vv08नव्या पिढीचा गायक, संगीतकार, रिअ‍ॅलिटी शोचं व्यासपीठ गाजवणारा, रॉक म्युझिक बॅण्डमध्ये झोकून देऊन गाणारा आणि शास्त्रीय संगीताच्या तानाही तितक्याच नजाकतीनं घेणारा हरहुन्नरी कलाकार जसराज जोशी सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!
मागच्या आठवडय़ात आपण कोक स्टुडिओ मध्य-पूर्व अशिया आणि आफ्रिकेमधील संगीताचा आनंद घेतला. या वेळी बघू या पाकिस्तानातील कोक स्टुडिओची प्लेलिस्ट. तसे पाहता आपल्या आणि पाकिस्तानाच्या संगीतात फार फरक नसला तरी पाकिस्तानात आहे तेवढे सूफी संगीत आपल्याकडे नाही. किंवा तिकडे बँड संस्कृतीसुद्धा आपल्यापेक्षा थोडी जास्त आहे. मध्य-पूर्व आशियाचा प्रभावसुद्धा आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या संगीतात वेगळेपण नक्कीच आहे. उदाहरणार्थ- बलुचिस्तान प्रांतातील लोकगीत गायक अख्तर शनल झहरीबरोबर कोमल रझवी आणि मोमिन दुर्रानी या गायकांनी केलेले ‘वश्मल्ले’ हे गाणे. हा लोकगीत गायक काही औरच आहे. तंबोरा/ एकतारीसारखे वाद्य हातात घेऊन गाताना नृत्य करणे हा जणू त्यांच्या कलेचा अविभाज्य भाग आहे. तसेच मध्ये मध्ये येणारे रॅपसुद्धा (अर्थात बलुची भाषा असल्याने अर्थ लागण्याचा संबंधच नाही..) मजेशीर आहे. का कोण जाणे; या संगीतात आपल्याकडच्या नैर्ऋत्येकडच्या राज्यांतील (नॉर्थ-ईस्ट) संगीताची आठवण येते. खरे तर हे प्रांत एकमेकांपासून खूप दूर आहेत, भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ाही.. तरीही हे साम्य दिसते. कोमल रझवी ही गायिका आणि अख्तर शानल यांचे अजून एक मजेदार गाणे म्हणजे ‘दाना पा दाना पा’ यात तर अख्तरचा एक साथीदार फक्त नृत्य करताना दिसतो, गात-वाजवत काहीच नाही! या गाण्यात मात्र अधून मधून हिंदी आहे. नंतर दमादम मस्त कलांदर हे गाणे पण फ्यूजन स्टाइल मध्ये येऊन जाते. तेही विशेष आहे.
फ्यूजन म्हटल्यावर शफ्कात अमानत अली हा गायक विसरून चालणारच नाही. याचे ‘जोश’ या बँडबरोबरचे ‘माही वे’ हे पंजाबी पद्धतीचे गाणे छान आहे. यात यमन रागाच्या चलनात दरबारी रागाची मुच्र्छना (सा बदलून राग गाणे) मस्त जमली आहे. पाकिस्तानचा अजून एक उत्तम तयारीचा गायक म्हणजे जावेद बशीर. याची विविध कलाकारांसोबत असलेली ‘याद’, ‘अंबुवा तले’ आणि ‘चरखा’ ही गाणी फार सुंदर आहेत.
कोक स्टुडिओमध्ये ठुमरी आणि कव्वाली पद्धतीची गायकीसुद्धा वेगळ्या पद्धतीने सादर करण्यात आली आहेत. जसे नियाझी बंधू यांची सुमधुर अशी ‘खेडिया दे नाल’ आणि ‘लाई बेकद्रा नाल यारी’ ही गाणी किंवा फरीद आयाझ आणि अबू मोहम्मद यांनी गायलेली ‘रंग’ ही काहीशी ‘होरी’ या गायन प्रकाराची आठवण करून देणारी कव्वाली.
कोक स्टुडिओमधील सर्वात लक्षवेधक दृक्श्राव्य अनुभावांपैकी एक म्हणजे ‘आरिफ लोहार’ हा लोकगीत गायक. ‘चिमटा’ हे वाद्य वाजवत, आपले लांब केस मोकळे सोडून, भयंकर तल्लीन अवस्थेत गाणारा हा कलाकार वेड लावून जातो. मीशा साफी या गायिकेबरोबर त्याने गायलेले ‘जुगनी जी’ हे गाणे तर भारतातसुद्धा सुप्रसिद्ध आहे, ते आपल्या ‘कॉकटेल’ या चित्रपटात वापरलेसुद्धा आहे. या आरिफ लोहारचे अजून एक भन्नाट गाणे म्हणजे ‘मीरझा साहेबान’. हे गाणे गाताना त्याच्या अंगात आले आहे असा भास होतो. या गाण्याच्या संगीत संयोजनात थेट हान्स झिमरचा प्रभाव जाणवतो. काहीसा भीतिदायक, असा काही तरी वेगळाच असर आहे या गाण्याचा.. अर्थ कळला असता तर असर अजून झाला असता खरे तर! बघू; काही पंजाबी मित्रांना अर्थ विचारून बघतो. कळला तर पुढच्या आठवडय़ात सांगीनच.
                                          
हे  ऐकाच.. : छाप तिलक
कोक स्टुडिओ पाकिस्तान या कार्यक्रमातील सर्वात सुरेल कॉम्बिनेशन, मणिकांचन योग म्हणजे – राहत फतेह आली खान साब आणि आबिदा परवीन यांचे सहगायन! या दोघांनी मिळून गायलेले ‘छाप तिलक’ हे आवर्जून अनुभवावे असेच आहे. कोक स्टुडिओसाठी या गाण्याचा चेहरामोहराच बदलून गेलाय. लय आध्र्यावर आणण्यात आली आहे. एरवी जलद गतीत गायले जाणारे हे गाणे अत्यंत लाईट, तेही अशा दोन गायकांच्या महान गायकीने नटलेले! वाहवा वाहवा! असेच अजून एक वेगळे कॉम्बिनेशन म्हणजे रॉक सिंगर अली अझमत आणि राहत साहेबांचे ‘गरज बरस सावन घिर आयो’ आहाहा! खान साहेबांचा जो काय आवाज लागलाय, त्यांनी जे काही तोडलंय.. क्या बात है! आवर्जून ऐका.
जसराज जोशी -viva.loksatta@gmail.com