vn12नव्या पिढीचा गायक, संगीतकार, रिअ‍ॅलिटी शोचं व्यासपीठ गाजवणारा, रॉक म्युझिक बॅण्डमध्ये झोकून देऊन गाणारा आणि शास्त्रीय संगीताच्या तानाही तितक्याच नजाकतीनं घेणारा हरहुन्नरी कलाकार जसराज जोशी सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!
मे महिना म्हणजे भयंकर उकाडय़ाचा आणि त्यामुळे कोल्ड िड्रक्सचा खप भयंकर वाढवणारा महिना. या कोल्ड िड्रकच्या एका साधारण आकाराच्या बाटलीत म्हणे तब्बल पाच-सात चमचे साखर असते. या शीतपेयांच्या कारखान्यांमुळे भूजल पातळीसुद्धा कमी होतेय म्हणे. थोडक्यात बघायचे झाले तर याचे तोटेच जास्त! एक कोल्ड िड्रक मात्र असे आहे, ज्यामुळे जागतिक संगीताला खूप फायदा झाला आहे. ते म्हणजे ‘कोक’! फ्युजन हा मूळ गाभा ठेवून जगातल्या विविध क्षेत्रांमधील, विविध प्रकारचे, ढंगांचे संगीत एकाच व्यासपीठावर आणून ‘कोक स्टुडिओ’ या क्रांतिकारक कार्यक्रमाने वर्ल्ड म्यूझिकमध्ये कमालीची भर घातली आहे. भारतात एम टीव्हीवर प्रदíशत होणारा हा कार्यक्रम पहिल्या सत्रात (सीझन १) श्रोत्यांच्या पसंतीला तितकासा उतरला नाही. दुसऱ्या सीझनमध्ये मात्र त्याने धुमाकूळ घातला. २०११ मध्ये भारतात या कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यापूर्वी हा कार्यक्रम पाकिस्तान आणि त्याहीआधी मध्य-पूर्व आशिया आणि आफ्रिकेत सुरू झाला होता. आजच्या प्ले लिस्टमध्ये कोक स्टुडिओच्या मध्य-पूर्व आशिया आणि आफ्रिकेतील काही निवडक नमुनेदाखल परफॉर्मन्सेसबद्दल गप्पा.
हे व्हिडीओ यू टय़ूबवर तर आहेतच आणि कोक स्टुडिओ आपल्या वेबसाइटवर ते डाउनलोिडगसाठी उपलब्धही करीत असते. आफ्रिका आणि अरब संगीत हे भारतीय किंवा पाश्चिमात्य संगीताएवढे श्रीमंत नसले तरी त्यात वेगळेपण नक्कीच आहे. माझ्या मते तिकडे संगीताचा प्रवास हा लोकगीत, शास्त्रीय संगीत- उपाशास्त्रीय संगीत – भावगीत, पॉप, सिनेगीत असा न होता थेट लोकगीत ते पॉप असा झाला असावा. त्यामुळे तिकडचे संगीत हे जास्त नसर्गिक, कच्चे असे आहे. त्यात वेगवेगळ्या, आकर्षक, सुंदर आवाज असणाऱ्या तंतुवाद्यांचा आणि तालवाद्यांचा भरपूर वापर दिसतो. तिथल्या गायकीची पद्धतही निराळी.. गाऊन बघायला गेलो तर गल्याला गाठच पडेल अशी. चालींमध्ये फार वैविध्य नसले तरी अशा इतर गोष्टींमुळे हे संगीत मजेशीर बनते. त्यातून आसपासच्या इतर संगीतकारांनी हातभार लावला, तर सोने पे सुहागा!
काही उदाहरणे- मोहम्मद हमाकी हा इजिप्तचा प्रसिद्ध पॉप सिंगर. याने सॅण्डल या टर्कीच्या गायकाबरोबर केलेले we eftakart  हे गाणे- पियानोबरोबर स्ट्रिंग्सचा लोभसवाणा वापर आणि वेगळ्या पद्धतीचे तालवाद्य.
