे (माय हार्ट विल गो ऑन). जेम्स हॉरनरच्या आवडलेल्या ट्रॅक्सपकी काही म्हणजे- ‘ब्यूटिफुल माइंड’ चित्रपटातील ‘कॅलिडोस्कोप ऑफ मॅथेमॅटिक्स’ ही थीम, ‘ट्रॉय’ची मुख्य थीम, ‘अपोलो १३’ची ‘री-एंट्री अँड स्प्लॅशडाऊन’, ‘ग्लोरी’ चित्रपटाची शेवटची थीम आणि ‘ब्रेव्ह हार्ट’ची गाजलेली बॅगपाइपरची थीम.
हॅन्स झिमर
हा जर्मन संगीतकार (जर्मन उच्चार – हान्स त्सिमर) BGM मधला गब्बर! अतिशय कमी सूर वापरून, चालीपेक्षा ध्वनीवर आणि ध्वनीमुळे होणाऱ्या परिणामावर जास्त भर देणाऱ्या प्रयोगशील हॅन्स झिमरचे जगभरात कोटय़वधी फॅन्स आहेत. विविध आवाजांच्या, कंपनांचा विचार करून भरीव ऑर्केस्ट्राच्या साहाय्याने प्रेक्षकांच्या उत्कंठेशी खेळणे म्हणजे या सरांच्या डाव्या हातचा मळ! हॅन्स झिमरचे पाश्र्वसंगीत हे चित्रपटापासून वेगळे करताच येत नाही. एखाद्या मध्यवर्ती भूमिके एवढेच महत्त्व या संगीतालाही असते.
चित्रपटाच्या यशात या संगीताचा फार मोठा वाटा असतो. काही उदाहरणे- पायरेट्स ऑफ कॅरेबियन- ‘वन डे’ ही थीम, ‘मिशन इम्पॉसिबल- २’ मधली ‘इंजेक्शन’, ‘इन्सेप्शन’मधली ‘ड्रीम इज कोलॅप्सिंग’ आणि शिखर म्हणजे ‘ग्लॅडिएटर’, ‘डार्क नाइट’, ‘इंटरस्टेलर’चे अख्खे साउंडट्रॅक. याशिवाय ‘गॉडफादर’ची गाजलेली टय़ून (निनो रोटा.. ज्याच्यावरून ‘अकेले हम अकेले तुम’ चित्रपटातले ‘राजा को रानी से प्यार हो गया’ गाणे बेतले आहे) आणि ‘शटर आयलँड’ (संकलन- रॉबी रॉबर्टसन)चे पाश्र्वसंगीतही परिणामकारकतेत कुठेच मागे पडत नाही.
जसराज जोशी -viva.loksatta@gmail.com