स्वत:साठी स्पेस आणि टाईम देणं म्हणजे काय? आपल्या आवडीच्या कामासाठी, आपल्या आवडीच्या छंदांसाठी आपण वेळ काढू शकतो का, याविषयी काही तरुण मुलींना बोलतं केलं. आधी कॉलेज, क्लासेस, परीक्षेचं चक्र मागे असतं. त्यातूनही मैत्रिणींबरोबर भटकायला वेळ काढला जातो. पण नोकरीला लागलं किंवा काम सुरू झालं की मात्र स्वत:साठी वेळ देता येणं कठीण होत जातं. लग्न झालेल्या मुलींना तर आणखी जबाबदाऱ्यांतून जावं लागतं. ‘सो कॉल्ड’ सांसारिक जबाबदाऱ्यांमधून असं मुक्तपणे वेळ घालवणं अवघड होऊन जातं. स्वत:ची स्पेस आणि टाईम दोन्हींसाठी झगडणं सुरू होतं. आपल्या आवडीच्या कामासाठी, आपल्या आवडीच्या छंदासाठी आपण वेळ काढू शकतो का, याविषयी काही तरुण मुलींना बोलतं केलं. त्यातील बहुतेक सगळ्यांना असा स्वत:साठी थोडा वेळ असायलाच हवा, असं वाटत होतं. पण त्यातल्या काही थोडय़ा असा वेळ काढत होत्या. या वेळामध्ये स्वत:ला रुचतं ते, आवडतं ते करतात, असं त्या म्हणाल्या. यातून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो आणि पुढच्या सगळ्या हेक्टिक शेडय़ुलला, कामांना शक्ती देणारा असतो, असं त्यांचं मत होतं.
पूर्वा सावे म्हणते, ‘मी जाहिरात आणि एडिटिंग या क्षेत्रात काम करीत असल्यामुळे कामाचा प्रचंड ताण असतो; पण या सगळ्यातून थोडा स्वत:साठी हक्काचा वेळ काढणं आवश्यक आहे. मला फिरण्याची, फोटोग्राफीची आणि पेंटिंगची आवड आहे. वीकेण्डचे दोन दिवस मला जमेल त्याप्रमाणे मी हमखास फिरायला जाते. केळवा बीच, माहीम तसेच चर्चगेट, मरीन ड्राइव्ह या ठिकाणी नाईटलाईट फोटोग्राफी करण्यासाठी मी वेळ देण्याचा प्रयत्न करते किंवा गावात भ्रमंती करायलाही मला आवडतं. या वेळेस कोणाशी तरी बोलत, गप्पा मारीत स्वत:ला निसर्गात रममाण करणं हाही एक सुखद अनुभव असतो. आजच्या धावपळीच्या काळात स्वत:साठी वेळ देणं कमी होत असलं तरीही आपल्यासाठी वेळ काढणं गरजेचं आहे, असं मला वाटतं.’
मुंबई विद्यापीठात जर्मन शिकवणारी गिरिशा टिळक सांगते, ‘कामाचा ताण, कामाच्या वेळा आणि जाण्या-येण्यासाठी करावा लागणारा प्रवास या सगळ्यामध्ये स्वत:कडे दुर्लक्ष होतं. आपल्याला हवा तसा वेळ रोजच स्वत:साठी देता येतो असं नाही. मला शॉिपगची खूप आवड आहे. त्यामुळे एक दिवस तरी मी शॉिपगचा प्लॅन करते आणि मनसोक्त खरेदीचा आनंद घेते. मला पेपरमेकिंगची देखील आवड आहे. त्यासाठीसुद्धा मी आवर्जून वेळ काढून कागदापासून विविध वस्तू बनवते. सासर आणि माहेरच्या कुटूंबाची काळजी घेणं जसं गरजेचं आहे तसंच कधीतरी मुक्तपणे स्वत:साठी वेळ देणं मला महत्त्वाचं वाटतं. ’                        
घरच्या जबाबदाऱ्यांमधून स्वतसाठी कसा वेळ काढायचा याबाबत बोलताना यशोदा इंगळे-पाटील  म्हणाली, ‘लग्न झालं की जबाबदारी वाढते. घरातली कामं आणि स्वत:चं वेळापत्रक याची जुळवाजुळव करताना स्वत:साठी वेळ देता येत नाही. पण मला वाटतं, प्रत्येकाने जमेल तसा, जमेल तेवढा वेळ तरी स्वत:ला देणं गरजेचं आहे. मला वक्तृत्वाची आवड आहे. त्यामुळे शाळा, कॉलेजपासून विविध राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धात मी भाग घ्यायचे. लग्न झाल्यावरही मी हा सहभाग सोडलेला नाही. आधी या सगळ्यासाठी थोडा वेळ कमी पडेल का अशी भीती वाटली होती. पण आठवडय़ातले दोन तास मी माझ्या वाचनासाठी आणि कविता लेखानासाठी राखीव ठेवलेच आहेत. या वेळेत मी एकटीच निवांत बसून चिंतन करते. मग कितीही अडचणी आल्या तरीही मी माझ्यासाठी राखीव ठेवलेला वेळ फक्त आणि फक्त माझ्यासाठीच देते. रोजच्या धावपळीतून स्वत:साठी वेळ काढणं हा एक एक्सरसाइजच ठरू शकतो.’
