vn12नव्या पिढीचा गायक, संगीतकार, रिअ‍ॅलिटी शोचं व्यासपीठ गाजवणारा, रॉक म्युझिक बॅण्डमध्ये झोकून देऊन गाणारा आणि शास्त्रीय संगीताच्या तानाही तितक्याच नजाकतीनं घेणारा हरहुन्नरी कलाकार जसराज जोशी सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!
शास्त्रीय संगीतामधील दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वांची आठवण या आठवडय़ात होतेय. ८ एप्रिलला कुमारजींचा जन्मदिवस आणि आज (१० एप्रिल) किशोरीताईंचा वाढदिवस.
कुमारजी.. पंडित कुमार गंधर्व.. अभिजात संगीतात आजवर चालत आलेला धोपट मार्ग न स्वीकारता गायकीची एक वेगळी वाट, वेगळे वळण शोधून दाखवणारे महान नाव. राग-मांडणीची आधी कधीही न वापरली गेलेली पद्धत, एकापेक्षा एक सुंदर बंदिशी, आलापांचे, सरगमचे आणि विशेष करून तानांचे लहान लहान खंड, रागाचे अंतरंग, सौंदर्य उलगडून दाखवणारी आणि त्यातून जणू शिकवणारी गायकी!
या सर्व अलंकारांनी नटलेली कुमारजींची मैफल प्रत्यक्ष अनुभवता आली नाही याचे शल्य नेहमीच मनात राहील; पण ती उणीव भरून काढायला त्यांची अनेक गाजलेली रेकॉर्डिग्स उपलब्ध आहेत. भाटियार, मालगुंजी, जौनपुरी, बिलासखानी तोडी, नंद, श्री, बागेश्रीसारख्या प्रस्थापित रागांबरोबरच गौरी-बसंत, लागण गांधार, गांधी मल्हार, धनबसंतीसारखे अनवट राग ऐकताना आजही खूप शिकता येते. आघाडीचा अभिनेता आस्ताद काळेने म्हणजे माझ्या गुरुबंधूने मला दिलेल्या एका कॅसेटमधले कुमारजींचे भीमपलास आणि मालकंस हे राग मी सगळ्यात जास्त ऐकलेले.
‘भीमपलास’मध्ये विलंबित एकतालातली – ‘नाद सो जानू रे..’ साथीला वसंतराव आचरेकारांचा संतत चालणारा ठेका, नावापुरतीच हार्मोनियम. कारण ही गायकी हार्मोनियममध्ये पकडता येणे तसे अशक्यच. मग द्रुत तीनतालातली ‘जावा हु देसा’.. दुसऱ्या बाजूला मालकंस.
‘मालकंस’मधले विलंबित तीन तालातले ‘आए हो..’, नंतर द्रुत तीन तालातले ‘फूल बेदाग ये बना..’ त्यातली ती अवरोहाची म्हणजे वरून खाली येणारी सळसळती तान.. अहाहा! मग मध्य लय तीन तालातील- ‘कैसो निकोला..’ म्हणजे जलद लयीच्या बंदिशीनंतर धिम्या गतीची बंदिश! म्हणजे इथेही विलंबितपासून जलद गतीकडे जाण्याची परंपरा मोडीत काढलेली. नंतर येणारी द्रुत एक तालातील ‘छाब तेरी छाब तेरी’, द्रुत तीन तालातील ‘देखो अजब खेल है ये..’ आणि सरते शेवटी मध्य लय एक तालातील, म्हणजे एकूण गायलेल्या बंदिशींपैकी सर्वात संथ लयीतली- ‘आनंद मान मोरा पिया जो घर आयो’ त्यात तो हळूच डोकावून जाणारा ‘पंचम’. वा वा वा! त्या पंचमने खरेच आनंद मना होऊनी जातो.. याविषयी थोडक्यात सांगायचे झाल्यास ‘मालकंस’ या रागात पंचम (‘प’ हा स्वर) खरे तर लागत नाही, तो वज्र्य आहे. पण कुमारजींनी तो वापरून ‘मालकंस’ला अजूनच सुंदर करून ठेवले आहे.
