आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधण्याचा प्रयत्न
सहज, अगदी बिलकूल विचार न करता अशी कल्पना करू या की, सारे पदार्थ आपल्याशी बोलू लागलेत, तर काय धम्माल येईल? केम छो? म्हणून ढोकळा विचारपूस करेल. की पापे, की गल है? म्हणत लस्सी सलगी करेल. काय राव तुम्ही, लय भारी म्हणत तांबडा रस्सा पाठीत बुक्की मारेल. बघा किती सहज या पदार्थाना आपण या प्रांताशी शिवून टाकतो! पदार्थाला भाषा नसते, पण आपल्या मनाने मात्र ही भाषा त्या पदार्थाला बहाल केलेली असते. रसगुल्ला बोलू लागला तर तो भीषोण (भीषण) शुंदर (सुंदर) असंच काही तरी बोलेल याची आपल्याला खात्री असते. इतकं या रसगुल्ल्याचं आणि बंगाली मातीचं अद्वैत आहे.
काही वेळा काही गोष्टी शोधताना मात्र वेगळंच काही हाती लागतं. तसंच रसगुल्ल्याच्या बाबतीतही होतं. रसगुल्ल्याच्या उगमाविषयी वाचताना दोन मतप्रवाह आढळतात. एक प्रवाह सांगतो रसगुल्ला हा मूळचा ओदिशा राज्यातला, जो नंतर बंगालमध्ये जाऊन लोकप्रिय झाला. तर दुसरा मतप्रवाह इ ना चॉलबे म्हणून ठामपणे रसगुल्ला बंगालीच असं मत मांडणारा आहे.
पहिल्या मतप्रवाहाला जोडलेल्या काही कथा रोचक आहेत. ओदिशामधल्या पुरीतल्या जगन्नाथ मंदिरात या रसगुल्ल्याची, स्थानिक भाषेत ‘खिरामोहना’ची निर्मिती झाली असं सांगतात. याविषयीची आख्यायिका अशी की, भगवान विष्णू रथयात्रेसाठी नऊ दिवस मंदिर सोडून जातात. त्यामुळे श्रीलक्ष्मीदेवी रुसून बसतात. भगवान विष्णू येण्याच्या वेळी मंदिराचे जय-विजय द्वार त्या बंद करून भगवान विष्णूंना अडवतात. अशा वेळी लक्ष्मीदेवीचा रुसवा दूर करण्यासाठी भगवान विष्णू त्यांना जो गोड पदार्थ देऊ करतात तोच हा रसगुल्ला. आजही ही निलाद्री बीजे परंपरा (भगवान विष्णूंचे आगमन) जपलेली आहे. याशिवाय दुसरी कथा अशी सांगितली जाते की, ओदिशामधील भुवनेश्वरजवळ पहला नामक एक गाव होतं. या गावात खूप साऱ्या गाई होत्या आणि त्यामुळे गावात दुधाचं मोठय़ा प्रमाणावर उत्पादन होई. मात्र त्यातलं वापरात नसलेलं बरंचसं दूध नासून जाई. जगन्नाथ मंदिरातील एका पुजाऱ्याने या गावातील मंडळींना नासलेल्या, फाटलेल्या दुधापासून छेना बनवण्याची कला शिकवली आणि त्यातूनच पुढे रसगुल्ल्याचा जन्म झाला असावा असं काही अभ्यासकांचं मत आहे.
