लहानपणापासून जंगलात वावरणाऱ्या पांडुरंगला बुरशीजन्य जैवविविधतेची ओळख झाली. बुरशींचे विविध प्रकार पाहून प्रभावित झालेल्या पांडुरंगच्या मनाने पुढे जाऊन याविषयी अभ्यास करायला हवा हे निश्चित केलं होतं. या विचारानेच त्याला भारतात ठिकठिकाणी फिरून बुरशीजन्य विविधतेचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केलं. कुतूहलातून निर्माण झालेला ध्यास आणि त्यातून होत गेलेला अभ्यास यामुळे याच क्षेत्रात करिअरची वाट शोधलेल्या मायकोलॉजिस्ट डॉ. पांडुरंग बागम याचा प्रवास खरंच नवल करायला लावणारा आहे.
पांडुरंगला निसर्गाची आवड निर्माण झाली ते पक्षी, कीटक, साप आणि अन्य लहान लहान वन्यजीवांमध्ये… जंगलात फिरता फिरता अनेक लहान-मोठ्या बाबींचं निरीक्षण करणं, छायाचित्रण करणं अशा पद्धतीने त्याचा प्रवास सुरू झाला. पुढे काही काळाने कुतूहलाची जागा अभ्यासाने घेतली. सुरुवातीला छंद म्हणून सुरू झालेला हा अभ्यास पुढे याच क्षेत्रात त्याला व्यावसायिक म्हणून ओळख मिळवून देणारा ठरला. पांडुरंगने राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर येथून वनस्पतिशास्त्रात पदवी घेतली. मग सातारा येथील वायसीआयएस महाविद्यालयातून त्याने वनस्पतिशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमधून मायकोलॉजी आणि वनस्पती रोगशास्त्र (वनस्पतिशास्त्र) या विषयात त्याने डॉक्टरेटही मिळवली. मायकोलॉजी ही जीवशास्त्राची अशी एक शाखा आहे, जी बुरशींच्या अभ्यासाशी संबंधित आहे, ज्यामध्ये बुरशीचे वर्गीकरण, त्याचे आनुवंशशास्त्र, जैवरासायनिक गुणधर्म आणि माणसाकडून बुरशीचा केला जाणारा वापर या सगळ्या बाबींची अभ्यास केला जातो.
‘महाविद्यालयीन काळात विविध वन्यजीव संशोधन आणि संवर्धन प्रकल्पांमध्ये मी सक्रियपणे भाग घेतला होता’ असं पांडुरंग सांगतो. पश्चिम घाटातील एंटोमोपजेनस नामक बुरशीवर काम करत असताना, त्याला कॉर्डीसेप्स एसपीपी या घटकाचा शोध लागला. पश्चिम घाटातील हे कॉर्डीसेप्स एसपीपी कॉर्डीसेपिन आणि इतर बुरशीजन्य एसपीपीसारख्या औषधी घटकांमुळे बाजारात खूप महाग आहे. याचबरोबर मनोली राखीव जंगलातून त्याला ‘बायोल्युमिनेसेन्स’ नामक बुरशी सापडली. ही बुरशी रात्रीच्या वेळी फ्लोरोसेन्स उत्सर्जित करते. या शोधासाठी डॉ. पांडुरंग बागम याला ‘मुंबई सायंटिस्ट’ या पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे. भारतीय उपखंडातील बुरशींबद्दल जाणून घेण्यासाठी एक विज्ञान अभ्यासक म्हणून जानेवारी २०२० मध्ये ‘फंगीइंडिया’ या खास उपक्रमाची सुरुवात करण्यात आली, असं त्याने सांगितलं. या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट हे शास्त्रज्ञांना त्यांच्या क्षेत्रातील निरीक्षणांचा वापर करून बुरशी ओळखण्यास मदत करणं, तसंच स्थानिक लोकांमध्ये बुरशींबद्दल जागरूकता निर्माण करणं हे असल्याचंही त्याने सांगितलं.
बुरशी ही दैनंदिन जीवनातील एक चांगला, उपयुक्त असा स्राोत आहे. मानवजातीच्या दृष्टीने बुरशी उपयुक्तही आहे आणि त्याचे मानवी जीवनावर काही हानीकारक परिणामही होत असल्याचं पांडुरंग सांगतो. बुरशीचे दोन प्रमुख प्रकार आहेत, सकारात्मक आर्थिक महत्त्व आणि नकारात्मक आर्थिक महत्त्व असलेली बुरशी… ही संकल्पना पांडुरंगने अधिक स्पष्ट करून सांगितली. अन्न म्हणून बुरशी प्रथिनं, जीवनसत्त्वं आणि खनिजांनी समृद्ध असते. यीस्ट हे व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन डीचा एक महत्त्वाचा स्राोत मानलं जातं. लोकप्रिय अन्नपदार्थ म्हणून ओळखला जाणारा ‘टोफू’ म्यूकोर आणि अँटीमायकोर्स एसपीपी, राईझोपस एसपीपीपासून तयार केला जातो.
सोयाबीनला आंबवण्यासाठी आणि ते रुचकर, चविष्ट आणि पचण्याजोगं बनविण्यासाठी हे बुरशीजन्य घटक मदत करतात, असं पांडुरंग याने सांगितलं. पारंपरिक प्रथिनयुक्त पदार्थांना पर्याय म्हणून वापरली जाणारी एकल पेशी प्रथिनं (एससीपी) मिळविण्यासाठी काही प्रकारच्या बुरशी (उदा. सॅकॅरोमायसेस, एस्परगिलस, न्यूरोस्पोरा, पेनिसिलियम, इ.) वापरल्या जात असल्याचंही त्याने सांगितलं. याचबरोबर औषध म्हणून बुरशी अनेक चयापचय संयुगं (उदा. प्रतिजैविक, एंजाइम, जीवनसत्त्वं, अल्कलॉइड्स, स्टिरॉइड्स, प्रतिजैविक) तयार करतात, ज्यांचा वापर औषधांच्या निर्मितीमध्ये केला जातो. बुरशीपासून काढलेल्या प्रतिजैविकांची प्रोलिफेरिन (अॅस्परगिलस प्रोलिफेरन्स), रॅमायसिन (म्यूकोर रीमॅमिनस), सिट्रिनिन (पेनिसिलियम सिट्रिनम), फ्युमागिलिन (अॅस्परगिलस फ्युमिगाटस) ही काही उदाहरणं आहेत, अशी माहितीही पांडुरंगने दिली. एकंदरीतच बुरशीच्या अभ्यासात आकंठ बुडालेल्या पांडुरंगला देशभरात फिरून अधिकाधिक जैववैविध्य आढळणाऱ्या बुरशींचा शोध घ्यायचा आहे. त्याची मानवी जीवनाच्या दृष्टीने असलेली उपयुक्तता अभ्यासायची आहे.
जंगलात फिरताना एरव्ही चटकन नजरही जाणार नाही, मात्र आपल्या रोजच्या आयुष्यात अगदी खाण्यापासून ते त्वचेच्या विकारापर्यंत कैक बाबींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी बुरशी पांडुरंगसारख्या अभ्यासकाच्या मनात मात्र घर करून राहिली आहे. या बुरशीचे रंग, रूप शोधत त्याची अभ्यासपूर्ण दखल घेणाऱ्या डॉ. पांडुरंग बागम या तरुण संशोधकाचं कार्य निश्चितच इतर तरुण-तरुणींनाही प्रेरणादायी वाटेल असं आहे.
viva@expressindia.com