viv22नव्या पिढीचा गायक, संगीतकार, हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!
तो चिरतरुण आवाज म्हणजे माझ्या मते, भारताच्या संगीत इतिहासातील सर्वात अष्टपैलू गायिका.. सर्वात जास्त गाणी गाणारी गायिका असा विक्रमही या संगीत सम्राज्ञीच्या नावावर आहे.. नाव अर्थातच आशा भोसले. ८ सप्टेंबरला आपल्या आशाताईंचा ८२वा वाढदिवस झाला. आशाताईंनी तब्बल १२ हजारपेक्षाही जास्त गाणी गायली आहेत म्हणे आजवर! अर्थात ही सगळीच्या सगळी गाणी कुठल्या एका प्ले लिस्टमध्ये बसणे अशक्यच आहे, म्हणून आज सादर करत आहे आशाताईंच्या गायकीतील मला दिसलेले बारा रंग, बारा रस, बारा सूर.
सुरुवातीला अर्थातच कुठल्याही पिढीमधल्या कुणाही तरुणाला वेड लावणारा आशाताईंचा ट्रेडमार्क असलेले चार रंग..
१ – कॅबरे गाणी. काहीशी गीता दत्त यांच्या गायकीतून प्रेरणा घेऊन, पण त्यात स्वत:चा बाज टाकून, त्यात पाश्चात्त्य गायकीचा सुंदर वापर करून बनवण्यात आलेली ही अफलातून गायकी. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दुनिया में लोगो को’, ‘हुस्न के लाखो रंग’, ‘आज की रात’ इत्यादी.. चित्रपटामध्ये खास आशाताईंसाठीच सिच्युएशन तयार करून ही गाणी घातली जायची, एवढे या गाण्यांचे सर्वत्र वेड होते.
२ – जसे हिंदीमध्ये कॅबरे, तशीच मराठीमध्ये लावणी. ‘या रावजी बसा भावजी’ हे आशाबाईंच्या आवाजात ऐकले की अंगावर एक वेगळाच शहारा येतो. वेगळीच ओढ निर्माण होते. ‘रेशमाच्या रेघांनी’चीसुद्धा तीच गत.
३ – तरुणाईला वेड लावणारा अजून एक रंग, रस म्हणजे आवाहन करणाऱ्या या गाण्यांचा.. ‘ये है रेशमीझुल्फो का अंधेरा..’, ‘आओ हुजुर तुम को’, ‘अब जो मिले है तो’, ‘आओ ना गले लागाओ ना..’, ‘रात अकेली है’पासून मराठीमधल्या ‘मलमली तारुण्य माझे’, ‘रुपेरी वाळूत’, ‘शारद सुंदपर्यंत..’ आवाहन करणारा, आपल्याकडे बोलावणारा आशाचा आवाज. वेड लागणार नाही तर काय? परत या रंगातल्या वेगवेगळ्या गाण्यांमधे छटासुद्धा किती.. कधी सौम्य, कधी आक्रमक, कामुक तर कधी अगदी शुद्ध सात्त्विक!
४ – अशा या शृंगारिक आवाजाने परत परत बोलावावे म्हणून आपल्याला परत परत रुसावेसे वाटणारच ना! मग ‘ओ मेरे सोना रे’ किंवा ‘अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना’, ‘तू रूठा तो मैं रो दुंगी सनम, ‘ये लडका हाय अल्लाह’, ‘जाइये आप कहा जाएंगे’ वगैरे ऐकत ऐकत परत प्रेमात पडायचे. हाऊ रोमँटिक!
५ – राहुल अँड आशा. या जोडीने केवढी अजरामर गाणी दिली आहेत. विशेष करून गुलजारच्या साथीने. ‘दिल पडोसी है’मधली वेगळ्या वळणावरची गाणी, ‘मेरा कुछ सामान’, ‘रोज रोज डाली डाली’, ‘खाली हाथ शाम’, ‘दो नैना इक कहानी’ विषय कट.
६ – सोलो गाणी. मराठीमधली ‘घनरानी साजणा’, ‘सांज ये गोकुळी’, ‘ऋतू हिरवा’, ‘उषकाल होता होता’ ही वेगवेगळ्या भावाची मराठी गाणी. ‘जब चली ठंडी हवा’ ते ‘तनहा तनहा’, ‘याई रे याई रे’सारखी ‘रंगीला’मधली गाणी.. हा पण असा रंग आहे, ज्याच्या अनेक छटा आहेत.
