च्यायला काय चाललंय काय यार, न्यूझ पेपर वाचा किंवा चॅनेल बघा सगळीकडे त्या बलात्काराच्या बातम्या, शी यार लाज वाटायला लागली, की च्यायला आपण अशा नालायक सोसायटीचा भाग आहोत. खरंच आपल्या सोसायटीमध्ये एवढी विकृत लोकं आहेत आणि हे दिवसाढवळ्या घडत असताना पोलीस मात्र कुचकामी ठरतायत, असं म्हणत सुश्याने कट्टय़ावरच्या सर्वाचं लक्ष वेधून घेतलं, पण हा उद्रेक फक्त तिच्याच मनात नव्हता, तर अन्य बऱ्याच जणांच्या मनातही होता, तिने फक्त पहिल्यांदा त्याला वाट करून दिली एवढंच.
अगं, डोबिंवलीसारख्या सुसंस्कृत शहरात हे असं काही वारंवार होतंय, यावर खरं विश्वास बसत नाही. आधी या शहराला एक सांस्कृतिक वारसा होता आणि त्यासाठीच हे शहर ओळखलं जायचं, पण आता मात्र सारं बदललंय, मी एक सांगू का, आधी हे प्रकार जास्त घडत नव्हते, पण जेव्हापासून ही बाहेरची लोकं यायला लागली ना आपल्याकडे तेव्हापासून हे सर्व जाम वाढलंय. खरं तर पोलीसही काहीच करू शकत नाहीत, हेच पटत नाही, असं म्हणत सुप्रियाने आपलं मत मांडलं. त्यावर संत्या बोलला, अगं खरं सांगायचं तर लोकं कशीही वागली तरी त्यांच्यावर पोलिसांचा कंट्रोल असायला हवा, आपण मित्रमैत्रिणी कुठे बसलो तर आपली चंपी करायला हे मागे पुढे बघत नाहीत आणि असं सगळं घडत असताना हे कुठे झोपलेले असतात, काय माहिती. हिंदी पिक्चरसारखे नेहमी स्पॉटवर उशिरा पोहचतात. खरं तर पोलिसांनी ठरवलं तर लहान मुलाचं खेळणंही चोरी होऊ शकत नाही, त्यामुळे हे वाइट प्रकार तर त्यांना रोखता आलेच पाहिजेत, असं संत्या म्हणाला, पण त्यावर अभ्याचं मत काही वेगळंच होतं, तो म्हणाला, अरे संत्या आपली लोकसंख्या बघ आणि पोलिसांची संख्या बघ, कुठे कुठे जाणार ते, कुठेतरी कमी पडणारच ना, असं समजू नकोस मी त्यांची बाजू मांडतोय, पण हेच सत्य आहे. त्यांनाही काही लिमिटेशन्स आणि लिमिट्स आहेत, नाहीतर असे प्रकार घडताना पोलीस काय शांत बसणार का ?
या विषयावर चर्चा कट्टय़ावर रंगात आली होती, पण चोच्या मात्र शांत बसलेला होता, कोणतीच रीअ‍ॅक्शन तो देत नव्हता. साऱ्यांनाच ते कळून चुकलं आणि त्यांचा मोर्चा चोच्याकडे वळला. चोच्या तुला काय वाटतं याबद्दल, काहीतरी शेअर कर, असं म्हणत संत्याने त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न केला आणि चोच्याने चोच खोल्ली. मी काय बोलणार यार, जे होतंय ते वाईटच आहे. पण ते का होतंय याचा कोणीच विचार करत नाही. म्हणजे बघं ना, एखाद्या चालत्या बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये सामूहिक बलात्कार होतो, तेव्हा तिथे काही लोकं नक्कीच असतात ना, मग ती माणसं का मध्ये पडून हा प्रकार थांबवत नाहीत, हे सारं आपल्या सख्ख्या माणसाबरोबर तर होत नाही ए ना, यातंच ते समाधान मानतात. पण दुसरीकडे हे कोणाच्याही बाबतीत घडू शकतं, हे मात्र विसरतात. दिवसाढवळ्या भर रस्त्यावर असे काही प्रकार घडतात, पण कुणी पुढे येऊन ते थांबवताना दिसत नाही. आपण हळू हळू ना षंड होत चाललो आहोत आणि त्यामुळेच या विकृत लोकांना अजून माज चढतो. गुन्हेगारांना पकडायचं काम पोलीस करतील, शिक्षा देण्याचं काम कोर्ट करेल, पण एक सुजाण नागरिक म्हणून आपलं काही कर्तव्य आहे की नाही. आपण पोलिसांवर बोटं ठेवतो, पण आपण काय करतो याचा विचार तरी करतो का कधी. ही विकृत माणसं आपल्याच समाजातली आहेत, त्यांचं प्रमाण वाढलंय, कारण त्यांना माहितीए की ही कॉमन पब्लिक आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. त्यामुळे आपणंच जोपर्यंत स्ट्राँग होत नाही ना, तोपर्यंत काहीही होणार नाही. चोच्या एवढा विचार करत असेल असं कोणाच्या स्वप्नातही नसेल, पण त्याने मांडलेला मुद्दा चुकीचा नव्हता. चोच्याचं हे प्रवचन ऐकून कट्टा शांत झाला आणि विचारात बुडाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा