अगदी आपल्या वाटणाऱ्या पदार्थाचं मूळ परदेशी असतं तर परक्या देशातून आलेल्या एखाद्या पदार्थाचं कूळ आपल्याच प्रांतात सापडतं. आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधायचा हा प्रयत्न.
गोडधोड पदार्थाशिवाय नवीन वर्षांच्या उत्साहाची कल्पनाच होऊ शकत नाही. काही सण आणि गोडाचे पदार्थ यांचं नातं अतूट आहे. गुढीपाडव्याच्या सणाशी जोडला गेलेला गोड पदार्थ म्हणजे श्रीखंड. डाएटच्या कल्पनेने दक्ष झालेली मंडळीसुद्धा श्रीखंडाची बोटभर चव चाखल्याशिवाय राहात नाहीत. मग अगदी जातिवंत खवय्यांविषयी काय बोलावे? श्रीखंड-पुरीचा बेत म्हणजे सणाचा आनंद लुटून झाल्यावर दोन-चार तासांच्या निवांतपणाची ग्वाहीच.
श्रीखंड या शब्दाची निर्मिती आणि उगम याविषयी दोन विचार आढळतात. काहींच्या मते प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या ‘शिखरिणी’ या पदार्थनामाचा अपभ्रंश म्हणजे श्रीखंड. तर काहींच्या मते क्षीर-खंड यापासून श्रीखंड हा शब्द निर्माण झाला असावा. क्षीर अर्थात दूध, त्याचे दही आणि त्यापासून निर्माण श्रीखंड असा हा प्रवास आहे.
असं म्हणतात की महाभारतात महापराक्रमी भीम जेव्हा विराट राजाकडे बल्लवाचार्य म्हणून काम करत होता तेव्हा त्याने ‘शिखरिणी’ नामक पदार्थ बनवल्याचा उल्लेख येतो. त्या शिखरिणीत भीमाने ताजी फळे वापरल्याचा संदर्भ आहे. आजच्या फ्रूट श्रीखंडाचे मूळ थेट भीमापर्यंत मागे गेलेले पाहून गंमत वाटते. दुकानदार मंडळी सीताफळ श्रीखंड, स्ट्रॉबेरी श्रीखंड विकताना अशी जाहिरात करतात की जणू काही हा नवा प्रयोग त्यांनीच केला असावा. पण यापुढे त्यांना ठामपणे भीमाचा दाखला देता येईल. जुन्याच पदार्थाचं हे नवं रूप चवीला मात्र इतक्या हजारो वर्षांनंतरही तितकंच मिट्ट गोड राहिलेलं आहे. अर्थात या श्रीखंडाच्या पाऊलखुणा भीमापर्यंत मागे जात असल्या तरी काही संशोधकांच्या मते, श्रीखंडाची कृती त्या आधी अस्तित्वात आली असावी. गुराखी मंडळी वा कुणीही यात्रेकरू सोबत दही घेऊन प्रवासास निघाले असता, खाली ठेवल्यास दही ओघळेल या भीतीने ते त्यांनी वर टांगले असावे. सकाळी घट्ट झालेला चक्का त्यात गोड काही मिसळून खाल्लय़ावर अधिकच छान लागतो हे त्यांना जाणवले असावे. त्यातून पुढे सामान्य लोकांकडून राजदरबारी स्वयंपाकघरात या साध्याशा पदार्थावर शाही सजावट होऊन श्रीखंड लोकप्रिय झाले असावे, असा अंदाज आहे. आपण या सगळ्या पदार्थाच्या इतिहासाचे ठळक टप्पे शोधू शकतो, पण त्यांच्या निर्मितीमागची प्रेरणा बऱ्याचवेळा ‘जर तर’च्या चक्रातच अडकलेली राहाते.
भारतात एकेकाळी दुधदुभत्याला काहीच कमी नव्हती. त्यामुळे श्रीखंडासारखा पदार्थ सणासुदीच्या निमित्ताने लोकप्रिय झाला यात आश्चर्य नाही. गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब ही राज्यं श्रीखंडाच्या लोकप्रियतेत वरचा क्रमांक पटकावून आहेत. महाराष्ट्रात तर परप्रांतीय, गोड पदार्थाची ओळख होईस्तोवर सणासुदीला होणाऱ्या गोडाच्या पदार्थात श्रीखंडाचा क्रमांक अव्वल होता. होळीत पुरणाची पोळी, गणपतीला मोदक अशी गणितं पक्की असली तरी उरलेल्या सणांना श्रीखंडाची निवड अधिकतर होताना दिसायची. फ्रूट श्रीखंडाचा इतिहास महाभारतापर्यंत मागे नेताना आम्रखंड ही मात्र खास महाराष्ट्रीय आणि गुजराती जेवणाची खासियत आहे. आज गुलाबजाम, रसगुल्ला, अंगुरबासुंदी यांच्या समान वाढत्या प्रभावात श्रीखंड हा अनेकातला एक पर्याय होऊन राहिला असला तरी पंचपक्वान्नांच्या पंगतीला श्रीखंडाचा मान आजही तितकाच मोठा आहे.
मराठी जेवणाच्या शाही पंगतीचा श्रीखंडपुरी हा आकर्षणबिंदू म्हणता येईल. घरच्याघरी बनवलेले वा आताच्या काळाच्या सोयीने तयार मागवलेले श्रीखंड, तेलात न्हाऊन आलेल्या पुरीच्या सोबतीने मुखात विसावताना ‘आज आनंदी आनंद झाला’चा फील आपोआप देते. इतरवेळी पंगतीचे शिष्टाचार काटेकोरपणे पाळणारे आपण बोटाने श्रीखंड उचलून तोंडात चाटवताना कोण काय म्हणेल याच्या पलीकडे आलेले असतो. या श्रीखंडाचा मिट्ट गोडपणा आपल्याला त्या खाद्यतंद्रीकडे अलगद घेऊन येतो. जेवण आटोपल्यावर येणारी सुस्ती, ही तंद्री पुढचे काही तास टिकवून ठेवते. श्रीखंडाचे साफल्य हे आपल्याला या भावावस्थेपर्यंत आणण्यातच आहे.