यातील पौराणिक रंजकपणा बाजूला ठेवला तरी हा रसगुल्ला बंगाली घराघरांत कसा पोहोचला, किंबहुना बंगाली मिठाई म्हणून कसा प्रसिद्ध झाला, हा प्रश्न उरतोच. त्यावर अभ्यासकांनी शोधलेलं उत्तर महत्त्वाचं आहे. साधारण १८ व्या शतकात ओदिशामध्ये विविध कारणांनी बंगालमध्ये स्थलांतरित झालेल्यांची संख्या मोठी होती. बंगाली घरांतून मोठय़ा प्रमाणावर ओदिशातून आलेल्या बल्लवाचार्याना स्वयंपाकाचं काम दिलं गेलं. त्यातून ही मिठाई बंगालच्या घराघरांत रुजली आणि याच प्रांताशी जोडली गेली. मात्र बंगाली अभ्यासकांचा या संपूर्ण कहाणीला विरोध आहे. त्यांच्या मते जगन्नाथ मंदिरात चढवल्या जाणाऱ्या ५६ भोगात रसगुल्ला खूपच नंतर समाविष्ट झाला. अजून तो मूळचा पदार्थ नाही. शिवाय फाटलेल्या, नासलेल्या दुधातून बनवलेल्या मिठाईला देवाच्या नैवेद्यात सहज स्थान प्राप्त होणं शक्य नसल्याने जगन्नाथ मंदिराच्या योगाने रसगुल्ला मूळचा ओदिशाचा असण्याच्या समजुतीला छेद देता येतो. अनेक बंगाली अभ्यासकांनी काही बंगाली मिठाईवाल्यांना रसगुल्ल्याच्या निर्मितीचं श्रेय दिलं आहे. यात नोबिनचंद्र दास यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. त्यांनी रसगुल्ला ही मिठाई लोकप्रिय केली. त्याआधीही ब्रज मोईरा, हरधन मोईरा यांनी रसगुल्ल्यांच्या विक्रीस सुरुवात केली होती. गंमत म्हणजे रसगुल्ला ही मिठाई त्या काळी त्या त्या दुकानदारांच्या नावानेही खपत असे. गोपालगोला, जतिनगोला, भाबानीगोला ही नावं दुसरीतिसरी कसलीही नसून रसगुल्ल्याचीच आहेत.
या सगळ्या चर्चेनंतर प्रश्न उरतोच. रसगुल्ला नेमका कोणाचा? पण या दोन्ही राज्यांच्या दाव्यांच्या खूप आधी जवळपास १५ व्या शतकात सोमेश्वराने केलेला हा उल्लेख पाहा. दूध उकळून त्यात आंबट ताक घालावं. दूध फाटून घट्ट भाग व पाणी तयार होईल. हा घट्ट भाग फडक्यात बांधून वेगळा करावा. त्यात थोडं तांदळाचं पीठ मिसळून लहान लहान गोळे करून ते तुपात तळून त्यावर पिठीसाखर व वेलचीपूड भुरभुरावी. या गोळ्यांना मोराच्या अंडय़ासारखा आकार दिलेला असायचा. त्यामुळे त्यांना मोरेंडक असं म्हटलं जाई. हा क्षीरप्रकार मोरेंडक सगळ्या बंगाली मिठायांचा आद्यप्रकार समजला जातो. याच पदार्थाला मग पौराणिक कथांची जोड देऊन तो पदार्थ एखाद्या राज्यात स्थायिक झाला असावा.
त्यामुळे रसगुल्ला मूळचा कुठला याहीपेक्षा तो कुठे लोकप्रिय झाला हे महत्त्वाचं आहे. एखाद्या व्यक्तीविषयी त्याच्या एकूण व्यक्तिमत्त्वाला धक्का बसेल असं वास्तव कळल्यावरही त्या व्यक्तीबद्दलचं मत न बदलण्याइतपत काही वेळा आपलं त्या व्यक्तीशी सख्य असतं. रसगुल्ल्याचंही तेच आहे. तो कोणत्याही राज्यात जन्माला असो, पण बंगाली अंगणातच तो मायेने वाढला आहे. त्यामुळे आपल्यासाठी रसगुल्ला बंगाली बाबूच असेल. त्या बंगाली भाषेसारखाच अगदी गोल गोल आणि गोड गोड.
साखरेच्या पाकातून निथळत तो आपल्यासमोर येतो. अगदी एखाद्या अवखळ बाळासारखा. बाळाला उचलून घेताना कपडे खराब तर होणार नाहीत ना याची चिंता करीत आपण नकळत त्या गोंडसपणाला भुलून बाळाला जवळ करतो. रसगुल्ल्याचंही वेगळं नाही. हात चिकट होतील, पाक तोंडावर ओघळेल त्यामुळे खावं की न खावं, या विचारात कधी नकळत या गोड गोळ्याला उचलून आपण मुखात ठेवतो ते कळतच नाही. खाल्ल्याबरोबर दातांशी सलगी करणारा त्याचा मऊसरपणा आणि त्याच्या त्या स्पंजी गोलाकारातून निथळत येणारा पाक याचा अनुभव शांघातिक! चोमोत्कर! भीषोण सुंदर! अपूबरे!
-रश्मि वारंग