कौशिक लेले या डोंबिवलीच्या २८ वर्षांच्या कॉम्युटर इंजिनीअर तरुणाचा मराठी शिकवण्याचा उपक्रम वेगळा आहे. त्याच्या उपक्रमाची माहिती त्याने व्हिवाबरोबर शेअर केली. कौशिक पुण्याला एका आयटी कंपनीत नोकरीला आहे.
कौशिकने दोन ब्लॉग्ज सुरू केले आहेत. http://kaushiklele-learnmarathi.blogspot.com http://learn-marathi-from-hindi-kaushiklele.blogspot.com या ब्लॉगमध्ये देवनागरी लिपी, प्राथमिक व्याकरण (नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई.) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे शॉर्ट फॉम्र्स इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात मराठी शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘वन स्टॉप शॉप’ असा हा ब्लॉग आहे. कौशिक सांगतो, ‘मी स्वत: माझा छंद म्हणून तमिळ आणि गुजराती पुस्तकावरून शिकलो. त्या वेळी इतरांना मराठी शिकण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहेत हे तपासायचा मी प्रयत्न केला. काही पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत पण मला ती समाधानकारक वाटली नाहीत. इंटरनेटवर मराठी शिकण्यासाठीचे पर्याय फारच तुटपुंजे आणि अर्धवट सोडलेले दिसले. त्या तुलनेत परकीय भाषा शिकण्यासाठी खूपच पर्याय उपलब्ध आहेत. या वस्तुस्थितीमुळे मी अस्वस्थ झालो. मराठी शिकण्यासाठीचे पुरेसे पर्याय आपण तयार केलेले नाहीत हे मला जाणवलं.’
इंटरनेटच्या जमान्यात प्रत्येक गोष्टनेटवरच शोधली जाते हे उघड आहे. त्यामुळे नेटवरच अशा प्रकारचे साहित्य असले पाहिजे आणि तेही मोफत असावे असे कौशिकला वाटले. ‘मला स्वत:ला भाषा शिकणे-शिकवणे आवडते त्यामुळे स्वत:च हे काम करायचे ठरवले. मी ज्या पद्धतीने तमिळ आणि गुजराती शिकलो त्या पद्धतीने इतरांना मराठी शिकवायचे ठरवले,’ कौशिक सांगतो.
कौशिकच्या Learn Marathi from English मध्ये १२२ धडे आहेत. Learn Marathi from Hindiमध्ये ९४ धडे आहेत. या ब्लॉगमधील संभाषणाच्या १६५ साउन्ड क्लिप्सही कौशिकने यूटय़ूबवर ‘Kaushik Lele’ नावाच्या चॅनलवर टाकल्या आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना मराठी उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
फेसबुकसारख्या माध्यमातून अनेकांना त्याच्या वेबसाइट्सबद्दल कळले आणि चांगला प्रतिसाद मिळाला. ‘चाळीसेक व्यक्तींनी मला ई-मेलवर हे ब्लॉग वापरून मराठी शिकत असल्याचे सांगितले आहे.’ या ब्लॉग्जच्या फेसबुकवरील ग्रुप्सनाही ७००च्या आसपास सदस्य आहेत. यूटय़ूब व्हिडीओ तेरा हजारपेक्षा अधिक वेळा बघितले गेले आहेत. यूटय़ूब चॅनलचे या घडीला ११८ सभासद आहेत. त्यात महाराष्ट्रात शिक्षण किंवा कामानिमित्त परराज्यातून आलेल्या व्यक्ती, भाषांची आवड असणारे परदेशी नागरिक, अनिवासी मराठी आहेत. तसेच मराठी व्यक्तींच्या प्रेमात पडलेले किंवा लग्न केलेले परदेशी नागरिकही आहेत.
मराठी भाषेच्या वेबसाइट नंतर आता कौशिकने गुजराती भाषेची वेबसाइटही सुरू केली असून त्यात ८२ पाठ आहेत. आणि यूटय़ूबवर ७० व्हिडीओ आहेत. त्यांनाही हळूहळू वाढता प्रतिसाद मिळतो आहे. ‘अजून पाठ आणि व्हिडीओ मी जोडणार आहे. या ब्लॉगलाही अवश्य भेट द्यावी, असे कौशिकने आवाहन केलेय. http://learn-gujarati-from-english.blogspot.com/
YouTube Channel: – Learn Gujarati through English with Kaushik Lele.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा