अगदी आपल्या वाटणाऱ्या पदार्थाचं मूळ परदेशी असतं तर परक्या देशातून आलेल्या एखाद्या पदार्थाचं कूळ आपल्याच प्रांतात सापडतं. आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधायचा हा प्रयत्न.
नुसत्या नावाच्या उच्चारानेच आपल्याला तरतरीत करणारं पेय म्हणजे चहा. भारतीयांचीच नव्हे तर जगभरातील अनेकांची सकाळ चहाच्या वाफाळत्या पेल्याशिवाय अशक्य आहे. चहाशिवाय सकाळ म्हणजे धुके दाटलेले उदास उदास किंवा सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या अशीच भावावस्था. या महात्म्यामुळेच पाण्याच्या खालोखाल लोकप्रिय ठरलेले हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे पेय आहे.
अशा या अमृततुल्य पेयाचे ‘टी’ हे इंग्रजी नाव आणि चहा वा चाय हे देशी नाव यांचा अर्थाअर्थी काय संबंध असावा असा प्रश्न राहून राहून मनात येतोच. याचं उत्तर फक्त चिनी मंडळीच देऊ शकतात. कारण चहाचं मूळ तिथे चीनमध्ये आहे. या चिनी भाषेत ‘ते’ किंवा ‘टे’ हा उच्चार कडू वनस्पतींकरता केला जायचा. त्याच ‘टे’चं ‘टी’ झालं, तर जपानी व कोरियन भाषेत ‘चा’ हा शब्द असल्याने त्याचा वापर करत भारतीय भाषेत चहा, चाय असं रूपांतर झालं. दोन्ही शब्दांचं मूळ चिनी भाषेतच आहे. चहा जसा जगभर पसरत गेला तसंतशी विविध नावं त्याने धारण केली.
हे झालं चहाच्या नामकरणाविषयी. पण जगभरात इतक्या हजारो वनस्पतींपैकी ही चहापत्तीच आपल्याला संजीवनी देणारी आहे हे एखाद्या हुश्शार माणसाला कसं कळलं असावं? इथे येते चहाच्या जन्माची कथा. म्हणजे हे चहाचं झुडूप वर्षांनुर्वष अस्तित्वात असणारच पण त्याचा असाही वापर होऊ शकतो याचा साक्षात्कार होण्याची कथा गमतीशीर आहे.
चीनमध्ये अनेक वर्षांपूर्वी जेव्हा शेनाँग राजा राज्य करीत होता तेव्हाची ही गोष्ट. हे राजेसाहेब औषधी वनस्पतींमधले तज्ज्ञ होते आणि एके दिवशी आपल्या उद्यानात गरम पाणी पीत बसले होते. अचानक वाऱ्याच्या मंद झुळकीसोबत चहाची काही पाने त्या गरम पाण्याच्या तबकात येऊन पडली. पाहता पाहता पाण्याचा रंग बदलला. कुतूहल म्हणून राजा शेनाँग ते पाणी प्यायले आणि त्यांना तरतरीत वाटू लागले. अशाप्रकारे साऱ्या जगाला या अमृततुल्य पेयाचा शोध लागला. अर्थात आज ज्या प्रकारे आपण चहाचं सेवन करतो त्या पद्धतीने सुरुवातीला चहा प्यायला जात नसे. औषधी पेय म्हणूनच त्याचं सेवन होई. असंही म्हणतात की, या शेनाँग राजाला औषधी वनस्पतीच्या अभ्यासाचा छंद होता. त्यामुळे वनस्पतींमधले औषधीगुण तपासण्याकरता काही पानं, मुळं त्याला चावून खावी लागत. त्यातली काही विषारीही असत. या विषारी पाना-मुळांवर उतारा म्हणून तो चहाची पानं चावून खात असे आणि त्यामुळे विषाची मात्रा कमी होई.
आज जगभरात जवळपास सगळीकडे चहाचे सेवन होते. जवळपास हजाराहून अधिक चहाचे प्रकार जगभरात नावाजले जातात. पण चहाचं मूळ ज्या देशात आहे त्या चिनी मंडळींच्या मते चहा कोणताही असो, त्यासाठी वापरलं जाणारं पाणी महत्त्वाचं असतं. खास चहा बनवण्यासाठी चीनमध्ये विशिष्ट तलाव अथवा नदीचं पाणीच आणलं जाई. त्या पाश्र्वभूमीवर विचार करता आपल्याकडे टपरीवर मिळणाऱ्या चहासाठी कुठलं पाणी वापरलंय याच्या फंदात आपण पडत नाही आणि हा विचार करू लागलो तर चहा पिणं कठीण होईल. तरीही अनेक टपऱ्यांवरचा चहा हा उत्तम टीशॉप्सना मागे टाकेल इतका ए वन असतो, हा भाग वेगळा.
आजच्या घडीला कॉफी हाऊसेसप्रमाणेच टी हाऊसेस उदयाला येत आहेत. चहाचे वेगवेगळे प्रकार आपण अजमावून पाहात आहोत. पण कॉफीसाठी जी एक तरंगती वातावरणनिर्मिती या कॉफी हाऊसेसमधून निर्माण होते ती चहासाठी होणं जरा कठीण वाटतं. चहा हा अगदी जन्मापासून ओपन फॉर ऑल कॅटेगरीतला राहिलेला आहे. त्याला हा तामझाम, पंचतारांकित तयारी, गूढ वातावरण कधी लागलंच नाही. गप्पांची मैफल जमावी, मग ती कॅन्टीनपासून घरापर्यंत, गच्चीपासून कट्टय़ापर्यंत कुठेही. आपल्या गप्पा समेवर कधी येणार याची अचूक नस ओळखणारा चहावाला वा चहावाली असावी. गप्पा रंगात आलेल्या असताना तुटक्या कानाच्या कपापासून ते काचेच्या गिलासापर्यंत कश्शाकश्शातही ओतून हे वाफाळणारं जीवनामृत समोर यावं. मित्र-आप्तेष्ट यांच्या सोबत सुरेल तार जुळत असताना तो चहाचा घोट घशातून हृदयात आत आत जाताना चहात विरघळलेल्या साखरेप्रमाणे आणि मिळून आलेल्या चहा पत्तीप्रमाणे आपणही विरघळतो त्या वातावरणात आणि आपल्या आप्तजनांत. मला वाटतं चहाची इतिकर्तव्यता याच कार्यात आहे.