कट्टय़ावर तसे सर्वच जमले होते, पण कट्टय़ाची जान असलेला चोच्या मात्र अजूनही कट्टय़ावर आलेला नव्हता. च्यायला! हा चोच्यापण ना, कुठे तडमडतोय काय माहिती, तो नसला की कट्टय़ावर मजा नाही यार, असं संत्या म्हणतो न म्हणतोच तोच चोच्या कुठून तरी काही घेऊन आला. कट्टय़ाच्या एका कोपऱ्याला तो गेला आणि जाता-जाता म्हणाला ‘‘तुम्हाला ना एक मजा दाखवतो.’’ चोच्याने असं म्हटल्यावर साऱ्यांचेच डोळे त्याच्याकडे लागले. त्याने खिशातून काही तरी काढलं, त्यानंतर माचिस काढली. त्याच्या हातात सिगारेटसारखं काही दिसलं नाही, त्यामुळे हा आता माचिसने काय करणार, याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. अभ्याला राहवलं नाहीच. साल्या चोच्या, आता काय कट्टा जाळणार वगैरे आहेस की काय, असं अभ्याने म्हटल्यावर चोच्याने फक्त एक कटाक्ष त्याच्याकडे टाकला. त्यामध्ये ‘तू काय ० सारखा बोलतोस,’ हे होतं. चोच्या पुन्हा आपल्या कामाला लागला. त्याने माचिसची काडी काढली तसं सारे त्याच्याजवळ गेले. त्याने माचिस पेटवली आणि सापाच्या गोळीला लावली. सापाची गोळी पेटली, त्यामधून धूर यायला लागला आणि साप बाहेर यायला लागला. तस्स, काय चोच्या, पोरखेळ लावलाय यार, ही सगळी लहान मुलांची कामं आहेत. लहान असताना आम्हीपण केलं हे सगळं, पण आता काय हे शोभतं का, असं स्वप्ना बोल्ल्यावर चोच्याकडे उत्तर होतंच, ‘‘दिल तो बच्चा हैं जी,’’ असं चोच्या म्हणाला आणि सर्वाच्याच चेहऱ्यावर थोडंसं स्मित आलं. अगं, कधी तरी लहान व्हावं माणसाने. गम्मत असते गं त्यामध्ये, असं चोच्या बोल्ला खरा आणि मग त्यानंतर लहानपणीची दिवाळी साऱ्यांना आठवायला लागली.
अरे, लहानपणी ना बाबा फटाके आणायचे, त्यानंतर मी आणि माझा भाऊ फटक्यांची वाटणी करायचो. तो मोठा होता आणि त्यामध्ये हरामखोर, त्यामुळे माझ्या वाटय़ाला नेहमीच कमी फटाके यायचे. तो बॉम्ब वगैरे स्वत:ला घ्यायचा आणि माझ्या वाटय़ाला फुलबाजा, पाऊस, चक्र, लवंगी असे फटाके यायचे. मग काय तो मित्रांबरोबर रात्री बाहेर पडल्यावर चोरायचे त्याचे फटाके, असं स्वप्ना म्हणत असताना तिच्या डोळ्यांपुढे ती लहानपणीची दिवाळी तरळली होती. सर्वच तिचं ऐकण्यात व्यस्त होते, कारण कुठे ना कुठे तरी त्यांच्या आयुष्यातही असं काही तरी घडलं असावं, पण प्रत्येकाच्या काही ना काही तरी आठवणी लहानपणीच्या दिवाळीच्या होत्याच. स्वप्नाचं संपल्यावर अभ्यानं नंबर लावला. दिवाळीमध्ये ना किल्ले तयार करायला जाम मजा यायची यार, दिवसभर बिल्डिंगच्या खाली पडलेलो असायचो आम्ही, जेवायचा पत्ता नसायचा, मग कुणाच्या तरी घरी दिवाळीच्या पदार्थाचा वास आला की तिथे जायचं आणि काकींना मस्का लावून खाऊन घ्यायचं, असंच चालायचं. आमच्याकडे तेव्हा कुठे पैसे वगैरे असायचे, काही नाही, मग काय कुणाला तरी झाडावर चढवायचं आणि स्पॉन्सर शोधायचा, नाही तर आपल्या घरी जे असेल ते आणायचं, नाही तर आईच्या मागे लागून ते पदरात पाडून घ्यायचं. ते दिवस ना यार पुन्हा कधी तरी लाइफमध्ये यायला हवेत, असं अजूनही वाटतं. च्यायला! नाही तर आत्ताची मुलं, सुट्टीत दिवसभर त्या पीसीपुढे बसलेली असतात व्हिडीओ गेम खेळत, असं काही त्यांना करायला नको, मग दुनियादारी कशी कळणार यांना.
सगळ्यांच्या आठवणी एकामागून एक यायला सुरुवात झाली आणि कट्टा पूर्णपणे लहान होऊन गेला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक अनामिक आनंद होता, पण आता हे सगळं मिस करतोय याची खंतपण होती.
लहानपणी आई जमीन खराब होते म्हणून साप लावायला द्यायची नाही. मग काय, ज्याच्यावर खुन्नस असेल त्याच्या दाराजवळ कुणी नसताना लावायचा साप आणि पळायचं, असं बऱ्याचदा चालायचं, पण त्या दिवाळीची मजा आता नाही यार, आता दिवाळीत फक्त एकच मजा राहिलीए, असं चोच्या बोल्ल्यावर साऱ्यांच्याच नजरा त्याच्याकडे वळल्या. कोणती, असं काही जणांच्या तोंडून बाहेरही पडलं, त्यावर चोच्या म्हणाला, बस्स काय यार, मी बोल्लो नाही का यापूर्वी देवळातली मजा. मस्त नवीन कपडे घालून देवळात जायचं आणि नमस्कार करून बाहेर नाक्यावर थांबायचं, काय नेत्रसुख मिळतं यार, असं चोच्या बोल्ला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखेच होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा