पूरपरिस्थितीत वा नैसर्गिक आपत्तीनंतर घरदारच गमावून बसलेल्यांची अवस्था कौशल शेट्टी या तरुणाने जवळून पाहिली. वर्षानुवर्षे बेघर झालेल्यांचे हाल, त्यांची मानसिकता त्याला परिचयाची होती. त्यामुळे आपल्या परीने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तो प्रयत्न करत राहिला. याच अथक प्रयत्नांतून कोणत्याही कारणांमुळे बेघर झालेल्यांना तात्पुरता का होईना भक्कम निवारा मिळवून देणारी ‘नोस्तोस होम्स’ ही संस्था उभी राहिली

भारतात आणि जगभरात अनेक ठिकाणी अनेक वेळा पूर येतात. वादळं येण्याच्या प्रमाणातही बऱ्यापैकी वाढ झाली आहे. देश-परदेशातील अनेक किनारे वादळ धडकून उद्ध्वस्त झाले आहेत आणि काही काळाने परत तेथील जनजीवन सुरळीतही झाले आहे. मात्र ज्या वेळी पूरस्थिती निर्माण होते, त्या वेळी कित्येकांना घरदार सोडून केवळ जीव वाचवून पळावं लागतं. कुठे जागा मिळेल तिथे किंवा सरकार सोय करेल तिथे त्यांना राहावं लागतं. जशा सोयी मिळतील तशा स्वीकाराव्या लागतात. तंबू मिळाला तर तंबू, घर मिळालं तर घर, झोपडी मिळाली तर झोपडी आणि तेही जिथे दिलं जाईल तिथे राहावं लागतं. हीच परिस्थिती कौशल शेट्टीने लहानपणापासून बघितली होती.

Two youths died after drowning in a tank in Bhalivali vasai news
भालिवली येथील कुंडात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
incident of clash between two groups took place in Dhairi area on Sinhagad road due to enmity
सिंहगड रस्त्यावर धायरी भागात दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्यादीवरुन गुन्हे दाखल
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
explosion in bhugaon steel company in wardha
Video : भूगांव येथील पोलाद प्रकल्पात स्फ़ोट, २१ कामगार जखमी
Process of house sale by developer without lot Mumbai news
सोडतीविनाच विकासकाकडून घरविक्रीची प्रक्रिया?

कर्नाटकच्या उडुपीजवळ मडी गावात राहणारा कौशल. लहानपणापासून घराच्या जवळ असलेल्या घटप्रभा नदीला कायम येणारा पूर त्याने पाहिलेला होता. पुराने घरं तर जातातच, पण पिकं वाहून जातात आणि ती मातीदेखील नापीक होते. अनेकांना रोजच्या जगण्याचा प्रश्न पडतो. पुरामुळे होणारी ही लोकांची धावपळ, त्यांच्या मनाची होणारी ओढाताण कौशलने लहानपणापासून स्वत:च्या डोळ्यांनी पाहिली होती, अनुभवली होती. नंतर त्याचं कुटुंब मुंबईला शिफ्ट झालं, तरीही त्याच्या डोक्यात पुरानंतरच्या या आठवणी कायम होत्या. तो आयआयटी खरगपूरमध्ये शिकत असताना त्याने पुन्हा तोच अनुभव घेतला. फॅनी चक्रीवादळाच्या वेळी १२ लाख लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं. त्या वेळी कौशलने यावर काही तरी उपाय काढायचा विचार केला. आयआयटीमधल्या माधव दत्त या क्लासमेटला सोबत घेऊन त्याने ‘नोस्तोस होम्स’ सुरू केले.

हेही वाचा : सफरनामा : ‘पुष्प’ राज

‘नोस्तोस होम्स’ या कंपनीमार्फत फोल्डेबल, पण मजबूत घरं बनवली जातात. ज्या वेळी लोकांना कोणत्याही आपत्तीमुळे स्थलांतरित व्हावं लागतं त्या वेळी ही घरं त्यांच्यासाठी निवारा बनू शकतात. आसामच्या पुराच्या वेळी कौशलच्या या कंपनीने ग्राम्य विकास मंच यांच्याबरोबर मिळून काम करत सरकारला मदत म्हणून ही घरं तिथे पुरवली होती. ही घरं म्हणजे केवळ कापडी किंवा प्लॅस्टिकचा तंबू नाही. मजबूत भिंती, खिडक्या, दरवाजे, मजबूत छप्पर अशा सगळ्यांनी मिळून बनवता येणारं हे घर आहे. वाऱ्याने उडून जाणारा तंबू नाही, पावसात गळणारं छत नाही आणि उन्हाने वितळणारं प्लॅस्टिक नाही, अशी नोस्तोस होम्सची घरं आहेत. स्थलांतरित झालेल्या लोकांसाठी घरी परत येईपर्यंत मजबूत व्यवस्था म्हणून ही पर्यायी व्यवस्था तयार करण्याची संकल्पना कौशल शेट्टीची होती. त्यानुसार त्याची ‘नोस्तोस होम्स’ ही नॉन-प्रॉफिट संस्था म्हणून लंडन इथे रजिस्टर्ड आहे. या घरांची मदत त्याने आफ्रिकेतही दिलेली आहे आणि मलावी इथेही केलेली आहे.

हेही वाचा :तरुणाईचे ट्रेण्डिंग संस्कृत

जगभरात वादळ, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्ती किंवा हिंसाचार, जनक्षोभामुळे झालेले घरांचे नुकसान यामुळे अचानक बेघर झालेल्यांसाठी ‘नोस्तोस होम्स’ अंतर्गत बांधून दिली जाणारी घरं टिकाऊ आहेतच. मात्र केवळ घर उभारून न देता, घरात असणाऱ्या शौचालय, सोलार पॅनेलसारख्या सोयीसुविधाही या घरांमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. शिवाय, या घरांची अशा पद्धतीने रचना करण्यात येते की जेणेकरून लोकांना घरात काही खोल्या वाढवायच्या असतील किंवा एखाद्या जागेचा वेगळ्या पद्धतीने उपयोग करून घ्यायचा असेल, घर मोठे करायचे असेल तर या सगळ्या गोष्टी त्यांना सहजशक्य होतात. काही तासांत ही घरं बांधून होतात. महत्त्वाचं म्हणजे ही घरं बांधून देण्याच्या कामी स्थानिकांची मदत घेतली जाते. त्यामुळे कुठल्याही आपत्तीनंतर बेघर झालेल्यांना तात्पुरता निवारा म्हणूनही पक्क्या घरात राहात असल्याची सुरक्षित भावना या घरांमुळे मिळते. आपली नोकरी सांभाळून कौशल आपली संस्था वाढवण्यासाठी, जगभरात जिथे जिथे गरज असेल तिथे अशा पद्धतीची घरं उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्नशील असतो.

‘मास्टरकार्ड’मध्ये सीनियर प्रॉडक्ट मॅनेजर असणारा कौशल शेट्टी आता अधिकाधिक देशांतल्या सरकारांशी टाय-अप करून मदत देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे. त्याच्या याच कार्याची दखल घेऊन फोर्ब्सने गेल्या वर्षी ‘फोर्ब्स थर्टी अंडर थर्टी’च्या यादीत त्याला स्थान दिले. स्वत: लोकांच्या वेदना जवळून अनुभवल्यानंतर त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढत ना नफा तत्त्वावर काम करणारी, एक मोठे समाजकार्य उभारणारे कौशलसारखे तरुण दुर्मीळच असतात.

viva@expressindia.com