आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधायचा प्रयत्न.
आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते यावर आपला संपूर्ण दिवस कसा जाणार हे निश्चित करणाऱ्यांपैकी तुम्ही एक आहात? मग दिवसाची सुरुवात एखाद्या कडक, तरतरीत उष्ण पेयाने करणंही तुम्हाला प्रिय असणार असा अंदाज बांधायला हरकत नाही. तुम्ही चहापंथीय आहात का कॉफीपंथीय हा मुद्दा बाजूला ठेवला तरी दिवसाची प्रसन्न सुरुवात असो, संध्याकाळची कातर हुरहुर असो किंवा एका धुंदीत जागून काढलेली रात्रीची जागरणं असो, एखाद्या जिवलग मैत्रिणीप्रमाणे जिची साथ हवीहवीशी वाटते ती आपली लाडकी सखी-कॉफी.
तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करता तेव्हा तिचं रूप, दिसणं, बाकीचे मुद्दे गौण ठरतात. हे वाक्य वाचल्यावर कॉफीच्या प्रेमात आपण आकंठ का बुडतो याचं कारण उमगतं. तिचा काळसर तपकिरी रंग, थोडीशी कडवट चव तुमच्या आणि तिच्या प्रेमाच्या आड न येता उलट तिची ही ‘डार्क साईड’ तुमचा वीक पॉइंट बनून जाते. मग कॉफी कुठे जन्मली, कशी वाढली, आपल्याकडे कशी आली हे मुद्दे तिच्यावरच्या प्रेमाआड येणार नसले तरी ते जाणून घ्यायची उत्सुकता वाटतेच.
कॉफीचा जन्म इथोपियामधला. मुळात कॉफी या अर्थाने हे लाल रसरशीत फळ आपल्या काही उपयोगाला येईल हे गावी नसल्याने किती वर्षे ते दुर्लक्षित पडून होते याचा अंदाज नाही. अर्थातच कॉफीचा जन्म अमुक साली झाला असे छातीठोकपणे सांगता येत नाही. अशी कथा सांगतात की, इथोपियाच्या एका गावी काल्दी नामक धनगर राहात होता. तर या धनगराच्या एके दिवशी लक्षात आलं की आपल्या बकऱ्यांना अमुक टेकडय़ांवर चारलं की, त्या अधिकच उनाडतात, आनंदी वाटतात. रात्रभर झोपत नाहीत. त्याने बकऱ्यांचा माग काढल्यावर त्याला आढळलं की, अमुक प्रकारची लाल रसरशीत छोटी फळं खाल्लय़ाने असं होत आहे. त्याला आश्चर्य वाटून तो ती फळं घेऊन जवळच्याच मठात गेला. तिथे प्रार्थना करणाऱ्या साधकांना त्याने ती फळं दाखवून आपलं निरीक्षण सांगितलं. सुरुवातीला त्या साधकांना हे ‘सैतानाचे काम’ वाटले. मात्र त्या फळांना उकळत्या पाण्यात टाकून त्यापासून बनवलेल्या पेयाच्या स्वादाने खूपच तरतरीत वाटते हे त्या साधकांना जाणवलं. त्यामुळे दीर्घकाळ प्रार्थनेसाठी बसणंही सोपं होतं हे त्यांच्या ध्यानात आलं आणि कॉफीच्या फळांचा पेयपानासाठी वापर सुरू झाला.
या फळांना सुकवून त्यांच्या बियांची पावडर करून रूढार्थाने आज प्रचलित कॉफी तयार व्हायला तसा मध्ये बराच काळ जावा लागला. पंधराव्या शतकाच्या आसपास कॉफीबिया अरबांकडे आल्या. येमेन प्रांतातील अरेबिया येथे कॉफीची रीतसर लागवड सुरू झाली.
अरबांकडून युरोपियन खलाशी, प्रवासी यांच्यामार्फत कॉफी युरोपात गेली आणि अशा प्रकारे रुजली की कॉफीशिवाय या भागांची कल्पनाच शक्य होऊ शकत नाही.