७ – युगूल गीत. यामध्ये आशाताईंचा हात कोणीच धरू शकत नाही. रफीसाहेबांच्या गोड गळ्याबरोबर गाताना आशाताईंचा आवाज एक्स्ट्रा गोड होताना दिसतो. म्हणूनच ‘इशारो इशारो में’, ‘दीवाना हुवा बादल’, ‘अभी ना जाओ छोड कर’सारख्या क्लासिक्सपासून ‘ओ हसीना झुल्फोवाली’, ‘आजा आजा’सारख्या नटखट गाण्यांपर्यंत या सगळ्याच युगूल गीतांची गोडी कधीच कमी होत नाही.
८- किशोर कुमारबरोबरची आशाताईंची केमिस्ट्री तर फारच भन्नाट, केवढी व्‍‌र्हसटाइल! ‘छोड दो आंचल’, ‘पांच रुपैया बारा आना’, ‘आँखो में क्या जी..’ ही ब्लॅक अँड व्हाइट गाणी कुठे आणि ‘वादा करो नही छोडोगे तुम मेरा साथ’, ‘नही नही अभी नही’, ‘हवा के साथ साथ’सारखी मॉडर्न गाणी कुठे!
९. गजल – ‘उमराव जान’मधली सगळीच गाणी, त्यातही ‘इन आँखो की मस्ती के’, ‘ये क्या जगह है दोस्तो’, किंवा ‘मिराझ ए गजल’ या गुलाम अली साहेबांबरोबरच्या आल्बममधली ‘सलोना सा साजन है’, ‘करू ना याद मगर’, ‘अजीब मानस अजम्नबी था’, ‘दिल धडकने का सबब’ तसेच उल्लेख करावाच लागेल अशी ‘ऋतू हिरवा’मधली ‘भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले..’ हे गाणे फारच आवडते.
१०. नाटय़गीत – गजलचा जेवढा अभ्यास, जेवढी तयारी तेवढीच तयारी तेवढाच अभ्यास नाटय़ागीते गातानासुद्धा! ‘युवती मना’, ‘शुरा मी वंदिले’.. काय तयारी आहे! काय काय प्रकारचा रियाझ केला असेल यांनी?
११. भक्तिगीते – याला म्हणतात हरहुन्नरी. आशाताईंच्या आवाजातली लावणी आपल्याला जेवढी आवडते, तेवढीच त्यांनी गायलेली ‘ये गं ये गं विठाबाई’, आणि ‘जय शारदे वागीश्वरी’ ही भक्तिगीतेसुद्धा आवडतात.
१२. लोकगीते – आशाताई जेव्हा लोकरंगात रंगतात, तेव्हा त्या मराठी किंवा कुठल्या एका भाषेच्या, मातीच्या राहातच नाहीत.. त्या त्या मातीतल्या होऊन गातात. म्हणजे ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’, ‘उडे जब जब जुल्फें तेरी’, ‘झुमका गिरा रे’, ‘राधा कैसे ना जले’ ही गाणी ऐकताना असे वाटते, की कोणी तरी उत्तर भारतीय गायिका ही गाणी गात आहे. हेच ताईंचे यश आहे.
या खेपेलासुद्धा मी बाळासाहेब-आशा हे कॉम्बिनेशन या प्ले लिस्टमध्ये उल्लेखणे टाळले आहे. ते प्रकरणच वेगळे आहे ना! पुढे कधी तरी येईलच ते.
हे ऐकाच.. आशाताई आणि गुलाम अली
मिराझ ए गजलनंतर सुमारे तीस एक वर्षांनी – २००८ मध्ये आशाताई आणि गुलाम अली खानसाहेबांचा अजून एक आल्बम आला – जनरेशन्स या नावाचा. अर्थात याला ‘मिराझ ए गजल’ची सर नक्कीच नाही, पण खूप वर्षांनी जुळून आलेला हा योग अनुभवावा असाच आहे. तेव्हा दोघांचाही आवाज, दोघांची गायकी ही प्रौढ, तयारीची अशी होती. आज ती पोक्त, बुजुर्ग, उस्ताद श्रेणीमध्ये मोडेल अशी वाटते. तुम्ही ‘मिराझ ए गजल’चे फॅन असाल, (नसाल तर मिराझ ए गजल ऐका आधी) तर हा ‘जनरेशन्स’सुद्धा तुम्हाला आवडेल. चुकवू नका.
जसराज जोशी -viva.loksatta@gmail.com

Story img Loader