आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधायचा प्रयत्न.
बिस्किटं आणि भारतीय यांचा संबंध तसा फारच अलीकडचा, पण बिस्किटांची वर्गवारी करायची ठरवली तर साधारणपणे उच्चमध्यमवर्गीय गटात मोडणारा प्रकार म्हणजे नानखटाई. ‘नानकटाई’ हा शब्द आपल्या मुखी इतका रुळला आहे की त्याचा मूळ उच्चार ‘नानखटाई’ असा आहे याची आपल्याला शंकाही येऊ नये. या शब्दाच्या उत्पत्तीबद्दल दोन भिन्न अर्थ प्रत्ययास येतात. नान या पर्शियन शब्दाचा अर्थ ब्रेड तर खटाई म्हणजे बिस्किट. पण काही ठिकाणी खटाई हा शब्द नानखटाईतल्या सहा घटक पदार्थाचे एकत्रित वर्णन करण्यासाठी केला गेल्याचा उल्लेख येतो. त्यामुळे आपण गोंधळात पडतो. काही ठिकाणी तर नानखटाई म्हणजे चायनीज ब्रेड असेही म्हटलेले आहे. त्यामुळे ज्या बिस्किटांना आपण नानखटाई म्हणून संबोधतो त्या नावाच्या उगमाबद्दल संदिग्धता निर्माण होते. शेक्सपियरच्या नावात काय आहे? या विधानाचा आधार घेत आपण नावाच्या गोंधळाकडे थोडसं दुर्लक्ष करू या आणि या बिस्किटांच्या इतिहासाकडे वळू या.
नानखटाई तशी इथल्याच मातीमधली आहे, पण त्यांच्या उगमाला डच मंडळींचा थोडाबहुत हातभार लागलेला दिसून येतो. १६ व्या शतकाच्या अखेरीसची ही गोष्ट आहे. भारत हा मसाल्यांच्या पदार्थाचा देश म्हणून पाश्चिमात्य मंडळींना खुणावू लागला होता. डच, पोर्तुगीज, फ्रेंच मंडळी या भूमीवर व्यापारासाठी येऊ लागली होती. त्यांपैकी सुरत येथील बंदरात डच मंडळींची मोठी वखार होती. त्या मंडळींना आपल्या पद्धतीचे ब्रेड उत्पादन करणारी बेकरी अनिवार्य वाटू लागली. या डच मंडळींच्या बेकरीत कामं करणारी काही मंडळी मात्र भारतीय होती. डच मंडळींची वखार बंद झाली, तेव्हा अर्थातच त्यांनी बेकरीदेखील बंद करायचे ठरवले. परंतु बेकरीमधील पाच पारसी कर्मचाऱ्यांनी बेकरी बंद न करता ती तशीच चालू ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. धाडसी याकरिता, की त्या काळात बेकरी उत्पादनं खाण्याचा धर्मबुडीशी असलेला संबंध पाहता, या उद्य्ोगाचे टिकणे तसे कठीणच होते.
तरीही फारमजी पेस्तनजी दोतीवाला यांनी ते आव्हान स्वीकारले. डच बेकरी दोतीवाला बेकरी म्हणून ओळखली जाऊ लागली. दोतीवाला यांनी डच मंडळींकडून अवगत बेकरी पदार्थाचे ज्ञान वापरून बिस्किटं तयार केली, पण काही बिस्किटांचे पीठ भिजवण्यासाठी ताडाची सुरा वापरली जायची त्यामुळे या बिस्किटांकडे तत्कालीन समाजाने पाठ फिरवली. दोतीवाला यांनी कमी किमतीत ही बिस्किटं विकण्याचा प्रयत्न केला. ही बिस्किटं गरिबांचे खाणे म्हणून लोकप्रिय झाली. पण केवळ विशिष्ट वर्गापुरती ही बिस्किटं विकणं दोतीवाला यांना परवडणारं नव्हतं. त्यामुळे भारतीय मानसिकता व चव आणि डच मंडळींचं बेकिंगचं तंत्रज्ञान याचं उत्तम फ्युजन करत शुद्ध तुपाचा वापर करून त्यांनी जी बिस्किटं बनवली ती लोकांच्या प्रचंड पसंतीस उतरली. तीच ही नानखटाई. सुरतेचा व्यापाराच्या निमित्ताने सर्वच महत्त्वाच्या शहरांशी संबंध होता. त्यामुळे नानखटाई भारतभर छान पसरली.
खारी, बटर या वर्गाप्रमाणे नानखटाई ही रोजच्या नाश्त्याचा भाग बनू शकली नसली तरी कधी कधी का होईना आपल्या बिस्किटाच्या डब्यात ती शोभा वाढवतात. सणासुदीला देण्यात येणाऱ्या गिफ्ट पॅकेट्समध्ये मिठाई नको असल्यास उत्कृष्ट दर्जाच्या नानखटाईला अग्रक्रम मिळतो. एकेकाळी दिवाळीच्या फराळात अन्य पदार्थाच्या जोडीने नानखटाई बनवणे हे नवे पाककौशल्य ठरू लागले होते. सुगरण आई ते लेक अशा सर्वच वयोगटांसाठी नानखटाई बनवणं ही पाककौशल्याची नवी चाचणी ठरली होती. मायक्रोवेव्ह फार प्रचलित नसण्याच्या काळात दिवाळी हंगामात नानखटाईचे मिश्रण घेऊन बेकरीच्या दारी रांग लावणाऱ्या स्त्रिया आठवून बघा. नानखटाईचे महत्त्व आपोआप अधोरेखित होते.
मिट्ट गोड, कुरकुरीत तरीही भारदस्त अशी नानखटाई चहासोबत खावी, नुसती खावी. बिस्किटांचा गोडवा, शुद्ध तुपाचा तवंग आणि बेकिंगचा खरपूसपणा आपल्याला जाणवतोच. चहाशी जास्तच सलगी करत कपाच्या तळाशी बुडी मारायची या नानखटाईची जुनी खोड, पण चहात पूर्ण ओथंबलेलं तिचं रूप तसंच वाया जाऊ न देता आपण चमच्याने तिला हुडकतो किंवा प्रसंगी चहाचा रिकामा कप मुखी मोकळा करकरून त्या नानखटाईचा आस्वाद घेण्याचा जो आटोकाट प्रयत्न करतो त्यातूनच या नानखटाईबद्दलची आपली आस्था स्पष्ट होते. अगदी रोज नाही पण कधीमधी भेटणारी ही चहाची सखी म्हणूनच तर लोकप्रिय आहे.
– रश्मि वारंग