भारतात कॉफी ब्रिटिशांमुळे आली असा एक समाज आहे.ब्रिटिशांनी कॉफी अधिक प्रचलित केली. मात्र भारतात कॉफीच्या लागवडीचे श्रेय एका सुफी संताला जाते.बाबाबुदान हे सुफी संत मक्का यात्रेला जात असताना येमेनमधील मोका प्रांतात त्यांचा मुक्काम होता. इथे त्यांना एक दाट, किंचित गोड, किंचित कडवट स्वादाचे पेय प्यायला मिळाले. तो स्वाद त्यांना इतका आवडला की,भारतातही हे पेय उपलब्ध व्हावं असं त्यांना वाटलं.ते पेय अर्थातच कॉफीच्या सात बिया ते गुप्तपणे आपल्यासोबत घेऊन आले.अरब मंडळी आपल्याकडील अशा खास चीजा बाहेर जाऊ न देण्याबाबतीत खूपच दक्ष होती.त्यामुळे बाबाबुदान यांना ही गोष्ट गप्तपणे पार पाडावी लागली. कर्नाटक येथील चिकमंगळूरमधल्या टेकडीवर त्यांनी या बिया रुजवून कॉफीच्या भारतीय पर्वाची सुरुवात केली. या टेकडय़ांना आज बाबाबुदान हिल्स म्हणूनच ओळखले जाते.भारतातील दाक्षिणात्य मंडळी आणि कॉफीचे दृढ नाते यांची उकल या कथेतून होते. कॉफीचा भारतीय प्रवास दक्षिणेकडून सुरू झाला. बाबाबुदान यांच्या या कथेतील मोका प्रांताचा उल्लेख वाचल्यावर आपण पीत असलेल्या मोका कॉफीच्या नावाचा अर्थही कळतो.
आज कॉफी हाऊसेसनी तरुण, प्रौढ सगळ्याच मंडळींना स्वादासह गप्पांचा फड उपलब्ध करून दिला आहे. मात्र कॉफी हाऊसमधली महागडी कॉफी चवीपेक्षा गप्पांसाठी अधिक प्यायली जाते.घरच्या घरी कॉफी करणाऱ्या सुगृहिणी वा सुगृहस्थ यांची प्रत्येकाची कॉफी बनवण्याची शैली त्या कॉफीला ‘युनिक’ बनवते. कॉफी बनवणाऱ्या प्रत्येकाचे फंडे वेगळे असतात ही या पेयांची खासियत आहे. फेसदार एस्प्रेसोपासून हृदयांकित, पर्णाकित मोका, लाटे असो वा एखाद्या टिपिकल दाक्षिणात्य हॉटेलातील ‘कॉफी’ असो या पेयाने वरचा क्लास मिळवला आहे यात शंकाच नाही. चहा हे पृथ्वीवरील अमृत मानले तर कॉफीसुद्धा ‘संजीवनी’ ठरावी. कॉफीच्या जाहिरातींपासून ते तिच्या समर्थकांपर्यंत सर्वानी कॉफीचं समोर ठेवलेलं रूप हे क्लासी, तरल, गूढ, रोमँटिक, भावनिक अशा अनेक मूड्सना जिवंत करणारं आहे. कॉफी गुलजार यांच्या कवितांसारखी आहे. समजायला थोडी कठीण, पण तरी वाचल्यावर आवडणारी आणि समजल्यावर तर प्रेमात पाडणारी. कॉफीचा कप नाही, कॉफीचा मग ओठी लागल्यावर मैं जिंदगी का साथ निभाता चला गया! हर फिक्र को धुएँ में उडमता चला गया ! ही बेफिक्री, तरी आनंदी भावना मनात थुईथुईते. यासाठीच भर पावसाळ्यात एक दिवस तरी अनुभवायलाच हवी…कॉफी आणि बरंच काही.
– रश्मि वारंग