‘मालकंस’मध्ये अधिकृतरीत्या ‘पंचम’ आणि ‘ऋषभ’ वापरण्यासाठी ‘संपूर्ण मालकंस’ या रागाची निर्मिती झाली असावी. हा राग मात्र मी प्रत्यक्ष लाइव्ह मैफलीत ऐकला आहे.. किशोरीताईंचा! अजूनही आठवून अंगावर काटा येतो. पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंदिरात त्यांनी गायलेला अभोगी अंगाचा ‘बागेश्री’ आणि नंतर हा ‘संपूर्ण मालकंस’.. शांत सुरुवात, सुईमध्ये लीलया दोरा ओवावा तसा सुरांचा लगाव आणि अशा शांत गायकीत एकदम वरच्या षड्जाला स्पर्श.. ब्रह्मानंदी टाळी! काही छोटय़ा ताना आणि मग अशी मोठी सणसणीत तान, की काळजाचा ठोकाच चुकावा. किशोरीताईंचे गाणे ऐकणे म्हणजे जणू देवाची प्रार्थनाच!
किशोरीताईंनी गायलेल्या माझ्या ‘ऑल टाइम फेव्हरेट’मध्ये सर्वात जास्त ऐकला जाणारा राग म्हणजे भूप. छोटय़ा आकाराचा असल्याने विस्तार करायला अवघड असा हा ‘भूप’ गावा तो किशोरीताईंनीच. विलंबित तीन तालामधला ख्याल- ‘प्रथम सूर साधे’ आणि नंतर मध्य लय ‘सहेला रे’ .. भन्नाट! तशीच हंसध्वनी या छोटय़ा रागातली ‘गणपत विघ्न हरण’ ही बंदीश मी परत परत कितीही वेळा ऐकू शकतो. याशिवाय तोडी, बागेश्री, नंद, सोहनी भटियारसारखे भरजरी राग माझ्या नेहमीच ऐकण्यात असतात.
कुमारजी आणि किशोरीताई या दोघांच्या गायकीमध्ये एक साम्य नक्की आहे. यांना ऐकताना आपल्याला सतत जागृत, सावध असावे लागते. थोडेसे लक्ष विचलित झाले तर तुम्ही एखाद्या सुंदर जागेला, ओळीला, तानेला मुकू शकता. त्यामुळे यांना परत परत ऐकल्यावाचून गत्यंतरच नसते. यांच्या रागदारीचीच प्ले लिस्ट आठवडाभर पुरेल असे वाटतेय. उपशास्त्रीय गायकीविषयी बोलू या पुढच्या आठवडय़ात.

हे  ऐकाच.. भिन्न षड्ज
खरे तर ही आवर्जून ऐकायची नाही, तर पाहायची गोष्ट आहे. किशोरीताईंच्या गायकीच्या, त्यांच्या विचारांच्या आणखी जवळ जायचे असेल तर ‘भिन्न षड्ज’ हा अमोल पालेकर- संध्या गोखले यांनी बनवलेला माहितीपट चुकवू नये असाच आहे. ताईंवर झालेले माईंचे म्हणजे त्यांच्या आईचे – मोगूबाई कुर्डीकरांचे संस्कार, विचारांची जडणघडण, ताईंचे सांगीतिक विचार, सुराविषयी, स्वराविषयी, श्रुतींविषयी ताईंचे म्हणणे, संगीताकडे पाहण्याचा दृष्टिकोन, समकालीन दिग्गज कलावंतांचे आणि ताईंच्या शिष्यांचे ताईंविषयीचे विचार, अनुभव हे सगळे जाणून घेण्यासाठी ही डॉक्युमेंट्री नक्की पाहाच.
जसराज जोशी -viva.loksatta@gmail.com