आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधायचा हा प्रयत्न.
अन्न ही माणसाची मूलभूत गरज म्हणताना ही गरज सांस्कृतिकदृष्टय़ा माणसाशी जोडली गेली आहे. विशिष्ट संस्कृतीचा आणि खाद्यपरंपरेचा जुळलेला ऋणानुबंध ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ची आठवण सातत्याने करून देत असतो. सांस्कृतिकदृष्टय़ा भारतातल्या जवळपास सगळ्या प्रांतांशी जोडला गेलेला पदार्थ म्हणजे खीर. विविध प्रांतात या खिरीला वेगवेगळे नामाभिधान प्राप्त असले तरी साधारणपणे शुभकार्यापासून आनंद साजरा करण्याच्या प्रसंगांपर्यंत खिरीचा संचार सर्वत्र आहे. खीर, खिरी, पायसम, पायश अशी नामे ‘नाना तरी एकचि अंतरंग’ असलेली खीर भारतीय जीवनात प्राचीन काळापासून ज्ञात आहे.
खीर आणि दूध यांचं नातं अतूट आहे. दूध अर्थात क्षीर याच्याशी असलेल्या संबंधातून ‘खीर’ हा शब्द आला आहे. खीर कशी असावी याचे प्राचीन ग्रंथांतील विवेचन पहा. सावे, राळे, देवभात, सुगंधी तांदूळ यापैकी कोणत्याही प्रकारच्या तांदळाची खीर बनवावी. त्यासाठी विऊन बरेच दिवस झालेल्या म्हशीचे दूध घ्यावे आणि ती चाटून खाण्याइतकी घट्ट असावी. पूर्वी केळीची पाने वा पत्रावळीवर जेवायची पद्धत होती. तेव्हा ही खीर पानावर वा पत्रावळीवर थेट वाढली जाई. त्यामुळे ती चाटून खाण्याइतकी घट्ट असल्यास ओघळणार नाही याचा विचार करून ही कृती सांगितली गेली होती.
भारतीय आहारात नैवेद्य या संकल्पनेला खूप महत्त्व आहे. या नैवेद्यात प्राचीन काळापासून दूध वा दुधाचे पदार्थ प्रिय मानले गेले आहेत. त्यामुळे देवळात वा शुभकार्यात खिरीचे स्थान अनन्यसाधारण ठरलेले दिसते. दाक्षिणात्य लग्नसमारंभात खीर म्हणजेच पायसम पंगतीला नसेल तर लग्न संपन्न झाल्याचं समाधान मिळत नाही. त्याही पलीकडे काही मंदिरे अशी आहेत जिथली खीर प्रसाद म्हणून भक्षण केली जाते. केरळातील गुरुवायुर मंदिर वा अंबालापुझ्झा मंदिर याचे उत्तम उदाहरण ठरेल. त्यापैकी अंबालापुझ्झा मंदिरातील प्रसादरूपी खिरीशी एक कथाही जोडली गेली आहे.
असं म्हणतात की, भगवान कृष्ण एका वयस्कर ऋषींचे रूप धारण करून अंबालापुझ्झा येथील राजासमोर प्रगट झाले. त्यांनी बुद्धिबळाचा खेळ खेळण्यासाठी राजाला आव्हान दिले. राजा बुद्धिबळात प्रवीण होता. त्याने आनंदाने ते आव्हान स्वीकारले. ऋषींनी त्यास विचारले की या खेळात हरल्यास तू मला काय देणार? त्यावर एक अजबच करार झाला. राजा हरल्यास बुद्धिबळाच्या घरांइतके तांदूळ ऋषींना द्यायचे राजाने मान्य केले. मात्र बुद्धिबळाच्या पहिल्या घरात एक दाणा, दुसऱ्या घरात त्याच्या दुप्पट, तिसऱ्या घरात त्या दुपटीच्या दुप्पट आणि पुढे तशीच ६४ घरांकरता जी संख्या निश्चित होईल ती राजाने तांदळाच्या रूपात द्यायची असे ठरले. अर्थातच खेळात ऋषीरूप भगवान श्रीकृष्ण जिंकले आणि ठरलेल्या पैजेप्रमाणे राजाला द्यावे लागणार होते १८,४४७,७४४ महासंख टन इतके तांदूळ. राजा हतबल झाला. तेव्हा भगवान कृष्ण मूळ रूपात प्रकटले आणि त्यांनी राजाला आश्वस्त केले की, हे तांदूळ आत्ताच या क्षणीच द्यायची गरज नाही तर माझ्या मंदिरात येणाऱ्या यात्रेकरू वा बेघरांना हे तांदूळ तू प्रसादरूपाने दे. तेव्हापासून राजाच्या हरलेल्या पैजेचे ते तांदूळ खीररूपात भाविकांना दिले जातात. मंदिराच्या प्रसादात खिरीला स्थान लाभल्याने दाक्षिणात्य जेवणात खिरीचा मान किती वाढला हे वेगळे सांगायला नको. या कथा खऱ्या वा खोटय़ा याची शहानिशा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण या सगळ्या प्रपंचाशी श्रद्धा जुळलेली आहे.
खिरीच्या या इतिहासात एक महत्त्वाचा भाग असा की ज्या प्रमाणे शुभकार्यात खिरीला स्थान आहे, तसंच दु:खाच्या जेवणातही खीर चालते. त्यामुळे आनंद-दु:ख या दोन्ही प्रसंगात भारतीयांची सोबत करणारी खीर खऱ्या अर्थाने आहार आणि संस्कृती यांच्या एकरूपतेचे प्रतीक ठरते. भारतातल्या बहुतांश घरात प्रसंगानुरूप खीर शिजतेच. रव्याची असो, शेवयांची असो, तांदळाची असो; दुधात आटल्यावर आतली सामग्री जशी त्या दुधात एकजीव होऊन जाते तशीच काळ, वेळ, पिढय़ांतील अंतर, बदलत्या चवी याच्या पलीकडे जाऊन भारतीयांच्या आहाराशी खीर एकरूप झाली आहे, हाच तिच्यातला खरा गोडवा आहे.