याच हमाकीने ब्रिटनच्या jay sean या प्रसिद्ध हिपहॉप आर्टस्टिसोबत केलेले ‘मुस्तफा मुस्तफा’ हे गाणेसुद्धा मस्त आहे. त्यात ब्रासचा केलेला वापर आणि jay sean   ने केलेले जलदगतीतले रॅप मजेदार आहे.Jay sean  ने आपल्या ‘डाउन’चे एका वेगळ्याच प्रकारच्या गाण्यात रूपांतर केले आहे. ते   shamma hamdan या अरबी गायिकेला बरोबर घेऊन. वर उल्लेख केलेल्या जिप्सी ब्रास बॅण्डचे अजून एक digui digui ya rababa हे गाणेही मजेशीर आहे. जिप्सी गिटारवादन करणारा गायक   jose galves   ने nancy ajram या अरेबियन गायिकेबरोबर केलेल्या  hali hal  या आणखी एका गाण्यातही ब्रासचा उत्तम वापर दिसतो.
अरेबियन तंतुवादकांचा, गायकांचा आणि दरबुका सारख्या तालवाद्यांचा एक संच  Chehade Brothers  नावाने प्रसिद्ध आहे. त्यांचे कोक स्टुडिओ कार्यक्रमातले -fok el nakhel हे गाणे फारच धुमाकूळ घालणारे आहे. असाच धुमाकूळ घातलाय फ्लोरिडा हय़ा जगप्रसिद्ध हिप हॉपवाल्याने.. लेबनीज गायिका myriam fares बरोबर ‘वाइल्ड वन्स’ हय़ा गाण्यात. कधी कधी काहीसे एकसुरी वाटणारे अमेरिकन हिपहॉप अरेबियन थाटात आल्याने मात्र एकदम वेगळे वाटते.
असेच एकसुरी वाटणारे आफ्रिकन डॅन्स म्युझिकसुद्धा कोक स्टुडिओमध्ये नावीन्य घेऊन येते. उदाहरणार्थ- divine sorrow हे आफ्रिकेमधल्या प्रमुख देशातल्या पॉप स्टार्सनी एकत्र येऊन एड्सला आव्हान देण्यासाठी केलेले गाणे. शांततेत सुरू होणारे हे गाणे एकदम कधी आपल्याला डॅन्सकडे घेऊन जाते हे आपल्यालाच कळत नाही. Teddy afro च्या togetherness  बद्दलही असेच म्हणता येईल. यातले रॅपसुद्धा बऱ्यापैकी कळते, कंटाळवाणे वाटत नाही. जेवढे कळले त्यावरून हा रॅपर एकीविषयी बोलतो आहे. कोक स्टुडिओने हेच तर घडवून आणले आहे  – ‘एकी’.

हे  ऐकाच..
आफ्रिकन, अरेबियन आणि कुठली कुठली भाषा असल्याने हय़ातल्या काव्याकडे (इंग्लिश सोडल्यास) लक्ष जाण्याची वेळच येत नाही, एका गाण्यात मात्र लक्ष जाते, कारण हय़ात टर्कीबरोबर पाकिस्तानी भाषा म्हणजेच उर्दू-हिंदी आहे. ‘इश्क़ किनारा’ असे हय़ा गाण्याचे नाव आहे. हय़ात वाजवली गेलेली दोन तंतुवाद्ये  फार कमालीची गोड आहेत. एक पíशयन संतूर असावे, दुसरे तर दिसायलाच एवढे भन्नाट सुंदर आहे, वाजायलाही तितकेच सुंदर. बाकी गाणे तसे ठीकठाकच आहे, पण या दोन वाद्यांनी आणि वादकांनी या गाण्याचे सोने केले आहे. नक्की ऐका. 
जसराज जोशी – viva.loksatta@gmail.com

Story img Loader