अश्मा फडणीसला संगीताची आवड आहे.  ती म्हणते, ‘माझी पहिली आवड म्हणजे संगीत!! मी स्वत: संगीतविशारद असून संगीतातूनच एम.ए. केलंय. पण आता सॉफ्टवेअर इंजिनीअिरगच्या क्षेत्रात असल्याने सकाळी ९ ते रात्री ८ याऑफिस टायिमगमध्ये संगीताच्या आवडीकडे थोडंसं दुर्लक्ष होतंय. पूर्वीसारखा रियाझाला भरपूर वेळ देता येत नाही; पण म्हणतात ना.. आवड असली की सवड निघतेच, त्याप्रमाणे मी संगीतासाठी आठवडय़ातल्या सुट्टीच्या दिवसात हमखास वेळ काढते. मग ऑफिसच्या सगळ्या कामांचा विचार जाणीवपूर्वक बाजूला सारून मी आणि माझं गाणं एकमेकांत सूर मिसळण्याचा प्रयत्न करीत असतो. असा मुद्दामहून स्वत:च्या आवडीसाठी वेळ काढला की वेगळंच समाधान आणि मानसिक शांतता मिळते आणि याचा सकारात्मक उपयोग येणाऱ्या दिवसावर होतो. ऑफिसच्या ताणतणावातून स्वत:ला रीलॅक्स करण्याचा हा उत्तम उपाय आहे.’
पूर्वा मॅथ्यूचा छंद तसा वेगळा. छंद म्हणता येईल किंवा आवड, पॅशन. ती ज्युडो खेळते. ‘मी आता पॉलिटिकल सायन्समध्ये एम.ए. करतेय. खरं तर अभ्यासाच्या व्यापामुळे कुठं बाहेर फिरायला जायला मिळत नाही. त्यामुळे स्वत:च्या आवडीनिवडीसाठी वेळ काढण्याची मारामार होत असली तरीही मी संध्याकाळचे दोन तास तरी मी माझ्यासाठी वेळ देतेच. मी ज्युडो ब्लॅक बेल्ट प्लेयर असल्याने माझ्या या खेळाच्या सरावासाठी मला वेळ द्यायला आवडतो. कधी कधी कॉलेजमधून आल्यावर थकायला होतं. अशा वेळी स्वत:साठी काहीतरी मुद्दामहून करायचा कंटाळा येतो; पण संध्याकाळी जेव्हा या खेळाच्या निमित्ताने मी स्वत:ला वेळ देते, तेव्हा कंटाळलेलं मन पुन्हा फ्रेश होऊन अभ्यास करायलाही एक नवा जोम येतो. मी वयाच्या सहाव्या वर्षांपासून ज्युडो खेळतेय. त्यामुळे माझी ही आवड दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात असले तरीही मी आवर्जून जोपासते. मला वाटतं, या खेळाला मी दिलेला वेळ म्हणजेच माझ्यासाठी मी काढलेला वेळ.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा